esakal | ढिंग टांग : छप्पर फाडके मुलाखत!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-tang

मा. मु. साहेबांची मुलाखत आम्ही घेतली. ही मुलाखत एवढी स्फोटक होती की त्यामुळे महाराष्ट्र हादरला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत घबराट उडाली. इतकी की ‘मुलाखत थोडी कमी तिखट करत जा,’ असा सल्ला आम्हाला देण्यात आला. त्याप्रमाणे आम्ही मुलाखतीच्या आगजाळ रश्‍शात थोडा गूळ घातला!! ही गूळ घातलेली मुलाखत आम्ही वाचकांसाठी अंशत: देत आहो! पूर्ण मुलाखत वाचली तर वाचकांना भलभलत्या व्याधी जडतील आणि एका जागी बसणे मुश्‍कील होईल, म्हणून ही दक्षता घेण्यात येत आहे.

ढिंग टांग : छप्पर फाडके मुलाखत!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

मा. मु. साहेबांची मुलाखत आम्ही घेतली. ही मुलाखत एवढी स्फोटक होती की त्यामुळे महाराष्ट्र हादरला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत घबराट उडाली. इतकी की ‘मुलाखत थोडी कमी तिखट करत जा,’ असा सल्ला आम्हाला देण्यात आला. त्याप्रमाणे आम्ही मुलाखतीच्या आगजाळ रश्‍शात थोडा गूळ घातला!! ही गूळ घातलेली मुलाखत आम्ही वाचकांसाठी अंशत: देत आहो! पूर्ण मुलाखत वाचली तर वाचकांना भलभलत्या व्याधी जडतील आणि एका जागी बसणे मुश्‍कील होईल, म्हणून ही दक्षता घेण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुलाखत दिलखुलास, खेळीमेळीच्या वातावरणात आणि सडेतोड झाली, हे ओघाने आलेच! साहेबांची मुलाखत अशीच असते. वाचा! (आणि भोगा फळे!!) :
आम्ही : (कोचावर नम्रपणे ऐसपैस पसरत) वडे, भजी मागवा काहीतरी!
साहेब : (शिवशिवणारा हात रोखत) आधी प्रश्‍न विचारा!
आम्ही : (सहजपणे)...सध्या काय चाल्लंय?
साहेब : (कोचावर चोरून बसत) आराम!
आम्ही : (च्याट पडत) आराम?
साहेब : (दिलखुलासपणे) परवाच महाबळेश्‍वरला तीन दिवसांसाठी गेलो होतो...
आम्ही : चंगळ आहे एका माणसाची! सिनेमे काय, महाबळेश्‍वर काय..! मागल्या दाराने थेट सत्तेत आलात...
साहेब : (गंभीरपणे) मागल्या दारानं कशाला येऊ?
आम्ही : (कुतुहलाने) मग?
साहेब : (शांतपणे)...छपरातून पडलो!
आम्ही : (इथे अनवधानाने वर बघत) अस्सं होय!
साहेब : (करड्या सुरात) पुढले प्रश्‍न विचारा!
आम्ही : कारभार व्यवस्थित सुरू आहे ना? महाराष्ट्रातल्या जनतेला उत्तरं द्यावी लागणार आहेत, म्हणून विचारतोय!
साहेब : (खांदे उडवत) हा प्रश्‍न तुम्ही राष्ट्रवादीवाल्या दादासाहेबांना विचारा!
आम्ही : (खवचटपणे) अचानक सत्तेत आल्याचा धक्‍का पचवताय वाटतं सध्या!!
साहेब : (कठोरपणे) आम्ही धक्‍के देतो, पचवत नाही!! राजकारणात थोडीफार धक्‍काबुक्‍की व्हायचीच!
आम्ही : (चिकित्सकपणे) कुणी कुणाला धक्‍का दिला आणि कोणी कोणाला बुक्‍की दिली? 
साहेब : (मूठ आवळत) नीट विचारा प्रश्‍न...नाहीतर तुम्हालाच बुक्‍की देईन!
आम्ही : (सावरून बसत) सॉरी! तुमच्या जुन्या मित्राने वचनभंग केला म्हणून नाइलाजाने तुम्ही सत्ता स्वीकारलीत, असं तुम्ही म्हणाला होता! ‘हिंदुत्व कुणाची मालमत्ता नाही आणि आम्हाला कोणी नैतिकता शिकवू नये’ असंही तुम्ही म्हणाला होता...
साहेब : (गोंधळून) मी म्हणालो होतो?
आम्ही : (ठामपणाने) अर्थातच! उगीच प्रश्‍न विचारतोय का? सांगा, सत्तेत का आणि कसे आलात?
साहेब : सांगितलं ना मघाशी...छपरातून उतरलो!!
आम्ही : तुम्ही निवडणूक लढवणार आहात का?
साहेब : (मवाळपणे) कशाला उगाच?
आम्ही : सांगितलंच पाहिजे! आज महाराष्ट्राला कळलं पाहिजे की राज्य बदललं आहे! आपलं सरकार आलं आहे! शब्द मोडणाऱ्यांना चांगला दणका मिळाला आहे! हिंदुत्व काही कुणाची मालमत्ता नाही! कुणीही नैतिकता वगैरे आम्हाला शिकवू नये...वगैरे वगैरे! सांगा की सांगा!
साहेब : भले! तुम्हाला तर सगळंच माहीत आहे! 
आम्ही : (हनुवटीवर तर्जनी ठेवत स्टायलीत) उत्तरं माहीत असल्याशिवाय आम्ही प्रश्‍न विचारत नसतो!!
साहेब : (खवळून) हो ना! मग तुम्हीच प्रश्‍न विचारा आणि तुम्हीच उत्तरं द्या! 
आम्ही : (सावध होत) असं कसं चालेल? तीन दिवस चालणार आहे ही म्यारेथॉन मुलाखत!
साहेब : (ताडकन उठत) तुम्हाला आत सोडलं कोणी?
आम्ही : (ओशाळून) त्याचं काय आहे...आम्हीसुद्धा छपरातूनच आलो!! जय महाराष्ट्र!!