ढिंग टांग : ऑप्शनल, ऐच्छिक वगैरे!

Dhing-tang
Dhing-tang

‘तमे साच्ची वात कहुं छुं...दिल आ किसानभाईयोंमाटे बहु रोए छे!,’’ डोळे पुसत पुसत मा. नमोजी यांनी ‘मन की वात’ सांगितली, तेव्हा आम्हाला अगदी ओशाळल्यागत झाले. आम्हीही खिश्‍यातून रुमाल काढला. काय हे? एवढ्या मोठ्या माणसाला आपण रडकुंडीला आणले, हे काही ठीक झाले नाही...

‘पहिल्या दिवसपासून मी सांगत होता, अरे भाई, क्रिषी कानूनना एटला टेन्सन लेवानी काई जरुरत नथी! आ तो सतप्रतिसत ओप्शनल छे! लाभ लेवानु हॉय, तो लैलो, नथी लेवानुं तो ना लो! एटला सिंपल छे! कछु सांभळ्यो के?,’’ समोरच्या प्लेटीतला ढोकळा उचलत नमोजींनी समजावून सांगितले. त्यांच्या ‘कछु सांभळ्यो के?’ या सवालाला मात्र आमच्याकडे उत्तर नव्हते. गेले दोन महिने झाले, पण आम्हीच काय, संपूर्ण देश ‘सांभळलेला’ नाही, असे आम्हाला म्हणायचे होते. पण तेवढ्यात नमोजींनी खमंग, लज्जतदार ढोकळा पुढे केला...असो.

‘म्हॉबज? कृफिफॉय ऑफिफ्रुफब फिक हॉब?’’ आम्ही आश्‍चर्यचकित होत्साते विचारले. ढोकळ्याची वडी एवढी अगडबंब असते की मुखात कोंबली की काही क्षण बोलती बंद होते. हे लोक ढोकळ्याच्या छोट्या वड्या का करीत नाहीत? असो.
‘चोक्कस! एकदम साच्ची वात!’’ त्यांनी समजून उमजून उत्तर दिले. आमच्या प्रिय नमोजींना सगळे समजते. बोललेले समजतेच, पण न बोललेलेदेखील समजते. (खुलासा : ‘म्हंजे? कृषिकायदे ऑप्शनल किंवा ऐच्छिक आहेत?’ असे आम्ही विचारले होते.)

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘आम्हाला हे आधी कळलं असतं तर आम्ही आंदोलनाला पाठिंबा दिला नसता! दैनिका-साप्ताहिकात लेख लिहून लिहून कृषिकायद्याला ‘काळा कायदा’ म्हटले नसते! टीव्हीवरल्या चर्चा-परिसंवादात चिडून चिडून बोलून स्वत:चे बीपी वाढवले नसते! छे, सगळाच घोळ झाला...’’ आम्ही हळहळलो.
अठ्ठ्यात्तर दिवस आम्ही काय करत होतो? ऑप्शनला टाकण्याजोग्या प्रश्नासाठी सगळे सिलॅबस पाठ करत बसलो. आम्ही अगदीच ‘हे’ आहोत, या विचाराने आम्हाला आणखीनच संकोचल्यासारखे झाले.

‘जावा दो! राजनीतीमां एऊ च्याले छे! तमे तो तद्दन आंदोलनजीवी छो... ना घरना, ना घाटना...’’ नमोजींनी आमच्या पश्‍चात्तापाची भावना ढोकळ्यावरील माशीप्रमाणे उडवून लावली. आम्ही आंदोलनजीवी? आं-दो-ल-न-जी-वी? छे, छे काहीतरीच!...
‘काहीतरी गैरसमज होतोय, आम्ही ‘आंदोलनजीवी’ नसून साधेसिंपल वैचारिक आहो!’’ आम्ही थोडाथोडका खुलासा करण्याचा प्रयत्न केला. आमचे निम्मे लक्ष प्लेटीतल्या ढोकळ्याकडे होते, हे कबूल केले पाहिजे.

‘जुओ, जो थयु, थई गयुं! जाग्या त्याथी सवार, खबर छे ने? क्रिशी बिलमां जे पण काई छे, बद्धा ओप्शनल छे! ओप्शनल प्रश्ननेमाटे एटला बव्हाल ठीक नथी! तमे घरे जावो, आरामथी चायवाय पिवो अने पिवडावो! फिकर नॉट... हुं छुं ने?’’ नमोजींनी आमच्या पाठीवर थाप मारत सांत्वन केले. आम्ही मान डोलावली. डोळे पुसत पुन्हा एखादा ढोकळ्याचा पीस उचलता येतो का, याचा अदमास घेतला. पण प्लेटीत शिल्लक राहिलेला एकमेव तुकडा तेवढ्यात नमोजींनी उचलल्याने आमचा बेत आम्ही रद्द केला.

‘पण हेच आधी सांगितलं असतं तर आमच्यावर आंदोलनाची वेळच आली नसती!’’ जमेल तितका धीर एकवटून आम्ही नापसंतीचा क्षीण सूर लावून बघितला. ...त्यावर नमोजींनी मिश्‍किलपणे हांसत डोळे मिचकावले, आणि अंतिम ढोकळा तोंडात टाकला.
...ऐनवेळी प्लेटीत न उरलेला ढोकळ्याचा खमंग तुकडा मनातल्या मनात ऑप्शनला टाकत आम्ही तिथून हात हलवत परत आलो. चालायचेच!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com