ढिंग टांग : पाठिंबा की विरोध?

CAA
CAA

सदू : (फोन फिरवत) म्यांव म्यांव, म्यांव म्यांव!
दादू : (अनवधानाने) छुत छुत! कोण बोका फोन करतोय?
सदू : (आपल्या सुप्रसिद्ध खर्जात) दादूराया, मी बोलतोय...मी!
दादू : (चतुराईने) बोला सदूशेठ!
सदू : (खुदकन हसत) आवाज ओळखलास वाटतं!
दादू : (संयमानं) महाराष्ट्राच्या कारभाऱ्याशी बोलतोयस तू, हे विसरू नकोस! मी सगळ्यांचे आवाज ओळखून आहे!

सदू : (सहज चौकशी केल्यागत) काय चाललंय सध्या?
दादू : (बजावल्याच्या सुरात) तूसुद्धा माझी त्या संजयाजी राऊतांसारखी मुलाखत घेणार आहेस का? तेसुद्धा मुलाखतीची सुरुवात अशीच करतात- ‘‘काय चाललंय सध्या?’’ ‘का-ही-ही चाललेलं नाही,’ हे त्याचं उत्तर आहे! शिळोप्याच्या गप्पा मारायला फोन केला असशील तर लग्गेच ठेव! मी आता पहिल्यासारखा मोकळा नसतो! काम वाढलंय?
सदू : (हेटाळणीच्या सुरात) उगीच टेपा लावू नकोस! सिनेमे तर बघत असतोस! गेल्या आठवड्यात ‘तान्हाजी’ बघायला गेला होतास! बरा वेळ मिळतो तुम्हाला सिनेमे बघायला!
दादू : (उलटा टोमणा हाणत) तुझ्यापेक्षा नक्‍कीच ज्यास्त बिझी आहे मी! कळलं?
सदू : (विषय बदलत) तुला एक शंका विचारायची होती...
दादू : (मनगटावरल्या घड्याळात बघत) यु हॅव थ्री मिनिट्‌स...आप का समय शुरू होता हय..अब! विचार!!
सदू : (मुद्याची गोष्ट काढत) तुझा सीएएला पाठिंबा आहे की विरोध?
दादू : (बुचकळ्यात पडत) कुठला सीए?
सदू : (शांतपणे) सीएए! सुधारित नागरिकत्त्व कायदा!!
दादू : (सावध होत) का? असं का विचारतो आहेस?
सदू : (मानभावीपणाने) काही गोष्टी कशा क्‍लीअर हव्यात! 
दादू : (ठामपणाने) आमचं सगळं क्‍लीअरच असतं! 
सदू : (हेका न सोडता) सांग ना... सीएएला तुझा विरोध आहे की पाठिंबा?
दादू : (मिनिटभर विचार करत) माझी मॅरेथॉन मुलाखत वाचलीस ना?
सदू : (संयम ठेवत) नाही! मीसुद्धा ते वृत्तपत्र वाचत नसतो! तू सांग!
दादू : (वैतागून) जो येतो तो मी ते वृत्तपत्र वाचत नाही असं सांगतो! मग ते वाचतं तरी कोण? लेको, चोरून वाचता, हे कबूल करा आधी!
सदू : (गाडी विषयावर आणत) सीएएबद्दल तुमची भूमिका सांगा! ती जाणून घेणं ही महाराष्ट्राची गरज आहे!
दादू : (चिंतनशील सुरात) सीएए हा कायदा तितका काही वाईट नाहीए! पण तितकासा चांगलाही नाहीए! इन फॅक्‍ट, सीएए असला तरी चालेल किंवा फॉर दॅट मॅटर नसला तरी चालेल!
सदू : (चेवात येत) याचा अर्थ तुझा छुपा विरोधच आहे...हो ना?
दादू : (पोक्‍तपणे) असंच काही म्हणता येणार नाही!
सदू : (आणखी चेवात येत) याचा अर्थ तुझा छुपा पाठिंबा आहे...बरोबर?
दादू : (खांदे उडवत) असं कुठं म्हटलंय मी?
सदू : (कपाळावर हात मारत) म्हंजे विरोधही नाही आणि पाठिंबाही नाही?
दादू : (गालातल्या गालात हसत) करेक्‍ट! समोर असतास तर आत्ता न मागता टाळी दिली असती!
सदू : (निषेधाच्या सुरात) तू स्पष्ट उत्तर दिलं नाहीस! तुझा सीएएला पाठिंबा आहे की विरोध, हे शेवटपर्यंत कळलं नाही!! महाराष्ट्र अंधारात राहिला!!
दादू : (संशयानं) पण तुला का इतकी घाई झाली आहे?
सदू : (सुस्कारा सोडत) कारण तुझ्या भूमिकेवर माझं पुढलं धोरण ठरणार आहे म्हणून! कळलं?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com