थेट भेट

Dhing-Tang
Dhing-Tang

मुंबापुरीतील प्रभादेवीनजीकच्या एका पंचपंचतारांकित हाटेलात दोन अतिमहत्त्वाच्या व्यक्‍ती भेटीसाठी येणार असून, या भेटीमध्ये महाराष्ट्राचे राजकारण नुसती कूस बदलणार नसून पार उलथे पालथे पडणार असल्याची कुणकुण-ए-खबर आमच्या कानी लागली. आमच्या कानी कोणीही लागले, तरी आमचे लांब कान टवकार्ले जातात.

तद्वत ते उभेच्या उभे राहिले!! तशाच उभ्याच्या उभ्या कानांनिशी आम्ही प्रभादेवीनजीकचे ते हाटेल हुडकून काढले व मोक्‍याची जागा धरून दबा धरून बसलो. (खुलासा : दबा धरून...डबा धरून नव्हे!) सदरील हाटेलचे नाव आम्ही सांगणार नाही. ते हाटेल उत्कृष्ट खाण्यापिण्यासाठी प्रसिद्ध नसून फक्‍त गोपनीय बैठकांसाठीच प्रसिद्ध असल्याने नाव सांगण्यात काही पॉइण्ट नाही. असो. एका पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून माजी मा. मु. फडणवीसनाना निघाले असून, काही मिनिटातच ते सदरील गोपनीय हाटेलात पोचतील, अशी वार्ता आमच्या खबरींनी दिल्यावर आम्ही जय्यत तयारीत राहिलो. हाटेलीच्या बाहेरील पाम झाडाच्या कुंडीमागे दडून आम्ही नजर ठेवून होतो.

(खुलासा : पाम झाडाच्या कुंडीमागे उभे राहून चांगली नजर ठेवता येते, हे आम्ही चित्रपटांमधून पाहून ठेवले आहे.) तेवढ्यात तेथे करड्या रंगाची एक मोटार अवतरली. त्यातून साक्षात महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे निर्माते श्रीमान राजेसाहेब उतरले. आमच्याकडे (पक्षी : पाम झाडाच्या कुंडीकडे) एक चोरटा दृष्टिक्षेप टाकून ते थेट हाटेलात शिरले. थोड्या वेळात ती वादग्रस्त पांढरी मोटार आली. त्यातून मा. फडणवीसनाना उतरले. त्यांनीही आमच्याकडे (पक्षी : पाम झाडाच्या कुंडीकडे) नजर टाकून हाटेलाच्या आत मोर्चा वळवला. 

...पाठोपाठ आम्ही आत शिरलो. अज्ञात दालनात अज्ञात टेबलाशी बसून दोघेही एकमेकांकडे पाहत होते. बराच वेळ कोणी काही बोलले नाही. थोड्या वेळाने फडणवीसनाना थोडेसे खाकरले. त्यावर चमकून राजेसाहेबांनी त्यांच्याकडे बघितले. पुन्हा शांतता! आम्ही पुन्हा पाम झाडाच्या कुंडीपाठी लपलो. (खुलासा : मोठ्या हाटेलांमध्ये पाम झाडे अंतर्भागातदेखील असतात. असो.) दोघांचे संभाषण स्पष्टपणे ऐकू येत होते. आमच्या कानी पडलेले काही शब्द असे :
फडणवीसनाना : (गालातल्या गालात हसत) नमस्कार!
राजेसाहेब : (गंभीरपणे) हं!
फडणवीसनाना : काय चाल्लंय सध्या?
राजेसाहेब : (खाष्टपणे) तुमचं चाललंय तेच! 
फडणवीसनाना : ...वेळ जाता जात नाही हो हल्ली!
राजेसाहेब : (पुन्हा खाष्टपणा!)...हं!
फडणवीसनाना : (डोळे बारीक करत) पुढे काय करायचं ठरवलंय?
राजेसाहेब : कुठं काय ठरवलंय? काही नाही!
फडणवीसनाना : मग ठरवा की!
राजेसाहेब : (चिडक्‍या सुरात) काय ठरवू?
फडणवीसनाना : झेंडा बदलताय म्हणे!
राजेसाहेब : (वैतागून) कापड शोधतोय चांगलंसं! कां?
फडणवीसनाना : ...आम्ही देऊ?
राजेसाहेब : (नापसंतीनं) नको! आमचं आम्ही बघू! इथं मला का बोलावलंत? ते सांगा!
फडणवीसनाना : (आश्‍चर्याचा धक्‍का बसून) आँ? अहो, तुम्ही मला बोलावलंत ना?
राजेसाहेब : (कपाळाला आठ्या...) मी? हॅ!!
फडणवीस : (बुचकळ्यात पडत) अरेच्चा! मला तुमचा मेसेज आला होता!
राजेसाहेब : (थंडपणे)...आणि मला तुमचा! हा काय प्रकार आहे? चला, उठा!! ....दोघेही उठले. एक जण पुढल्या दाराने आणि दुसरा मागल्या दाराने निघून गेलेला आम्ही (पाम झाडाच्या कुंडीआडून) पाहिले. ‘दोनो जहान तेरे मुहब्बत में हार के, वो जा रहा है कोई शबेगम गुजारके’ हा शेर पुटपुटत आम्हीही तिथून सटकलो. असो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com