ढिंग टांग : तेरा झाडू चल गया...!

Dhing-Tang
Dhing-Tang

स्थळ : सात लोककल्याण मार्ग, न्यू डेल्ही.
दाराची घंटी वाजते. योगासनात रमलेले मा. नमोजीभाई दार उघडतात. ‘‘कॉण जोईये?’’
‘‘कचरा!’’ दारात उभा असलेला एक टोपीवाला गरीब आवाजात उत्तर देतो. त्याच्या हातात झाडू आहे. दुसऱ्या हातात बादली आहे. सदर गृहस्थ हा ‘इसम’ वर्गात मोडतो, हे दिसतेच आहे. नमोजीभाई त्याला पाहून खूश होतात. स्वच्छ भारत अभियानातला कुणी निष्ठावंत कार्यकर्ता असावा, असे वाटून ते थोडेसे सद्‌गदितदेखील होतात.

कष्टकरी माणसे बघितली, की त्यांना नेहमी अस्सेच होते. याच लोकांचा सेवक म्हणून आपण व्रत घेतल्याची ते स्वत:ला आठवण करून देतात.

‘‘कचरा तो नथी मारी पासे, भाई! मी माझा कचरा स्वत:च साफ करते!’’ नमोजीभाई कनवाळू सुरात खुलासा करतात. तरीही तो गरीब इसम जागचा हालत नाही. थोडेसे खाकरून, खोकून तो पुन्हा ‘कचरा’ मागतो.

‘‘अरे, सांगितला ना, नाय हाय कचरा! ओला कचरा, सुख्खा कचरा...बद्धा सेपरेट करून पाठवला! जुओ, बद्धा साफसूफ छे...छे ने?’’ नमोजीभाई शांतपणे समजावून सांगतात. त्या गरीब सफाईवाल्या इसमाला आपण कोण आहोत, हे माहीत नसावे, असाही संशय त्यांना येऊन जातो.

‘‘कुछ तो कचरा होगा घर में?’’ त्या गरीब इसमाने आपला हेका चालूच ठेवला आहे. इथे नमोजीभाईंची खिट्‌टी थोडी सटकते. देशभर लाखो शौचालये बांधणाऱ्या, हाती झाडू धरून अवघा देश झाडून काढणाऱ्या माणसाकडे कचरा कुठून असणार? या अज्ञानी इसमाला कोणी समजवावे? पण तरीही नमोजीभाई काही बोलत नाहीत. गरीब माणसाशी ते अतिशय नम्रतेने बोलतात. कारण ते त्याचेच सेवक म्हणून काम करतात, असे त्यांचे मत आहे.

‘‘भाई, बोला ना, तमे अहियांथी कचरा नथी मळवानुं! तमे रास्ताउप्पर जावो, त्यां बऊ कचरा छे!’’ एवढे बोलून नमोजीभाई दार लावण्याचा प्रयत्न करतात. पण तो गरीब सफाईवाला चपळाईने आपला पाय दारात घालतो. नमोजीभाई हतबुद्ध होतात. एका य:कश्‍चित माणसाची ही डेअरिंग? नमोजीभाई थक्‍क होऊन बघत राहतात. 

‘‘नमोजीभाई, मुझे पहचाना नही क्‍या? मैं अरविंद!!’’ तो गरीब इसम नम्रपणे खदाखदा हसत सांगतो. नमोजीभाई आणखीनच हादरतात. काही ओळखाण लागते का, ते बारकाईने बघतात. अरेच्चा! होक्‍की!! आ तो आम आदमीवाळा अरविंदभाई केजरीवाल छे!! पती गयो रे, पती गयो!! 

‘‘अहियां शुं काम छे?’’ सावध होऊन नमोजीभाई विचारतात. त्यांनी अजूनही दाराच्या कडीवरच आपले हात जय्यत तयार ठेवले आहेत. संधी मिळताच ते दार बंद करणार आहेत.

‘‘तुम हमें कचरा दो, हम तुम्हे मिठाई देंगे!’’ आम आदमी ऊर्फ अरविंद केजरीवाल विजयी मुद्रेने सांगतात.

‘‘मने नथी जोतु तमारी मिठाई!’’ घुश्‍शात नमोजीभाई ओरडतात. त्यांना आता निक्षून दार बंद करून घ्यायचे आहे, पण शक्‍य होत नाही.

‘‘तुम्हारा शाहीनबाग का प्रयोग फेल हो गया! मुझे आपने आतंकवादी और अराजकवादी कहा, वो भी फेल हो गया! आपने जितना कूडा कचरा फेंका, मैंने सब इकठ्‌ठा किया! सुखा कचरा सुखा रख्खा, गिला कचरा गिला रख्खा! देखो, मैंने आपकी दिल्ली पूरी साफ कर दी!’’ आम आदमी ऊर्फ केजरीवाल नम्र फुशारकी मारतात. मिठाई देऊन झाडू मारत निघून जातात.

...आम आदमीने दिलेल्या मिठाईच्या खोक्‍याची ओल्या कचऱ्यात विल्हेवाट लावावी की सुक्‍या कचऱ्यात, अशा गोंधळात नमोजीभाई नुसतेच उभे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com