मध्यस्थ!

Dhing-Tang
Dhing-Tang

मि. खोमेनी,  माझे हे पत्र आणून देणारा माणूस साधासुधा नसून आमच्या सीआयएचा माणूस आहे. त्याला उत्तम कमांडो ट्रेनिंग देण्यात आले आहे. त्याच्याशी नीट वागावे. युद्धजन्य परिस्थितीत नेमका कसा संवाद साधावा हे कळत नव्हते. शेवटी पत्र लिहायला घेतले.

मि. खोमेनी, तुझ्यासारखे आम्ही मेनी मेनी एनेमी पाहिले असून सगळ्यांना खो दिला आहे. वी आर अमेरिकन्स. आम्ही नेहमीच जिंकतो हे विसरू नकोस. तुमचा कमांडर सुलेमानी आम्ही ड्रोन हल्ला करून उडवला, म्हणून तुमचे रक्‍त खवळले आहे. आय कॅन व्हेरी वेल अंडरस्टॅण्ड! पण जास्त आवाजी करू नये. आमच्याकडे असे अनेक ड्रोन तय्यार आहेत. 

सुलेमानीचा खात्मा केल्यामुळे तुम्ही आमच्या इराकमधल्या लष्करी तळावर क्षेपणास्त्रे डागलीत. हे खरे तर बरे नाही केलेत! पण ठीक आहे. एक वेळेला माफ करतो. पुन्हा असले उद्योग करू नका! महागात जाईल!! आमची अमेरिका आणि तुमच्या इराणमध्ये सध्या विस्तव जात नाही. त्यात आगीत तेल ओतायला दुसऱ्या कोणी येण्याची गरज नाही. कारण तुमच्याकडे ऑलरेडी चिक्‍कार तेल आहे! दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे असून आपल्यात युद्ध झाले तर त्यातून तिसऱ्या महायुद्धाचा जन्म होईल असे म्हणतात. होऊ देत! अपने कू पर्वा नहीं! आपल्याकडे आता ॲटम बॉम्बपेक्षा भारी शस्त्र आहे! त्याचे नाव नमोअस्त्र!! पण दुर्दैवाने नमोजींकडे सध्या भलतीच आग लागल्याचे कळते! त्यामुळे तुमच्यासारख्यांचे फावते. पण भल्याभल्यांना गारद करून सोडेल असे हे अस्त्र आहे! तेव्हा जास्त गमजा नकोत! ऐकलेत तर ठीक, नाही ऐकलेत तर रणांगणात भेटूच. तुमचा. ट्रम्पतात्या.
ता. क. : ‘हूं तमाराज दोस्त छूं, फिकर नथी करवानुं’ असे त्यांनी मला स्वत: फोन करून सांगितले आहे, हे ध्यानी ठेवावे! - तात्या.

मि. ट्रम्पतात्या -
तुमचे लेटर वाचून मजबूत हसलो. तुमचे पत्र आणून देणारा सीआयएचा एजंट प्रशिक्षित आहे, असे तुम्ही म्हणालात. त्याचा चकोट करून परत पाठवणार होतो. पण आम्ही सभ्य आहोत, म्हणून सोडून दिले! हे पत्र त्याच्या हातीच उलट टपाली पाठवतो आहे. त्याची अर्धी मिशी उतरवली आहे. ओळखण्यास अडचण पडू नये म्हणून सांगितले एवढेच.

आमच्या एका सुलेमानीला मारलेत, तर शंभर सुलेमानी पाठोपाठ तयार होतील. आम्ही अमेरिकेला घाबरत नाही. तुमचे कितीही ड्रोन आले तरी त्याचे द्रोण करून पत्रावळीत बांधून परत पाठवू!! त्यासाठी आम्ही अक्षरश: डोळ्यांत तेल घालून उभे आहोत. असो.
तात्या, तुम्ही भलतेच विनोदी आहात, असे ऐकले होते. त्याचा लेखी पुरावा मिळाला. तुमचे अमोघ अस्त्र कळले! नमोअस्त्राला तुम्ही तुमचे अस्त्र म्हणता? कमाल झाली! त्यांच्याघरीच पब्लिक भडकल्याचे कळते आहे. ते काय करणार? तरीही आपल्यातले संभाव्य युद्ध टळावे म्हणून नमोजी यांनी मध्यस्थी केली तर त्याचे आम्ही स्वागत करतो, असे आम्ही आधीच म्हणून ठेवले आहे. माझी दाढी आणि तुमचा कोट ओढून ओढूनच ते मोठे झाले आहेत!

‘येता इराण, जातां मराण’’, एवढे तुम्ही लक्षात ठेवा! तरीही तुमचाच. अयातुल्ला खोमेनी ऊर्फ मेनी मेनी लोकांना खो देऊन बसलेला खोमेनी.

ता. क. : ‘च्यामारी, मैं इराणकाच दोस्त हूं... चिंता मत करो,’ असे नमोजींनी मलाही सांगितले आहे... ही काय भानगड आहे? खो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com