ढिंग टांग : अर्थचक्र गतिमान करा रे..!

Dhing-Tang
Dhing-Tang

entertainment (राग : भूप. ताल : झपताल) 
शरण ते करुण तव नि:श्वसन व्यसनि घन
नंदनंदन जना पापकामा।्‌। धृ।्‌।
कलहरत करि यदा मद्यमद यादवा।
सकल कुल कलि तदा ने विरामा।
रसिकहो! मंगलाचरण पार पडले आहे. सारे काही मंगलमय जाहले आहे. दीड महिन्यानंतर ‘एकच प्याला : रिलोडेड’ या नाटकाच्या खेळासाठी आपण सारे एकसमयावच्छेदेकरोन जमला आहात. आर्य मदिरा मंडळातर्फे आपले हार्दिक श्‍श्‍शावगत क..ककरण्यात आनंद होत आहे. ते पहा, आपल्या नाटकाचे सूत्रधार मा. तळीराम येथेच निघाले आहेत. हां, हां! हे तळिराम गडकरीमास्तरांच्या नाटकातले नव्हेत बरे!! चांगले दोन दोन लॉकडाउन पचवलेले आधुनिक आणि अट्टल तळीराम आहेत.

तळीराम : (टाळ्यांच्या कडकडाटात एण्ट्री) रसिकहो! आभार!!...काय सांगू तुम्हाला? रात्रभर डोळ्याला डोळा नाही. लौकर उठायचे म्हणून घड्याळाचा गजर लावला होता. पण गजर कोकलायच्या आतच घड्याळाच्या डोक्‍यावर थाप मारली आणि उठलो, झाले! शुचिर्भूत होऊन बसलो. थोडा वेळ चुळबुळ केली आणि चपला पायात सर्कवल्या. सैपाकघरातून इशारा आला : ‘‘धड्या अंगानं परत या, नाहीतर पुन्हा पडाल पालथे!’’ ती दुखरी आठवण अजुनी दुखत्ये! गेल्या सप्ताहात असाच सकाळी बाहेर पडलो होतो, तेव्हा त्या पोलिसाने संपूर्ण दांडके महिंदर ढोणीप्रमाणे हवेत उंच उभवून हेलिकाप्टर शॉटसारखा रट्टा द्यायला नको होता. इतका जोर काढून मारण्याचे काय कारण होते? आठवडाभर बिस्तऱ्यावर पालथा पडून शेक घेत होतो
प्रात:काळचा प्रहर. उन्हे चढत होती, परंतु, चांदण्याप्रमाणे शीतल भासत होती. ते सपीटाचे चांदणे अंगावर घेत घेतच आम्ही मंझिल गाठली. मंझिलीवर ती परिचित दिलखेचक पाटी होती : आर्य मदिरा मंडळ! अहह!

दर्शनहेळामात्रेच शिरशिरी आली. गेला दीड महिना हे शटर डाउन होते, तो काळ कसा गेला, ते आमचे आम्हाला माहीत. नवथर नवयौवनेने आपल्या प्रिय सख्याची प्रतीक्षा करताना पहाटेच्या पारिजाताप्रमाणे सर्वांगाने फुलून यावे आणि संबंध सृष्टीला सृजनाचे साखरस्वप्न पडावे, तद्वत झाले! 

आर्य मदिरा मंडळासमोर ठळक चौकोन आखलेले. आम्ही एका चौकोनाच्या दिशेने निघालो. चौकोनात कुणीतरी पिशवी ठेवून गेले होते. पाठीमागून आवाज आला : ‘मिष्टर पहाटपास्नं नंबर लावून ठेवलाय! मागे जा!!’ पाहातो तो काय, अर्ध्या मैलाची रांग लागलेली. शिस्तीत ‘दो गज की दूरी’ पाळत उभे असलेले, ते कापडी पिशवी आठवणीने घेऊन आलेले आर्य मदिरा मंडळाचे शिस्तशीर सदस्य पाहून ऊर अभिमानाने भरून आला. याला म्हणतात निष्ठा! यालाच म्हणतात निस्सीम प्रेम! ‘क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा’!! जिवाची पर्वा न करता केवळ अर्थव्यवस्था जगवण्यासाठी तो पहा रांगेत उभा राहिलेला शूर मद्यवीर!! सरकारी तिजोरीत भर पडावी, म्हणून स्वत:च्या यकृताचीही फिकीर न करणारी ही योद्धयांची जमात चिरायु होवो!
इतके सामाजिक भान मंडईत तरी दिसते का अं? एवढी तपस्या करूनही आर्य मदिरा मंडळाच्या सदस्यांचे गळे शुष्क राहणार असतील, तर पुष्पवृष्टी करावी तरी कोणावर अं?

वेळ दवडण्यात अर्थ नाही. कामास लागले पाहिजे. गावोगावच्या भगीरथांनो, सुधाकरांनो, लागा कामाला! अर्थचक्र गतिमान करा! चीअर्स!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com