esakal | खातेवाटप : एक सुटका!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

‘होणार, होणार’ म्हणताना एकदाचे मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्याने आम्ही अखेर सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. मा. मु. उधोजीसाहेब सीएम यांच्या कर्तृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कां की आम्ही हाडाचे मावळे आहोत ! आता मंत्रालयावर भगवा फडकविण्याचा एकमेव उपचार तेवढा बाकी राहिला असून आज ना उद्या, ते पवित्र कार्यदेखील पार पडेल, याबद्दल आमच्या मनात शंका उरलेली नाही.

खातेवाटप : एक सुटका!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

‘होणार, होणार’ म्हणताना एकदाचे मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाल्याने आम्ही अखेर सुटकेचा निश्‍वास सोडला आहे. मा. मु. उधोजीसाहेब सीएम यांच्या कर्तृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. कां की आम्ही हाडाचे मावळे आहोत ! आता मंत्रालयावर भगवा फडकविण्याचा एकमेव उपचार तेवढा बाकी राहिला असून आज ना उद्या, ते पवित्र कार्यदेखील पार पडेल, याबद्दल आमच्या मनात शंका उरलेली नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

खातेवाटपावांचून महाराष्ट्राचे घोडे चांगले अडोतीस दिवस अडले होते. जगातील साऱ्या समस्या संपुष्टात आल्यानंतरही खातेवाटपाचे कोडे काही सुटत नव्हते. परंतु अखेर तेही झाले. साहजिकच या उत्तुंग यशाखातर अभिनंदन करण्याच्या निमित्ताने आम्ही मा. मु. यांचे अधिकृत निवासस्थान ऊर्फ मातोश्री प्यालेस येथे गेलो. दारावर नेहमीप्रमाणे दारवान उभा होता !

कानात काडी घालून डोळे मिटून टोलनाक्‍यावरील बांबूप्रमाणे दारावर आडवा पाय घालून दारवान उभा होता. किलकिल्या डोळ्यांनी आमच्याकडे पाहून त्याने भिवया दोनदा उडवून ‘कायाय?’ अशी प्रेमपूर्वक विचारणा केली. आम्ही हातातील पुष्पगुच्छ व पेढ्यांचा पुडा दाखविला. दारवानाने पेढ्यांचा पुडा काढून घेत आमची आत रवानगी केली.

प्यालेसच्या अंतरंगात प्रवेश मिळवणे हे तसे दुष्कर असते. भल्या भल्यांना हा अधिकार मिळत नाही. परंतु आम्ही ‘आतल्या’ गोटातले असल्याने आम्हाला हमखास प्रवेश मिळतो. ‘मातोश्री’च्या दारावरील तोबा गर्दीतून वाट काढत आम्ही पोचलो. तेथे एका शेतकऱ्याने ‘आम्हाला सायबांना भेटू द्या’ असा हट्ट धरला होता. पोलिसांनी त्याचा झोळणा करून विरुद्ध दिशेला नेऊन गाडीत टाकले ! पण आम्ही मात्र बेधडक पोचलो. मन भरून आले. हीच ती पवित्र वास्तू !! मा-तो-श्री ! येथेच... येथेच महाराष्ट्राच्या हृदयाचा स्वामी राहातो...

भारलेल्या मनाने आणि दबक्‍या पावलांनी आम्ही आंत शिरलो...
...ज्या अर्थी येथे शांतता नांदत्ये आहे, त्याअर्थी महाराष्ट्रात सर्वत्र शांतता आहे. यथा राजा, तथा प्रजा !! शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी स्वामी बांधावर गेले. नुसते बांधावर गेले नाहीत, तर शेतकऱ्यांना अश्रुमुक्‍त करण्याचा चंग बांधून परत आले !! शेतकरी बांधव बांधावरच सुखी झाला. अर्धपोटी, गोरगरिबांच्या पोटात चार घास जावेत, म्हणून स्वामीयांनी अवघ्या दहा रुपड्यांमध्ये शिवभोजनाची सोय केली. एका टायमाची पोटाची सोय झाल्यामुळे गोरगरीबही सुखी झाले ! गेल्या जुलमी सरकारने सुरू केलेल्या भंकस कार्यक्रमांना सरसकट स्थगिती देऊन स्वामीयांनी सरकारी तिजोरीला लागलेली गळती थांबवली. आरेवनातील (उरल्या सुरल्या) झाडांनी हर्षभराने सळसळ केली. ती अजूनही सुरूच आहे...

आम्ही अंत:पुरात शिरलो. पाहातो तो काय ! चि. विक्रमादित्यसाहेब खोलीभर विविध जागतिक शहरांचे नकाशे लावून चक्‍क भूगोलाचा अभ्यास करीत होते. ‘हे बॅंकॉक... नको! हे सिंगापूर... छे छे! हे प्राग... हंऽऽ चालेल! हे न्यू यॉर्क... हे ठीक राहील!...’ असे स्वत:शीच पुटपुटत ते काही टिपा काढीत होते. बहुधा महाराष्ट्राचे उत्कृष्ट पर्यटनस्थळात रूपांतर करण्याचे काम चालले असावे !! त्यांच्याकडे कवतिकाने पाहात साक्षात स्वामी ऊर्फ मा. उधोजीसाहेब सीएम उभे होते. आम्ही त्यांचे मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाखातर हार्दिक अभिनंदन केले. पुष्पगुच्छ दिला...

‘‘क्‍काय?...खातेवाटप झाले? मग आम्हाला कसे माहीत नाही?’’ ते जोराने किंचाळलेच. तेवढ्यात दारावरच्या दारवानाने आत येऊन त्यांच्या कानी सांगितले, की खातेवाटपाची यादी इथून नव्हे, ‘सिल्वर ओक’वरून गेली आहे...’’ आम्ही (ही) च्याटंच्याट! त्यावर बळेबळेच हांसून मा. उधोजीसाहेब सीएम म्हणाले, ‘‘अस्सं होय... बरं बरं! बघा, आम्ही शेवटी खातेवाटप ‘करून दाखवलं’ की नाही?’’