esakal | ढिंग टांग : राधेश्‍याम तिवारी!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

विषाक्‍त उन्हाच्या 
तळत्या ओझ्याखाली
चेपून, चिरडून निघाले होते 
राधेश्‍याम तिवारीचे भवितव्य.

ढिंग टांग : राधेश्‍याम तिवारी!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

विषाक्‍त उन्हाच्या 
तळत्या ओझ्याखाली
चेपून, चिरडून निघाले होते 
राधेश्‍याम तिवारीचे भवितव्य.

राधेश्‍याम तिवारी नव्हता
इथेही अकेला किंवा अनिकेत,
असंख्य बेकार, बेघर, बेजुबान
राधेश्‍याम
 तिवारींच्या तांड्यातील 
एक होऊन तो चालत राहिला...
चालत चालत चालत चालत
चालत राहिला
 पाय भेंडाळेपर्यंत.
भेंडाळल्यानंतर...
त्याच्याहीनंतर.
शिळ्या विडीच्या थोटकागत
विझलेल्या त्याच्या डोळ्यांत 
संपृक्‍तपणे साकळले होते 
मुलुखातल्या चंद्रमौळी
संसाराच्या अर्धफुटक्‍या
उंबरठ्यावरचे दृश्‍य.

दारवंट्याशी मूकपणे
उभी असलेली लुगाई.
बाजेवर खोकणारा बाप,
आणि मलूलपणे बघणारी
पोटफुगीर पुढील पिढी.

महानगरातून हाकलून दिलेले
आपले अंध:कारमय भविष्य
बोचक्‍यात भरुन ऐन मध्यरात्री
त्याने सोडली वस्ती, याच
एका दृश्‍यासाठी.
होते नव्हते ते किडूक मिडूक
वर्तमान मागे सोडले आहे
राधेश्‍याम तिवारीने, आणि
...तो निघाला आहे चालत
आठशे मैलांवरल्या मुलखातील
आपल्या बीमार भविष्यातील
संसारदृश्‍याकडे.

संकट कटै मिटै सब पीऽऽरा
जो सुमिरे हनुमत बलबीऽऽरा...
गुणगुणत निघालेल्या
राधेश्‍याम तिवारीचे पाय
(थंड चुलीतील सर्पणासारखे)
चालत राहिले ओढीने,
गिळत गेले फर्लांग, 
कोस दर कोस
मागे पडत गेली कुंपण पडलेली
गावे, पाडे, वस्त्या वगैरे.
वस्तीवस्ती मूकपणे 
सांगत होती :
‘मुसाफिरा, ओलांडू नको वेस,
बसू नकोस, पावले वेंच,
माणसाचा नको विटाळ
येईल यमदूताचे किटाळ
नकोय रोगट इन्सानियत
घरात रहा, होशील मयत.
राधेश्‍याम तिवारी निकल जाव
निकल जाव, निकल जाव!’

राधेश्‍याम तिवारी राहिला
चालत निर्ममपणे पुढे पुढे
पावलागणिक मागे टाकली 
त्याने कैक चतकोर स्वप्ने.
नि:शब्दाच्या सोबतीने
तो चालत राहिला...

राधेश्‍याम तिवारीच्या
पावलाशी पाऊल मिसळून
चालणाऱ्या आणखी एका
राधेश्‍याम तिवारीने
पलिकडच्या
 बाजूने चालणाऱ्या
दुसऱ्या एका
 राधेश्‍याम तिवारीला
विचारले : कितने बजे?
हजारो राधेश्‍याम तिवारी
एकमुखाने
 (त्याही अवस्थेत)
त्याला हसले...
खरखरत्या आवाजात
शेवटी राधेश्‍याम तिवारीच
शेजारच्या
 राधेश्‍याम तिवारीला
सहजच म्हणाला :
‘कुछ भी हो, मिट्टी तो
अपनी होनी चाहिए...’

राधेश्‍याम तिवारीच्या
पायपीटीचे सार्थक होवो.