esakal | ढिंग टांग : आंबा पिकतो, रस गळतो!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

आजची तिथी : प्रमादीनाम संवत्सरे श्रीशके १९४२ वैशाख शुद्ध षष्ठी.
आजचा वार : एव्हरीडे इज सण्डे!
आजचा सुविचार : आंबा पिकऽऽतो, रस्स गळऽऽतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतोऽऽ!

ढिंग टांग : आंबा पिकतो, रस गळतो!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

आजची तिथी : प्रमादीनाम संवत्सरे श्रीशके १९४२ वैशाख शुद्ध षष्ठी.
आजचा वार : एव्हरीडे इज सण्डे!
आजचा सुविचार : आंबा पिकऽऽतो, रस्स गळऽऽतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतोऽऽ!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) सत्ता क्षणभंगुर असते. सत्ता येते आणि जाते, पुन्हा येतेही! पण हाडाचा भक्त आणि काडाचा कार्यकर्ता हाती घेतलेला नित्यनेम कधीही सोडत नाही, लक्ष्य कधीही ढळू देत नाही. ‘एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार’ या काव्यपंक्तीनुसार त्याचे चलन असते. नमो नम: या सिद्धमंत्राचा जप मी काही सोडलेला नाही. त्याचीच पुन्हा गोड फळे दिसू लागली आहेत, तोच परिचित गंध नाकाशी रुंजी घालू लागला आहे.

मी आंब्याबद्दल बोलतोय! आंबा हा माझा वीकनेस आहे. आमच्या नागपुरात संत्री जोरात असली, तरी या दिवसांत मला आंब्याची ओढ लागते. मन कोकणात धाव घेते. तेवढ्यासाठी मला मुंबईत पुन्हापुन्हा यावेसे वाटते. आपणही आंबे खावेत, इतरांना खिलवावेत, असा ऐसपैस वऱ्हाडी स्वभाव लाभला आहे, त्याला काय करणार? माणसाने संत्र्याच्या दिवसांत संत्री खावीत, आंब्याच्या सीझनमध्ये आंबे खावेत! याच विचाराने परवाच्या दिवशी हो ना करता करता आंब्याची पेटी मागवली. आमचे कोकणचे नेते मा. राणेदादांना सहज ‘चांगला आंबा कुठे मिळेल हो?’ असे विचारले होते. पण त्यांनी  ‘कोरोनान उच्छाद मांडलाहा! आत्ता आंबे खंय? छ्या:!!’ असे अक्षरश: झटकून टाकले. मी नाद सोडला. जळगावच्या सुप्रसिद्ध गिरीशभाऊंना विचारून पाहिले. ते म्हणाले, ‘‘फारतर एखाद डझन केळी पाठवू शकीन!’’
शेवटी मीच महत्प्रयासाने एक पेटी मिळवली. सहा डझनांची होती.

आंबेवाल्याने घरपोच डिलिवरी दिली. ‘‘इतक्‍यात खाऊ नका. अजून पिकायचे आहेत. गवतात ठेवा!’ असा सल्ला देऊन तो गेला. चेहऱ्यावर मास्क होता, तेव्हा मी आंबेवाल्याला ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. तिथेच भानगड झाली
मोजून सहा आंबे घेऊन राजभवनावर आदरपूर्वक घेऊन गेलो. ते खरे महाराष्ट्राचे घटनादत्त प्रमुख आहेत. लोकशाहीच्या पाईकाने तेथे जाणे आवश्‍यक आहे. सहा आंबे तेथील कार्यालयात सादर केले. कार्यालयात निरोप ठेवला की ‘आंबे कच्चे आहेत, पुरेसे पिकू द्यात!’ उरलेल्या आंब्यांचे काय करायचे, हेही ठरलेलेच होते. सहा आंबे आमचे जुने मित्र मा. उधोजीसाहेबांना, बांदऱ्याला पाठवायचे होते. पण लॉकडाउनच्या काळात कोण पोचवणार?

आमचे चंदुदादा कोल्हापूरकर म्हणाले, की ‘हात्तिच्या, मी पोचवतो की!’ त्याप्रमाणे त्यांच्या हाती मोजून सहा आंबे ‘मातोश्री’वर  पाठवले. म्हटले, ‘‘नीट पोचवा हां! कुणाच्याही हातात देऊ नका! तिथे हल्ली संजयाजी राऊतसाहेब दारात उभे असतात, असं कळलंय! त्यांच्या हातात तर मुळीच देऊ नका!’’

सोबत प्रेमादराने एक चिठ्ठी लिहून पाठवली : प्रिय मित्रवर्य, फारा दिसांत गाठभेट नाही. सोबत रसाळ, सुमधुर आंबे पाठवत आहे. स्वीकार व्हावा! तूर्त कच्चे आहेत, पण गवतात ठेवले की २७ मेपर्यंत पिकतील! मनसोक्त खा आणि जुन्या मित्राची आठवण ठेवा!. तुमचाच. नाना

काही तासांतच ‘मातोश्री’वरून निरोपाचा खलिता आला. तर्जुमा असा : कैऱ्या मिळाल्या. आभार! लोणचे घालणार आहे. मुरले की बोलावतो! वास्तविक ही कैऱ्यांची पेटी आमचाच माणूस तुमच्याकडे घेऊन आला होता! कोण ते आपण ओळखले असेलच! जय महाराष्ट्र!!
यावर काय बोलणार? दात भारी आंबले आहेत!!