ढिंग टांग : कुठे आहे किम जोंग?

dhing-tang
dhing-tang

लॉकडाउनच्या काळात माणसे मन रमविण्याचे अनेकविध मार्ग (आपापल्या परीने) शोधत असतात. वेळ बरा जातो, म्हणून आमच्या परिचयातील एका सद्‌गृहस्थाने भाजीचा गाडा ढकलत गल्लीबोळात चक्कर टाकल्याचे ऐकिवात आहे. ऑनलाइन वृत्तपत्रातील शब्दकोडी कशी सोडवावीत, यावरही अनेकांचे संशोधन सुरू आहे. काही शास्त्रज्ञ मंडळी कोरोना विषाणूशी मुकाबला करणारी लस शोधून काढण्यात व्यग्र झाली आहेत. काही तज्ज्ञ मंडळी जालीम औषध शोधण्यात जीव प्रयोगशाळेत रमवत आहेत. सारांश, प्रत्येकाने आपापला ‘टास्क’ शोधून काढला आहे.

आम्ही मात्र एका व्यक्तीचा कसून शोध घेण्यात मन रमवतो आहे!
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम- जोंग- उन याचा सत्वर ठावठिकाणा लावावा, असे विनंतीवजा ‘टास्क’ आम्हाला चीन, जपान, अमेरिका, दक्षिण कोरिया आदी देशांच्या सरकारांनी दिले आहे. जेम्स बॉण्डइतके नसलो, तरी आम्ही एक बऱ्यापैकी सुप्रसिद्ध गुप्तचर आहोत, हे नाकारण्यात अर्थ नाही.

सदरील किम- जोंग- उन नावाचा इसम गेल्या १२ एप्रिलपासून गायब असून, त्याचे काही बरेवाईट तर झाले नाही ना? याचा छडा लावण्याचे काम आम्हाला देण्यात आले. सांगावयास अत्यंत आनंद होतो, की आम्ही हा तपास अवघ्या (रात्रीच्या) बारा तासांत पुरा केला आणि पुढील (दिवसाचे) बारा तास निचिंतीने झोप काढली. लॉकडाउनच्या काळात कसली रात्र आणि कसला दिवस! साराच आरामाचा कारभार!! विशेष म्हणजे या मोहिमेसाठी आम्हाला पलंगावरून खालीदेखील उतरावे लागले नाही. आम्ही नेमके काय केले? याची वाचकांना उत्सुकता असेलच.

सर्वप्रथम आम्ही ‘फेसबुक’वर ‘आपण यांना पाहिलंत का?’ या सदराखाली किम- जोंग- उन याचा फोटो व वर्णन टाकले. गोरा रंग, बुटबैंगण, डोळे मिचमिचे, केशकर्तनालयाच्या खुर्चीवरून उतरणाऱ्या इसमासारखी चेहरेपट्टी व आविर्भाव... असे अचूक वर्णन प्रसिद्ध केले. शेवटी ‘‘प्रिय किम्या, लौकर घरी परत ये, तुला कोणीही रागावणार नाही. जपाननजीकच्या समुद्रात सोडण्याजोगे क्षेपणास्त्र तुला खेळण्यासाठी आणले आहे. तेव्हा लौकरात लौकर परत ये!’’ असा मजकूरसुद्धा लिहिला... पण व्यर्थ! अनेक तास गेले, तरी नुसत्या ‘लाइक्‍स’चा पाऊस आणि ‘फीलिंग लोनली’च्या स्मायलींशिवाय काहीही पदरात पडले नाही.

दरम्यान, अमेरिकी ‘सीआयए’ने खबर आणली, की किम- जोंग- उन याचे हृदयावर शस्त्रक्रिया झाली असून, त्याची प्रकृती गंभीर आहे. आम्ही म्हटले, शक्‍यच नाही! या इसमाला मुळात हृदयच नसल्याने शस्त्रक्रिया कुठून होईल? फारतर आरसूत्र पद्धतीने मूळव्याधीवर... जाऊ दे!!

दक्षिण कोरियनांनी टीप दिली, की किम जोंग कुठल्याशा हिल स्टेशनवर क्वारंटाइन झाला आहे. कारण त्याच्या लाडक्‍या घोड्याच्या मोतद्दाराच्या बायकोचा मानलेला भाऊ कोरोना पॉझिटिव्ह निघाला म्हणे! सदर घोड्यासकट सर्व संबंधितांना गोळ्या घालण्याचे आदेश निघाले म्हणे! काही गुप्तचर उपग्रहांनी किम जोंगच्या मालकीची रेलगाडी टिपली! एवढे घडूनही आम्ही मात्र शांत होतो व आहो !!

‘किम-जोंग- उन हा इसम तंबाखूच्या पुडीच्या शोधात भटकत असणार याची आम्हाला बालंबाल खात्री आहे. लॉकडाउनच्या काळात हवालदिल माणूस तंबाखुची पुडी आणि चुन्याची नळी याच्यासाठी काय पण करेल!! एव्हाना किम जोंग पुडी मिळवून आपल्या घरात ऊन ऊन सूप भुरकत असेल, हा आमचा कयास खरा ठरला. आमचा हा शोध आम्ही लौकरच चीन, जपान वगैरे देशांना कळवू! त्याआधी आम्हालाही किम जोंगप्रमाणे प्रेरक गोष्टी शोधण्याची गरज आहे, इति.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com