esakal | ढिंग टांग : ...कालचा गोंधळ बरा होता!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

थांबा, थांबा! धीर्धरा, धीर्धरा तकवा, हडबडूं गडबडूं नका! नियती परीक्षा बघत्ये आहे. त्या परीक्षेत पास व्हा! मन स्थिर करा. ते होणे कठीण...कारण कालच तुम्ही सामाजिक अंतर राखून एका रांगेत उभे होता. तिथे अचानक गडबड होऊन पोलिस आले. खूप दिवसांनी तुम्ही जीव खाऊन सुमारे दोन किलोमीटर पळालात! जॉगिंग आणि रनिंग झाले!!

ढिंग टांग : ...कालचा गोंधळ बरा होता!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

थांबा, थांबा! धीर्धरा, धीर्धरा तकवा, हडबडूं गडबडूं नका! नियती परीक्षा बघत्ये आहे. त्या परीक्षेत पास व्हा! मन स्थिर करा. ते होणे कठीण...कारण कालच तुम्ही सामाजिक अंतर राखून एका रांगेत उभे होता. तिथे अचानक गडबड होऊन पोलिस आले. खूप दिवसांनी तुम्ही जीव खाऊन सुमारे दोन किलोमीटर पळालात! जॉगिंग आणि रनिंग झाले!!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मन एका जागी केंद्रित करा. दीर्घ श्वास घ्या, सोडा! पुन्हा घ्या, पुन्हा सोडा. जमेल जमेल! लॉकडाउन संपेपर्यंत नक्की नक्की जमेल!! अहो, प्रयत्नांती परमेश्वरदेखील प्राप्त होतो. ‘कोविड’चा किडा यूं चुटकीसरशी माराल! काय म्हणालात, बसता येत नाही? येईल, येईल!! काल तुम्ही सामाजिक अंतर राखून रांगेत उभे होता. तेव्हा अचानक आलेल्या पोलिसांमुळे हे असे झाले! दुखेल दोन-चार दिवस! मग येईल बसता नीट. तोवर सारी कामे उभ्यानेच करा... 

गेले दोन-चार दिवस फार्फार विचित्र गेले ना? भांडीकुंडी, झाडूपोछादी कामे सोडून घराबाहेर धावलात ना? उगीचच रांगेत उभे राहिलात ना? खरे खरे सांगा! बाजारात उगीचच हिंडून आलात ना? बंद दुकाने पाहून हिर्मुसलात ना? हीच ती परीक्षा. हाच तो मोह...मोह कोणाला चुकला आहे? आहो, जग हे सर्व माया आहे. या मायावी जगतात काही दुकाने उघडणार, लॉकडाउनची काळरात्र संपुष्टात येऊन ‘कोविड’मुक्त स्वातंत्र्याचा निर्मळ श्वास घेता येणार, म्हणून हरखून गेला होतात ना? 
...पण ते एक स्वप्न होते. 

आता यापुढे स्वप्ने पाहू नका. लॉकडाउन निभावून नेण्यासाठी आपण काय काय करावे, त्याच्या छोट्या छोट्या टिप्स आम्ही येथे देत आहो. तेवढे केले की सारे काही ठीक होईल. 
त्याचे असे आहे की, केंद्र सरकारच्या काही सूचना येतात. कारण ते केंद्रातले सरकार आहे! मग राज्य सरकारच्याही काही सूचना येतात. कारण ते राज्यातले सरकार आहे! पाठोपाठ स्थानिक कलेक्‍टर किंवा कमिश्‍नरच्या काही सूचना येतात. कारण ते तर स्वयंभू!! या असंख्य उलटसुलट सूचनांपैकी कोठल्या सूचनांचे पालन केले असता पार्श्वभागावर पोलिसांचे दंडुके पडणार नाहीत आणि उभ्याने कामे करावे लागणार नाहीत, असा प्रश्न कोणालाही पडेल! 

तर त्याचे उत्तर असे : त्या सूचनांकडे एक नजर टाकावी आणि विसरून जावे. मुळीच घराबाहेर पडू नये! कारण शंभर टक्के सुरक्षित अशी कोणतीही सरकारी सूचना नसत्ये! 

उदाहरणार्थ, केंद्र सरकार सांगते : उद्यापासून दारुविक्री सुरू करा... पण सामाजिक अंतर व मास्क लावून! त्यावर राज्य सरकार सांगते : बरं! दारुविक्री फक्त अमक्‍या अमक्‍या भागात अलाऊड आहे. (बव्हंशी हा भाग आपल्या घरापाशी नसतोच!)... पण सामाजिक अंतर आणि मास्क मस्ट हं! त्यावर स्थानिक कलेक्‍टरसाहेब सांगतात : नथिंग डुइंग! कोणीही काहीही विकणार नाही आणि पिणारही नाही!...तरीही सामाजिक अंतर आणि मास्क एकदम आवश्‍यक!! 

या सगळ्याच्या उप्पर असतो तो नाक्‍यावर दबा धरून बसलेला पोलिस. तुम्ही कधी घराबाहेर पडताय, याची तो वाटच पाहात असतो. कुठल्याही सरकारी सूचना न वाचता अत्यंत आवडीने व मनमोकळेपणाने तो आपल्या देहाच्या मागल्या बाजूवर बरोब्बर लक्ष केंद्रित करून हातातले दांडके दात ओठ खाऊन ‘जय महाराष्ट्र’ म्हणतो!! 

...तुम्ही लंगडत लंगडत घरी येता. उभ्यानेच कामे करू लागता. लॉकडाउन आणखी दुष्कर होतो. हे टाळा! घरी राहा, सुरक्षित राहा!