esakal | ढिंग टांग : हा खेळ सावल्यांचा!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

दादू : (फोन लावत) हलोऽऽ....जय महाराष्ट्र!
सदू : (थंडपणे फोन उचलत) जय महाराष्ट्र! बोल दादूराया!
दादू : (सद्‌गदित होत) नुसत्या ‘जय महाराष्ट्र’वरून ओळखलास की रे माझा आवाज!
सदू : (थंडपणेच...) न ओळखायला काय झालं? तुझा फोन आला नाही, तरी मी तुझा आवाज ओळखीन!

ढिंग टांग : हा खेळ सावल्यांचा!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

दादू : (फोन लावत) हलोऽऽ....जय महाराष्ट्र!
सदू : (थंडपणे फोन उचलत) जय महाराष्ट्र! बोल दादूराया!
दादू : (सद्‌गदित होत) नुसत्या ‘जय महाराष्ट्र’वरून ओळखलास की रे माझा आवाज!
सदू : (थंडपणेच...) न ओळखायला काय झालं? तुझा फोन आला नाही, तरी मी तुझा आवाज ओळखीन!
दादू : (विषयाला हात घालत) सध्या पुन्हा बिझी झालायस म्हणे! चांगलंय! रिकामं मन सैतानाचं घर असतं...बरं!!
सदू : (संशयानं) मी नेहमीच बिझी असतो!
दादू : (खेळक़र सुरात) काहीही हं सद्या! ऐकेल कुणी!! मला वाटलं की नेहमीप्रमाणे तुझी बिझी असण्याची हीसुद्धा एक अफवाच! हाहा!!
सदू : दादू! आब राखून बोल! आम्हालाही बोलता येतं!!
दादू : (चावट सुरात) बाय द वे, हार्दिक अभिनंदन!
सदू : (दाट संशयानं) कसलं?
दादू : (चिडवत) झालं ना एकदाचं तुमचं मंत्रिमंडळ स्थापन!! बरेच दिवस ऐकून होतो...
सदू : छे, काहीतरीच!...मंत्रिमंडळ स्थापन करणारे तुम्ही! ते आम्ही कशाला स्थापन करू?
दादू : (खट्याळपणे) तुमचं शॅडो क्‍याबिनेट आहे ना!! त्याबद्दल बोलतोय मी!
सदू : (किंचित ओशाळत) ते होय! ते आपलं असंच स्थापन केलंय!! ‘सरकार, सरकार’ खेळतोय, असं समज! 
दादू : (पोक्‍तपणाने) कशाला उगीच भातुकलीचा खेळ करायचा सदूराया! महाराष्ट्रात कामं का कमी आहेत!!
सदू : दोन कारणांसाठी शॅडो क्‍याबिनेटची योजना केलीये! एक म्हंजे तुमच्यावर बारीक लक्ष ठेवायला आणि दुसरं, आमच्या लोकांनाही थोडी नेट प्रॅक्‍टिस मिळेल म्हणून! अचानक सत्ता आली तर आमचे मंत्री तयार असले पाहिजेत ना!  
दादू : (हसू आवरत) सदूराया, लहानपणापासून तुझी विनोदबुद्धी जबरदस्त हां! उगाच नाही, कार्टुनिस्ट झालास!!
सदू : दादू, खबरदार, आमच्या शॅडो क्‍याबिनेटविरुद्ध काही बोलशील तर! एकही वाकुडा शब्द आम्ही खपवून घेणार नाही! तुमच्या खऱ्याखुऱ्या मंत्र्यांना आम्ही आता कसे सळो की पळो करतो, ते कळेलच आता!!
दादू : (भाबड्या सुरात) तुमच्या शॅडो क्‍याबिनेटच्या शॅडो मीटिंगासुद्धा होणार का रे?
सदू : (ठामपणाने) अर्थात!
दादू : (आणखी भाबडा सूर लावत) तुमचं शॅडो मंत्रालय कुठे आहे?
सदू : (गडबडून) ते...ते...अजून ठरायचंय!
दादू : (प्रश्‍नांची सरबत्ती करत) तुमचा उपमुख्यमंत्री कोण? तुमचा क्‍याबिनेट सचिव कोण? फायलींवर सह्या कोण करणार? शपथविधी झाला का?
सदू : (काही काळ गप्प राहून, मग-) सगळं कळेल हळूहळू!! घी देखा लेकिन बडगा नही देखा! 
दादू : (आणखी एक आघात करत) तुमचं विधिमंडळ कुठे आहे? शिवाजी पार्कलाच ना?
सदू : (सर्द होत) कुठे का असेना! तुमच्या मंत्र्यानं तिकडे एवढीशी जरी चूक केली तरी आमचे शॅडो मंत्री ती व्हिडिओ रेकॉर्ड करणार! पुढल्या वेळेला ‘लाव रे तो व्हिडिओ’ तुमच्याबद्दल!! कळलं?
दादू : (उजेड पडत) ओह आय सी! अशी भानगड आहे होय! खातेवाटप झालं का?
सदू : (सांगावे की न सांगावे?) झालं!
दादू : तुमचा शॅडो मुख्यमंत्री कोण?
सदू : (घनगंभीर खर्जात) अर्थात मीच!
दादू : (सुटकेचा निःश्‍वास सोडत) मग हरकत नाही! क्‍येवढं टेन्शन आलं होतं मला! पण तूच आहेस म्हटल्यावर आता काही प्रॉब्लेम नाही! हाहा!! जय महाराष्ट्र!