ढिंग टांग : थोडे तुझे, थोडे माझे!

Dhing-Tang
Dhing-Tang

दादू : (आनंदी सुरात)...सद्या, सदूराया!
सदू : (थंड सुरात) जय महाराष्ट्र! तुझी तीन चाकी रिक्षा बरी चाललीये ना?
दादू : (खिजवल्याच्या सुरात) बेस्ट! काहीही प्रॉब्लेम देत नाही! तुझ्या इंजिनाचा मात्र बट्ट्याबोळ झाला...ना?
सदू : (ठामपणाने) मुळीच नाही! इंजिनाचं सर्व्हिसिंग चालू आहे! तुझ्या रिक्षाला ‘धक्‍का स्टार्ट’ करायला आणखी दोघे जण लागतात! माझं इंजिन मी एकटा चालवतो!

दादू : (सावरून घेत) धक्‍का स्टार्टची गरज पडत्ये हे खरंय! पण एकदा गाडी चालू झाली की ऐक्‍कत नाही! हवासे बातें करने लागती हय!! 
सदू : (जळफळाट व्यक्‍त करत) हवाच आहे सगळी!! बाकी काहीही नाही!! पण पहिल्या गिअरमध्ये किती वेळ चालवणार?
दादू : (बेफिकिरीने) चालेल तितकी चालेल रे! तू तुझं बघ आधी!! तुझ्या इंजिनाला एकही डबा नाही अजून!! नुसतं यार्डात पडलंय! हाहा!!
सदू : (प्रयत्नपूर्वक संयम बाळगत) एकदा डबे लागले की मग बघ! ऐकणार नाही कुणाला! 
दादू : (आव्हान देत) आमच्या तीनचाकी उद्योगाला दृष्ट कशाला लावतोस? चांगलं चाललंय आमचं!
सदू : (गंभीर सुरात) मला तर फार दुर्दैवी वाटते तुमची तीन चाकी आघाडी! कोण कोणाबरोबर युती करतंय, आणि कोण कोणाबरोबर चाललंय! कशाला काही अर्थ नाही!! कारभार कोण करतोय, हेच कळत नाही! मालक एक, गल्ल्यावर दुसराच, आणि बिलं गोळा करणारा तिसराच! सरकार आहे की धर्मशाळा!!
दादू : (संतापून) तोंड सांभाळून बोल, सद्या!!
सदू : (सफाईने विषय बदलत) बाय द वे, तुमचा नाणार प्रकल्पाला विरोध आहे की पाठिंबा?
दादू : (सावध होत) का रे? तुझा आहे...पाठिंबा?
सदू : (आतल्या गाठीचा आवाज...) सहज विचारलं! माझा पाठिंबा आहे की नाही, हे मी अजून ठरवलेलं नाही! (स्वत:शीच) तशा मी बऱ्याच गोष्टी अजून ठरवलेल्या नाहीत म्हणा!
दादू : (करारी आवाजात) कोणाची माय व्यालीये, नाणार प्रकल्पाला समर्थन देण्याची? हा दादू जोवर उभा आहे, तोवर त्या नाणारच्या जमिनीवर विटेचा तुकडासुद्धा राहणार नाही! नाणार, होणार नाही, नाणार जाणार...उभा नाही राहणार!!
सदू : (राजकीय सुरात) तुमच्या तीन चाकी रिक्षातले पाशिंजर म्हणाले की होऊंजाऊ द्यात!...तर?
दादू : (गुळमुळीत) असं कशाला म्हणतील ते? मी त्यांचं ऐकतो, ते माझं ऐकतात!!
सदू : (मखलाशी करत) त्यांचं सोड...तुमच्या पार्टीतले कार्यकर्तेच आता ‘नाणार प्रकल्प व्हायलाच पाहिजे,’ असं म्हणायला लागले आहेत!
दादू : (संतापून) अस्सं? नाणारला ज्यांचा पाठिंबा असेल, त्यांना...त्यांना...त्यांना चेचीन म्हणावं!
सदू : (खट्याळपणे) जाऊ दे! उगीच रागावू नकोस! जे व्हायचं असेल ते होईलच! तू आपला झोप पाहू?
दादू : (नरमाईने) चालेल! तूसुद्धा झोप हं सदूराया!! उगीच कशाला डोक्‍याला ताप करून घ्यायचा? काहीही झालं तरी आपण भाऊ भाऊच ना?
सदू : (नम्र सुरात) खरं आहे, दादूराया! 
दादू : (प्रेमाने) थोडं तुझं, थोडं माझं...असंच आपलं चालू राहू दे! शेवटी महाराष्ट्र आपलाच तर आहे!!
सदू : (घाईघाईने) ओके! गुडनाईट!
दादू : (अचानक साक्षात्कार होत) सद्या, गुड नाइट काय? माझी चादर का पळवतोस? आणून दे आधी!!
सदू : (निर्धाराने) तुझी कुठली? माझीच आहे ती!! गुड नाइट!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com