esakal | ढिंग टांग : ढाई अक्षर..! (एक सांगीतिका)
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

सूर : चिरका. ताल : बेताल.
राग : चिक्‍कार. चाल : तिरकी.
पात्रे : नायिका : चि. सौ. कां. कमळाबाई आणि नायक : अँग्री यंग मॅन दादासाहेब बारामतीकर.

ढिंग टांग : ढाई अक्षर..! (एक सांगीतिका)

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

सूर : चिरका. ताल : बेताल.
राग : चिक्‍कार. चाल : तिरकी.
पात्रे : नायिका : चि. सौ. कां. कमळाबाई आणि नायक : अँग्री यंग मॅन दादासाहेब बारामतीकर.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कमळाबाई : 
(किनऱ्या आवाजात मुसमुसत)
तुज आठवते का?
ती पहाट त्या रात्रीची... 
तुज आठवते का?
त्या दिल्या घेतल्या शपथा 
आणिक बाईट टीव्हीचा... तुज आठवते का?।।धृ।।
(रिपीट)
जुने जाऊ द्या मरणांलागुनी
जुनी प्रीत ती जळो इमानी
पाठित खंजीर खुपसुनी तेव्हा
तुटल्ये होते मणक्‍यामधुनी
तुज आठवते का?।।१।।
दादासाहेब : (नायकाचे पात्र अत्यंत गद्यच असल्यामुळे हे गद्यातच म्हणावे!) हे बघा, मला काहीही आठवत नाही, आणि आठवायचं पण न्नाही!! तुम्ही ज्जा!!
कमळाबाई : (मुसमुसत कंटिन्यू...)
रडुनी काढिली रात्र सख्या रे
काडिमोड तो लागी जिव्हारे
सांगाती तो जुना जाणता
तोडुनि नाते होई पसारे
तुज आठवते का?।।२।।
दादासाहेब : (कोरड्या सुरात) होतं असं कधी कधी! चालायचंच!
कमळाबाई :
अशा अवेळी कठिण प्रसंगे
धावुनी आला तो शिरीरंगे
आणि म्हणे हळुवार तेधवा
‘‘मी आहे की तुझ्याच संगे’’
तुज आठवते का?।।३।।
दादासाहेब : (गोरेमोरे होत्साते) तो मी नव्हेच!!!
कमळाबाई : 
(हंबरड्याच्या लेव्हलला...)
रातभराची गोड बोलणी
किती गाईली गुंजनगाणी
आणि पहाटे भलत्या वेळी
शपथ वाहिली दोघांनी झणी
तुज आठवते का?।।४।।
दादासाहेब : (दात ओठ खात) जा ना आता! किती जीव खातीस!!
कमळाबाई : (करुण स्वरात)
हाय परंतु, चुकल्या गल्ल्या
हरवून गेल्या प्रीती किल्ल्या
शपथेनंतर सख्या तूचि रे
अश्‍वासह सूंबाल्या केल्या!
तुज आठवते का?।।५।।
दादासाहेब : (स्मृतिभ्रंश झाल्याचा अभिनय करत) मैं कहां हूं? कौन हूं?
कमळाबाई : (प्रीतियाचना करत)
नको नको रे सखया आता
मारु नको ना उगाच बाता
स्वीकारी मम फूल गुलाबी
परतावे अन स्वगृही नाथा!
परतावे अन स्वगृही नाथा!
(दादासाहेब इथे टेबलाखाली लपण्याचा खटाटोप करतात!)
कमळाबाई : (हेका आणि ठेका न सोडता चाल बदलत)
अडीच अक्षरे प्रेमाची हो, अडीच अक्षरे प्रेमाची, तुमच्यासाठी स्वस्त लाविते, लाल फुले गुलाबाची! पुन्हा येऊनी रहा स्वगृही, जोडीने संसार करू धडा शिकवूया व्हिलनांना अन्, पुढे सुखाने राज्य करू! बाई, राज्य करू!
दादासाहेब : (निष्ठुरपणे घोगऱ्या आवाजात...अर्थात कानावर एक हात ठेवून!)
नको नको गं कमळाबाईऽऽऽ मला नको गे तुझा गुलाऽऽब आ आ आ आआ आऽऽऽ... मनधरणी जरि कितीही केलीस, असेल माझा ‘नाही’ जबाऽऽब! गं गं गं गं...गं...दाजी रं!
अडिच अक्षरे प्रेमाची तूऽऽ, सांगत फिरतीस जनलोकीऽऽऽ आ आ आ आआ आऽऽऽ... ‘सत्ता’ असते अडिच अक्षरी, हेच सत्य गं तिन्हिलोकीऽऽऽ... गंगंगंगंगं...दाजी रं!