ढिंग टांग : होली है..!

Dhing-Tang
Dhing-Tang

बेटा : (नेहमीच्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयॅम बॅक!
मम्मामॅडम : (कपाळ चोळत) आलास? बऽऽरं! आता पटकन आंघोळीला जा, झटकन ब्रेकफास्ट करून घे आणि नंतर चटकन आपल्या पक्षाच्या बैठकीला ये!
बेटा : (वैतागून) हॅ:! आल्या आल्या आंघोळीला काय काढता? 
मम्मामॅडम : (समजूत घालत) अरे, होळी खेळून आल्यावर आंघोळ नको का करायला?
बेटा : (नापसंतीने) कसली होळी आणि कसलं काय! इथे कुणाला उत्साहच नाही!!
मम्मामॅडम : (संयमाने) आपला पक्ष पेचप्रसंगातून जातो आहे, बेटा!
बेटा : (हात झटकत) कुठे आहे पेचप्रसंग? उगीच तुम्ही ज्येष्ठ लोक घाबरता!
मम्मामॅडम : एकेक मोठे नेते आपला पक्ष सोडून जायला लागले तर एक दिवस कोणीही उरणार नाही पक्षात!
बेटा : (आरशात बघत आत्मविश्‍वासाने) मैं हूं ना! जब तक मैं हूं, डरना मना है!!
मम्मामॅडम : (कंटाळून) ठीक आहे! मीच काय ते बघते आता! मला बैठकीसाठी निघायलाच हवं! 
बेटा : बाय द वे, मम्मा, होळीचा दिवस असताना इतका शुकशुकाट का? इतना सन्नाटा क्‍यूं है भाई?
मम्मामॅडम : रंगाचा बेरंग झालाय सगळा...म्हणून!
बेटा : (दुर्लक्ष करत) मघाशी मी होळी खेळायला म्हणून आपल्या पक्षाच्या कार्यालयात गेलो होतो, तिथेही सगळ्यांचे चेहरे पडलेले! मी होळीचा प्रसाद म्हणून बुंदीचे लाडू वाटत होतो, पण कुणीही हात पुढे करेना! म्हटलं झालं तरी काय इतकं? इथे ‘१०, जनपथ’ला आलो, तर इथंही तीच परिस्थिती! ऐसा क्‍यूं? 
मम्मामॅडम : (प्रयत्नपूर्वक संयमानं) होळीचा मुहूर्त साधून आपला ज्योतिरादित्य त्या नतद्रष्ट कमळ पार्टीत गेला!
बेटा : काय सांगतेस काय? शक्‍यच नाही! 
मम्मामॅडम : (दु:खाने) यह सच है, बेटा!!
बेटा : (अविश्‍वासाने) सकाळी त्यानेच मला मेसेज पाठवला होता- ‘बुरा ना मानो होली है!’ मीसुद्धा त्याला ‘सेम टु यू’ असा रिप्लाय केला! पक्षकार्यालयात त्याने मला रंगसुद्धा लावला! इन फॅक्‍ट, मला रंग लावणारा तो एकमेव होता! मीसुद्धा त्याला रंगवणार होतो! पण तो ऑलरेडी इतका रंगलेला होता की मी त्याला ओळखलंच नाही!!
मम्मामॅडम : (हतबलतेनं) तुला रंगवणारा इसम ज्योतिरादित्य नसून दुसराच कुणी होता बेटा!
बेटा : (धक्‍का बसून) अनबिलिव्हेबल! इंपॉसिबल!...आयॅम नाऊ हतबल!!
मम्मामॅडम : (कपाळाला हात लावून) तुला ज्याने रंग लावला, तो कमळ पार्टीचा माणूस होता!
बेटा : (संतापाने) मी आत्ताच्या आत्ता ज्योतिरादित्यला पक्षातून काढून टाकीन! (मोबाइलवर मेसेज टाइप करत) हा पहा, काढून टाकला! आता म्हणावं, जा जिथं जायचंय तिथं! मुझे रंग लगाता है, अब तुम जाओ रंग लगाके...!
मम्मामॅडम : (असहायपणे) त्याने आधीच माझ्याकडे राजीनामा पाठवला होता! आता त्याला पक्षातून काढून टाकून काय उपयोग?
बेटा : (हातपाय आपट) तरीही मी त्याला काढणार म्हंजे काढणार! त्याचा राजीनामा तू ॲक्‍सेप्ट करू नकोस! 
मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत) त्यानं काय होणारेय? व्हायचं ते नुकसान झालंच आहे!
बेटा : (करारी मुद्रेने) जो पार्टी सोडून जाईल, त्याला तत्काळ काढून टाकलं जाईल, असं तू ताबडतोब जाहीर कर! पक्षाची शिस्त मोडणाऱ्याला क्षमा नाही! ओके?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com