esakal | ढिंग टांग : झुंज!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

कमरेवर धीरोदात्त बाहू ठेवून
गवाक्षाकडे तोंड करून
मग्न उभ्या असलेल्या
कर्नल एन्फ्लुएन्झाने
चाहूल लागलेल्या पावलांची
मुळीच घेतली नाही दखल.

ढिंग टांग : झुंज!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

कमरेवर धीरोदात्त बाहू ठेवून
गवाक्षाकडे तोंड करून
मग्न उभ्या असलेल्या
कर्नल एन्फ्लुएन्झाने
चाहूल लागलेल्या पावलांची
मुळीच घेतली नाही दखल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘‘राजकन्या चिकनगुनिया
आपणांस याद करीत आहे’’,
असा सांगावा देऊन 
अदबीनेच अदृश्‍य झालेल्या
प्रतिहारीकडे लक्ष न देता
कर्नल एन्फ्लुएन्झाने
मनोमन काही ठरवले...

-राजकन्या चिकनगुनियेची
तब्येत हल्ली बरी नाही,
-जनरल लेप्टोस्पायरोसिसने तर
पर्जन्यकाळापर्यंत आपण उपलब्ध
नसल्याचे कळवूनच टाकले आहे,
-कॅप्टन कंजक्‍टिवायटिसच्या 
गनिमी कारवायांनी देखील
उच्छाद मांडला असला, 
तरी साम्राज्यवाढीसाठी तो 
खचितच पुरेसा नाही...
-बर्ड फ्लू आणि स्वाइन फ्लूच्या
गुरिला हल्ल्यांची धार 
आताशा कमीच झाली आहे...

सम्राट डेंगीच्या कानावर
फौजेची अवस्था घालायला हवी...
असे ठरवून अखेर 
कर्नल एन्फ्लुएन्झाने
दरबाराकडे केले कूच.

‘‘सम्राटांचा विजय असो!
उन्हाळकाळामुळे युद्धाचे
रणशिंग फुंकण्यात अर्थ नाही.
सबब, संपूर्ण संसर्गसेनेला
तूर्त भरपगारी सुप्त सुट्टी
जाहीर करावी...’’ मान लववून
कर्नल एन्फ्लुएन्झाने सूचना केली.

ती ऐकून विषाणूराज सार्सच्या
कुमुखावर छद्‌मी हास्य आले.
वृद्ध ले. जनरल (नि.) अँथ्रॅक्‍सच्या
शुभ्र अमंगळ दाढीतही एक
कुत्सित मुद्रा दडून हसली.
पितामह गुरू ट्यूबरक्‍युलोसिसच्या
पायघोळ झग्याची अस्वस्थ
हालचाल झाली, परंतु,
ते काही बोलले नाहीत...

दरबारातील बाकीचे ‘साथी’दार
हात बांधून उगेमुगे उभे राहिले, आणि
मोठ्या अपेक्षेने सिंहासनाकडे
बघू लागले...

वयोवृद्ध सम्राट डेंगीने 
अस्वस्थपणे चुळबुळत पाहिले
राजमाता मलेरियाकडे.
चुळबुळत पाहिले...

एक हात उंचावून
किंचित खाकरून
राजमाता मलेरिया म्हणाली :
‘‘साथीयों ! हे काय चालले आहे?
आपल्या साम्राज्याच्या सरहद्दी
आकुंचित होताना पाहून
तुम्हाला काहीच कसे वाटत नाही?
की संसर्गशाहीत काही
वीरताच उरलेली नाही?
है कोई माई का लाल?
जो कर सके हैं,
इन मनुष्योंका खात्मा?’’

दरबारात असह्य शांतता पसरली...
तेवढ्यात-
ताडताड पावले टाकत
तरणाबांड प्रिन्स कोरोना
छाती काढून राहिला उभा.
राजमाता मलेरिया आणि 
सम्राट डेंगीसमोर गुडघ्यावर
बसून त्याने सपकन 
ओढले तलवारीचे पाते
आपल्या अंगुळीवर
म्हणाला : ‘‘मैं हूं..!’’

‘‘जय हो! जय हो!’’ प्रिन्स करोनाचा 
एकच जयजयकार झाला...

तात्पर्य : कुठल्याही हाहाकाराआधी
कुणाचा तरी जयजयकार 
होतच असतो!