esakal | ढिंग टांग : ज्योत से ज्योत जलाते चलो..!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

आम्ही मुळीच घ...घ...घ...घाबर्लेलो नाही! आम्ही श...श...श...शूर आहो! एका अदृश्‍य शत्रूशी शौर्याने लढणारे य...य...योद्धे आहो! आम्ही मुळीच एकटे नाही. ज्यांना कुणाला एकटे एकटे वाटत असेल त्यांनी तसे वाटून घेऊ नये. कां की तेदेखील एकटे एकटे नाहीत. दुकटे दुकटे आहेत!! आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आमच्या सोबतीला शेजारी आहेत. शेजाऱ्यांच्या सोबतीला त्यांचे शेजारी.

ढिंग टांग : ज्योत से ज्योत जलाते चलो..!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

 आम्ही मुळीच घ...घ...घ...घाबर्लेलो नाही! आम्ही श...श...श...शूर आहो! एका अदृश्‍य शत्रूशी शौर्याने लढणारे य...य...योद्धे आहो! आम्ही मुळीच एकटे नाही. ज्यांना कुणाला एकटे एकटे वाटत असेल त्यांनी तसे वाटून घेऊ नये. कां की तेदेखील एकटे एकटे नाहीत. दुकटे दुकटे आहेत!! आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आमच्या सोबतीला शेजारी आहेत. शेजाऱ्यांच्या सोबतीला त्यांचे शेजारी. त्यांच्याही सोबतीला पुढली वस्ती. मग गाव, शहरे, जिल्हे, राज्ये...सारा देश सोबतीला आहे. देशाच्या सोबतीला इतर सारे देश आहेत. साऱ्या देशांच्या सोबतीला सूर्यमंडळातले सारे ग्रह आहेत आणि ग्रहगोलांच्या सोबतीला सारी आकाशगंगा आहे! मग सांगा, या विश्‍वात कोण आहे एकटे? कोणीही नाही.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘कोई हैऽऽऽ? कुणी आहे का?’ असे विचारण्याची सोयच नाही उरली! पण-
...पण काही लोकांचा यावर विश्‍वासच बसत नाही. त्यांना वाटते की ते लॉकडाऊनच्या काळात आपले कांग्रेसवाल्यांसारखे एकटे एकटेच आहेत. सत्ता गेल्यासारखे एकटेच आपल्या खोलीत बसून उदासपणे (काल रात्री उरलेल्या) शिळ्या भाताला फोडणी देऊन पडेल चेहऱ्याने खात आहेत! लॉकडाऊन का त्यांना एकट्याला आहे? तो तर साऱ्यांनाच आहे.

या कठीण काळात कोणीही एकटे नाही, हाच संदेश आम्ही आता देणार आहो! एकटे एकटे वाटणाऱ्या लॉकडाऊनी लोकांना आम्ही ‘तुम्ही एकटे नाही’ असे आम्ही सांकेतिक खुणेनिशी सांगणार आहो!

इस रविवार को रात को नऊ बजे नऊ मिनिट...आले ना लक्षात?
...आमच्या घराकडे लक्ष ठेवा. आम्ही दिवे घालवू. (पंखे चालू ठेवू!) तुम्हीही घालवा. सगळीकडे अंधार झाला पाहिजे. त्या मिट्ट अंधारात आम्ही एक टॉर्चचा झोत सोडू. मोबाइलमध्ये हल्ली फ्लॅश लाइट असतो. त्याची उघडझाप करू. आम्ही मेणबत्ती शोधायला सुरुवात केली आहे. (परवापर्यंत ड्रावरात लोळत होती. कुठे गेली कुणास ठाऊक!) सापडली, तर तीही पेटवू.

आमच्या घरात दिवा लागला की तुमच्याही घरात तुम्ही लावा. आमचे शेजारी आणि तुमचे शेजारी डिट्टो असेच करतील. अशाप्रकारे वस्त्या, वाड्या, गावे, शहरे, जिल्हे, राज्ये...सारा देश उजळून उठेल!!
ज्योतसे ज्योऽऽत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाऽऽते चलोऽऽ...
छाया है चहुं ओर अंधेऽऽरा, भटक गईं है दिशाऽऽएं...
बन बैठा है दाऽऽनव, किसको व्यथा सुनाऽऽए...
धरती को स्वर्ग बनाऽऽते चलोऽऽओ ओ ओ ओऽऽ!!
...हे गीत मनोमन गुणगुणावे! मनातील अंध:कार दूर पळेल. तेजोमय ज्योत पेटल्याने परिसर शुद्ध होईल. इडा टळेल, पीडा टळेल!!
हे सारे फक्‍त नऊ मिनिटांत साधावयाचे आहे बरे! एक मिनिट ज्यास्त नाही, की कमी नाही. 
 पूर्वीच्या काळी चित्रपटातली रात्रीच्या वेळीही गॉगल आणि कोट-बिट घालून फिरणारी टोळी ‘रेतीबंदर पे माल आया हय’ अशी खबर एकमेकांना देत असत. मग अंधारात टॉर्चची उघडझाप होई. दूर समुद्रात ‘माल’ घेवोनी आलेली होडीसुद्धा दिव्यांची उघडझाप करी. एवढे झाले की ‘माल’ बंदरावर येई...आणि त्याचवेळी चित्रपटाचा हिरो दाणकिनी उडी टाकून संबंधितांची धुलाई करी! आठवतेय ना? तोच फार्म्युला राष्ट्रीय पातळीवर वापरायचा आहे.
दुरितांचा तिमिर घालवायचा आहे आणि खळांची व्यंकटी सांडून ओतून द्यायची आहे. कळले ना? मग भेटू या-
रविवारी रात्री बरोब्बर नऊ वाजता नऊ मिनिटे!...आले ना लक्षात?