esakal | अग्निपथ!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

सुमारे बावन्न वर्षांपूर्वी
फ्रान्सच्या भूमीत घडलेल्या
विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व उठावाने
बदलून गेलेल्या पर्यावरणाचा
थोडासा अंश शिल्लक आहे
अजूनही...अजूनही?

अग्निपथ!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

सुमारे बावन्न वर्षांपूर्वी
फ्रान्सच्या भूमीत घडलेल्या
विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व उठावाने
बदलून गेलेल्या पर्यावरणाचा
थोडासा अंश शिल्लक आहे
अजूनही...अजूनही?

विद्यार्थ्यांच्या विद्रोहाने
चपापलेला सत्ताधीश द गॉल
पळून गेला होता तेव्हा जर्मनीत!
आणि पॅरिसच्या कलात्मक भिंतींवर
लिहिली गेली होती अव्यक्‍तसूत्रे :
‘‘इट इज फोरबिडन टु फोरबिड!’’

सुमारे एकोणपन्नास वर्षांपूर्वी
व्हिएतनामच्या निरर्थक युद्धाच्या
विरोधात अमेरिकेतही विद्यार्थ्यांनी
दणकावले होते अध्यक्ष निक्‍सनच्या
बेमुर्वत युद्धखोरीला, विध्वंसांचे
घडले होते वेगात आवर्तन
विश्‍वविद्यालये धुमसली होती,
बॉम्ब फुटले होते अस्मानात, 
न्यूयॉर्क विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर
टिच्चून उभा राहिला होता भव्य फलक :
‘‘दे काण्ट किल अस ऑल!’’

सुमारे बत्तीस वर्षांपूर्वी
चीनच्या राजधानीमध्ये
दमनकारी रणगाड्यांसमोर
नीडरपणे उभ्या राहिलेल्या
संतप्त विद्यार्थ्यांच्या उठावाचा
उष्ण झोत पसरला होता
जगभर सर्वव्यापी अग्निशिखेसारखा.
त्या वणव्यातून उमटले होते 
सामूहिक गर्वगीत लोकशाहीचे.
‘क्रांति चिरायु होवो!’
‘लोकशाही चिरायु होवो!’

विश्‍वविद्यालयांच्या पाळणाघरांत
उमटणाऱ्या उत्स्फूर्त उद्‌गारांमध्ये
ज्यांना दिसतील क्रांतीच्या पडछाया,
ज्यांना दिसतील देशद्रोही गारद्यांच्या
पडद्यामागल्या
विश्‍वासघातकी तलवारी,
ज्यांना दिसतील 
हुमदांडगेपणाचे अवशेष,
अराजकाच्या प्राचीन खंडहरांचे,
त्या सर्वांनी एक ध्यानी घ्यावे की-

विद्रोहाचा वणवा विझवण्याइतके
पाणी सत्ताधीशांकडे कधीच नसते.
विद्रोहाचे शक्‍तिस्थान असते
ते त्याचे अक्षय्य विद्यार्थीपण,
जे नेहमीच भाजून काढते भवताल, 
स्थलकाल, आपले अस्तित्व 
आणि कदाचित
आपला आत्मादेखील!

विद्रोह आणि आत्म्याचा
गुणधर्म सारखाच असतो...
तो शस्त्राने विंधला जात नाही,
अग्निने भाजला जात नाही.
पाण्याने विझला जात नाही.
कधीही...कधीही.