esakal | ढिंग टांग : रंग आपुला एकचि रे!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

दादू : (संतापाने फोन फिरवत) हल्लोऽऽऽ..!
सदू : (शांतपणे फोन उचलत) बोला!
दादू : (फोनमध्ये किंचाळत) सद्याऽऽ...!!!
सदू : (थंडपणे) हळू ओरड! ऐकू येतं मला!
दादू : (खवळून) हे तू चांगलं नाही केलंस!
सदू : (किंचित वैतागून) काऽऽय झालंऽऽ!

ढिंग टांग : रंग आपुला एकचि रे!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

दादू : (संतापाने फोन फिरवत) हल्लोऽऽऽ..!
सदू : (शांतपणे फोन उचलत) बोला!
दादू : (फोनमध्ये किंचाळत) सद्याऽऽ...!!!
सदू : (थंडपणे) हळू ओरड! ऐकू येतं मला!
दादू : (खवळून) हे तू चांगलं नाही केलंस!
सदू : (किंचित वैतागून) काऽऽय झालंऽऽ!
दादू : (शब्द फुटेनासा होत) तू...तू...माझा...आमचा...तू...झ्रुम्बडाफ्रुम खा छो...र्रर्रससस?
सदू : तू टाकलास? मी उचलला!! काय बिघडलं?
दादू : (भानावर येत) झेंड्याबद्दल बोलतोय मी!
सदू : (नेहमीच्या बर्फगार खर्जात) तेच सांगतोय मी! तू टाकलास, मी उचलला!
दादू : (रागारागाने) याचा परिणाम बरा होणार नाही! झेंडा आमचा होता, आहे आणि राहील!
सदू : (आव्हान देत) कोर्टात जा!
दादू : मी जनतेच्या न्यायालयात जाईन!
सदू : (कटकटून) कुठेही जा!
दादू : (राजकारणी आवाजात) सद्या, लेका, तू माझा भाऊ ना? असं कां वागतोस?
सदू : (शहाजोगपणे) मी कुठे काय केलं?
दादू : (तक्रारीच्या सुरात) माझा झेंडा पळवलास!!
सदू : (आव्हानात्मक सुरात) झेंडा तुझा नाही! महाराष्ट्राच्या तमाऽऽम जनतेचा आहे!
दादू : आणि महाराष्ट्रातली जनता माझी आहे!
सदू : (कुत्सितपणे) फू:! ऐकेल कुणी! दगाफटका करून राज्य मिळवलं म्हणून रयत मालकीची होत नसते मिस्टर!
दादू : (खवळून) सद्याऽऽ...तोंड सांभाळून बोल!
सदू : (आणखी डिवचत) चाळीस वर्षं ज्यांच्याशी लढलास, त्यांच्याशीच मांडवळ केलीस! शोभलं का तुला!
दादू : (दुखावलेल्या सुरात) दगाफटका मी नाही केला, आमच्याशी केला! ज्याला आपलं मानलं, त्यानंच केसानं गळा कापल्यावर काय करायचं? होय, मी केली सोयरीक गनिमाशी! पण ती महाराष्ट्राच्या रयतेच्या भल्यासाठीच केली ना?
सदू : (उडवून लावत) ते काहीही असेल! झेंडा आता आमचा झाला! तुम्ही बसा गनिमाचे झेंडे नाचवत! 
दादू : (काय बोलायचे ते न सुचून) पहिल्यापास्नं तुझी लक्षणं असलीच! कधी भरवशाचा वाटला नाहीस! तुझ्या आधीच्या रंगीबिरंगी झेंड्याचं काय झालं? तो बरा होता की!
सदू : (गंभीरपणे) ॲक्‍चुअली, सुरुवातीपासून माझ्या मनात हाच झेंडा होता! पण, सोशल इंजिनिअरिंगसाठी मला तो रंगीत झेंडा घ्यावा लागला!
दादू : (मखलाशी करत) झेंडे बदलून काही होत नाही रे सदूराया! विचारधारा महत्त्वाची!!
सदू : (खोखो हसत) काय सांगतोस! दादूराया, बालिष्टर का नाही रे झालास?
दादू : (गोरेमोरे होत) चेष्टा करू नकोस! खरं ते सांगतोय! ऐन वक्‍ताला राजकारणातले डावपेचच कामाला येतात! झेंडा-बिंडा काही खरं नाही!!
सदू : (गमतीनं) मग कशाला इश्‍यू करतोस? देऊन टाक की झेंडा मला! नाही तरी तू टाकूनच दिला होतास!
दादू : (निक्षून सांगत) मी झेंडा टाकलेला नाही! नाही! नाही!! आमचा रंग आणि अंतरंग अजूनही भगवंच आहे!!
सदू : (थट्टेखोरपणे) दाखव बरं!
दादू : (गोंधळून) असं कसं दाखवता येईल ते? 
सदू : (आव्हान देत चेवाने) दाखव! दाखव ना! सिद्ध कर की तुझा रंग आणि अंतरंग भगवंच आहे अजून!!
दादू : मी सांगतोय ना, आहे म्हणून! बास!!
सदू : (समजूत घालत) झालं ते झालं! आता असू दे झेंडा माझ्याकडेच! इतके दिवस तू वापरून बघितलास... आता काही वर्षं मी बघतो! शेवटी आपण काहीही झालं तरी भाऊ-भाऊच ना? जय महाराष्ट्र.