esakal | खुर्चीची कलागत!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

राजकारण खुर्चीभोवती फिरते असे म्हणतात. आम्हाला मान्य नाही. राजकारण खुर्चीभोवती नव्हे, तर समाजाभोवती फिरते, बरे का! समाज नसेल तर राजकारण कसे घडणार? ते करायचे म्हटले तर जाजमावर बसूनदेखील करता येते. त्यासाठी खुर्ची कशाला हवी? परंतु, आजकालची माध्यमेच खोडकर झाली आहेत.

खुर्चीची कलागत!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

राजकारण खुर्चीभोवती फिरते असे म्हणतात. आम्हाला मान्य नाही. राजकारण खुर्चीभोवती नव्हे, तर समाजाभोवती फिरते, बरे का! समाज नसेल तर राजकारण कसे घडणार? ते करायचे म्हटले तर जाजमावर बसूनदेखील करता येते. त्यासाठी खुर्ची कशाला हवी? परंतु, आजकालची माध्यमेच खोडकर झाली आहेत. आमचे परममित्र नामदार श्रीमान छगनबाप्पा नाशिककर आणि उपपरममित्र श्रीमान नामदार आशुक्राव नांदेडकर यांच्यात खुर्चीवरून कलागत लावण्यात आल्याचे कळल्याने आम्हाला भयंकर खेद झाला आहे. मंत्री-बैठकीच्या वेळी प्रोटोकॉलप्रमाणे आसनव्यवस्था नसल्याने दोघांमध्ये काही गैरसमज होऊन भांड्याला भांडे लागले व शब्दाने शब्द वाढला, अशा खोडसाळ बातम्या काही न्यूज च्यानलांनी उगीचच चालवल्याने आम्ही चाळवलो. मग खवळलो... यथावकाश निवळलो! 

वास्तविक दोघेही आमचे सन्मित्र आणि जंटलमन! खुर्चीवरून एकमेकांशी भांडतील, हे आम्हाला मुळातून पटलेच नव्हते. प्रसंगी ‘नेसूचे’ सोडून मित्राला देणारे दिलदार मित्र ‘बसूचे’ सोडणार नाहीत, असे कसे होईल? हा प्रश्‍न आम्हाला छळू लागला. काय आहे नेमकी ही खुर्चीची कलागत? हे कोडे उलगडण्यासाठी आम्ही दोघांनाही गाठून (आडूनआडून) चौकशी केली. दोघांनीही (आपापल्या खुर्चीत बसून) ‘असली काही वादावादी झालीच नाही,’ असे निक्षून सांगितले.

‘‘नेमके घडले काय?’’ आम्ही आधी मा. आशुक्रावांना विचारले. त्यांनी चिडका चेहरा करून आधी टाळाटाळ केली. आम्हाला वाटले, की ते नेहमीप्रमाणे आढेवेढे घेत आहेत. पण नाही! त्यांना खरेच मनस्ताप झाला होता.

‘काही नाही हो! सीएमसाहेबांच्या शेजारच्या खुर्चीत छगनबाप्पा बसले होते. त्यांना मी म्हणालो, की मी माजी सीएम असल्याने मी तिथे बसतो!..’’ त्यांनी किस्सा सांगायला सुरुवात केली. आम्ही कान टवकारले. 
‘मग?’’
‘मग कुठे काय! त्यांनी मला जागा दिली की! विषय संपला!! यात वादावादीचा प्रश्‍न कुठे आला?’’ आशुक्रावांनी प्रतिप्रश्‍न केला. आम्हाला शतप्रतिशत पटले. 
‘महाराष्ट्रासाठी वेळ पडली तर आणि मा. म्याडमनी सांगितले तर मी खुर्ची सोडा; सतरंजी घालून बसायला तयार आहे! समजलं?’’ मा. आशुक्रावांनी कर्तव्यकठोर चेहरा करून आम्हाला ठणकावून सांगितल्यावर आम्हाला तिथून काढता पाय घेणे भाग होते.
तिथून आम्ही थेट मा. छगनबाप्पांकडे गेलो. त्यांनाही सेम टू सेम तेच विचारले.
‘नेमके घडले काय?’’
‘काही नाही हो! सीएमसाहेबांच्या शेजारच्या खुर्चीत मी बसलो होतो. तेवढ्यात आशुक्राव आले आणि म्हणाले, की माझ्या खुर्चीचा पाय थोडा दिडका असल्याने बसायला त्रास होतो! मी हिते बसू का?’’ त्यांनी किस्सा सांगायला सुरुवात केली. आम्ही पुन्हा कान टवकारले.
‘मग?’’
‘मग कुठे काय! मी त्यांना जागा दिली की! विषय संपला!! यात वादावादीचा प्रश्‍न कुठे आला? बोला!,’’ छगनबाप्पांनी प्रतिप्रश्‍न केला. आम्हाला त्यांचेही शतप्रतिशत पटले.
‘‘महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि साहेबांनी सांगितले, तर आपण स्टुलावर बसायलासुद्धा तयार आहोत, एका खुर्चीची ती काय बात?’’ भिवया वर करून, गळ्यातील मफलर तडफेने मागे टाकत छगनबाप्पांनी आम्हाला ठणकावून सांगितल्यावर तेथून काढता पाय घेणे भाग होतेच.

...एवढे झाल्यानंतर आम्ही त्या वादग्रस्त खुर्चीची पाहणी करायला बैठकीच्या दालनात गेलो. खुर्ची वरकरणी ठीक दिसत होती. उंच पाठीची होती. परंतु, त्याचा फोम कोणीतरी कुर्तडलेला होता. पाय दिडका होता आणि पाठ भस्सदिशी मागे सरकत होती...
...अशा मोडक्‍या खुर्चीसाठी कोण इतके भांडेल? सांगा बरं!
म्हणून प्रारंभीच म्हटले, खोडसाळ बातम्या काही न्यूज च्यानलांनी उगीचच चालवल्याने आम्ही चाळवलो. मग खवळलो...यथावकाश निवळलो!