ढिंग टांग : भोलू की माँ !

ब्रिटिश नंदी
Saturday, 11 April 2020

रणरणत्या उन्हात सुस्तपणे
पसरलेल्या निर्मनुष्य रस्त्याकडे
पाहात हुंदके देत बसलेल्या
भोलूला अजूनही नीटसे
कळले नव्हते कारण-
पण तो चिक्‍कार 
रागावला मात्र होता...

 रणरणत्या उन्हात सुस्तपणे
पसरलेल्या निर्मनुष्य रस्त्याकडे
पाहात हुंदके देत बसलेल्या
भोलूला अजूनही नीटसे
कळले नव्हते कारण-
पण तो चिक्‍कार 
रागावला मात्र होता...

त्याच्या फुगीर खिशातील
बैदुले पडून आहेत
मेजावरल्या बरणीमध्ये.
रंगीत खोडरबरांचा नायाब
संग्रह निपचित पडून आहे,
कंपासपेटीत, आणि
विरून, वाळून गेला आहे,
जगण्याचाच सारा उभार. 

उघड्या दाराच्या उंबऱ्यावर
पाय सोडून बसलेल्या
लहानग्या भोलूला
आज खुणावत नव्हता
समोरचा मोकळा ढाकळा रस्ता
शेजारपाजारचे मित्र, किंवा
सैपाकघरातला नेहमीचा 
खमंग दर्वळ.

घरातली मोठी माणसे
बसून आहेत आपापल्या
आखून दिलेल्या कोपऱ्यात.
बसली आहेत, टक लावून
बघत अज्ञातातील अदृश्‍य
आणि अटळ भवितव्याकडे.

त्याला माँचा खूप खूप
राग आला होता...

ती परत आल्यावर अज्जिबात
बोलायचेच नाही, असे
मनोमन टाकले त्याने ठरवून,
पण तसे ठरवता ठरवताच
त्याला पुन्हा रडू फुटले...

किती तरी दिवस झाले...
‘ठीकसे रेहना, पप्पाको
तकलीफ मत देना हां!’
असे सांगून (उगीचच)
हॉस्पिटलमध्ये ड्यूटीला
गेलेली भोलू की मां
अजून परत आलेली नाही...

का नाही आली? का?
इतके दिवस घराबाहेर
राहतात का कुणी?
इतके दिवस काम 
करते का कुणी?
इतके क्रूर वागते का कुणी?

हातपाय आपटून रडणाऱ्या 
भोलूला उचलून शेवटी 
पप्पांनी घातले स्कूटरवर,
घट्ट बांधून दिलेला मास्क
सहन करत भोलू उभा राहिला
स्कूटरच्या हॅंडलपाशी...
अननुभूत ओढीने भोलू
आला इस्पितळापाशी,
जिथे माँ राहाते आहे....

पोलिसांच्या हालचालींपल्याड,
मृृत्यूजाळाच्या
 किंचित अल्याड,
अमंगळाच्या सरहद्दीवर
काचेच्या
 कवचापाठीमागे लांबवर
बोट दाखवून पप्पा म्हणाले :
‘‘भोलू, वो देखना माँ!’’
...आणि त्याला माँ दिसली...
 माँ दिसली...माँ दिसली!

जोराजोराने हात हलवून
ओठ आवळून हासणारी
रडणारी, लांबूनच 
कुर्वाळणारी माँ बघून
भोलूचे सुटलेच भान
लाथा झाडत किंचाळत
माँकडे जाऊ पाहणाऱ्या
भोलूचे अचानक झाले
रुपांतर एका टप्पोऱ्या अश्रूत.
जो कसाबसा आवरला
भोलूच्या असहाय बापाने.
तेव्हा-

क्‍वारंटाइनमधल्या
 बीमार मातृत्वाने
दुरुनच फेकला एक
 मायाळ चुम्मा,
आणि जावळावर
 फुंकर घालून तो
कुजबुजला आश्‍वासकपणे: 
‘आहेस तिथेच रहा, सुरक्षित
येऊ नकोस माझ्या कुशीत
आपल्यातले फर्लांगभर
सामाजिक अंतरदेखील
मातृत्वाचाच एक
 पान्हा आहे,
ठीक से रहना, पप्पा को 
तकलीफ मत देना हां!’

रडून रडून थकलेला भोलू
घरी परत आला आहे,
उघड्या दाराच्या उंबऱ्यावर
पाय सोडून बसला आहे.
अज्ञातातील
 भविष्याची चाहूल
त्याच्या बालपणाचे
 बखोट धरून
खेचत खेचत त्याला
खूप दूरवर घेऊन
 जात आहे...
खूप दूरवर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article dhing tang

Tags
टॉपिकस
Topic Tags: