esakal | ढिंग टांग : दुर्लक्षवेधी सूचना!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

प्रति, माननीय महामॅडम, (१०, जनपथ, नवी दिल्ली) यांसी, अनेकानेक दंडवत. तांतडीने पत्र लिहिण्यास कारण की सध्या कडक लॉकडाउन असल्या कारणाने दिल्लीत (दर्शनाला) येता येत नाही. नाही तर पहिले विमान पकडून आलो असतो. गाड्यादेखील धड सुटत नाहीत. दिल्लीला जायचे म्हटले तर आधी नाव नोंदवावे लागते.

ढिंग टांग : दुर्लक्षवेधी सूचना!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

प्रति, माननीय महामॅडम, (१०, जनपथ, नवी दिल्ली) यांसी, अनेकानेक दंडवत. तांतडीने पत्र लिहिण्यास कारण की सध्या कडक लॉकडाउन असल्या कारणाने दिल्लीत (दर्शनाला) येता येत नाही. नाही तर पहिले विमान पकडून आलो असतो. गाड्यादेखील धड सुटत नाहीत. दिल्लीला जायचे म्हटले तर आधी नाव नोंदवावे लागते. अक्षरश: स्थलांतरितांसारखी आमची महाराष्ट्रात अवस्था झाली आहे. मायभूमीत (पक्षी : दिल्लीत) येता येत नाही आणि कर्मभूमीत (पक्षी : मुंबईत) कोणी विचारीत नाही. अशा अवस्थेत तुम्हाला सांकडे घालण्यावाचून काही पर्याय उरलेला नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अखेर गुरुवार रोजी ११ माहे जून या दिवशी आम्ही निष्ठावंत व जाज्वल्य कार्यकर्त्यांनी मिळून एक बैठक घेतली. सुदैवाने आम्ही सारे कार्यकर्ते सध्या (आपल्या कृपेने) मंत्रिमंडळातदेखील आहोत...म्हंजे मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाऊन बसतो, इतकेच! एकही फाइल आमच्याकडे सहीला येत नाही. आमच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने सहा महिन्यांपूर्वी घेतलेली बॉलपेनची रिफिल अजूनही तितकीच शाबूत आहे, यात सारे काही आले! सह्या करायला हात शिवशिवतात, पण कुठे करणार? सरकारात समाविष्ट असूनही आमची अवस्था निकाली काढलेल्या नस्तीसारखी (पक्षी : फाईल!) झाली आहे. कोणीही विचारीत नाही!! एवंच, आपणच आपल्या उच्च पातळीवर काही कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, ही विनंती.

मॅडम, नतद्रष्ट कमळवाल्यांचे कटकारस्थान उधळून लावत महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात सहाएक महिन्यांपूर्वी अस्तित्वात आले. आमच्यासारख्या निष्ठावान काँग्रेसवाल्यांसाठी हा सुखद धक्का होता. राज्यात भुईसपाट झालो असतानाही अचानक खुर्ची भेटली! हे म्हंजे, नोकरी गेल्याच्याच दिवशी कोटीची लॉटरी लागल्यागत झाले! पण हे सहा महिने आम्ही कसे काढले हे आम्हाला माहीत!!

सत्तेवर आल्यावर काही दिवस (एकमेकांचा) अंदाज घेण्यात गेले. एक तर तीन पक्षांचे सरकार! त्यात आपल्या पक्षातील कार्यकर्ते (पक्षी : आम्ही सारे!) हाडाचे लोकशाहीवादी असल्याने आमचे एकमेकांमध्ये फारसे पटत नाही. उदाहरणार्थ, नांदेडवाले कराडवाल्यांवर डूख धरून असतात आणि कराडवाले संगमनेरवाल्यांवर खार खातात. संगमनेरवाल्यांचे तिसरेच चालू असते आणि विदर्भातली मंडळी तर कायम अनुशेष मागण्याच्या पवित्र्यात असतात. थोडक्‍यात, ‘घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे’ या मराठी म्हणीसारखे घडले. (म्हणीचा स्वैर अर्थ आपल्या माहितीसाठी : ‘इन-लॉज ब्रिंग्ज हॉर्स इन ए डिसॉर्डर्ड हाऊस’ ! महत्त्वाचा खुलासा : मराठी म्हणीचा अर्थ तेवढा सांगितला आहे, कृपया रागावू नये! सॉरी!!) असे असताना मित्र पक्षाकडून मात्र आम्हाला अतिशय वाईट वागणूक मिळते आहे. इतकी की...जाऊ दे.

मंत्रालयात गेलो तर लिफ्टमन आधी दुसऱ्या मित्र पक्षाच्या नेत्यांना ‘आत’ घेतो, आम्हाला ‘दोन मिनिटं थांबा’ असे रुबाबात सांगतो! आमचे मुख्यमंत्री तर आम्हाला भेटतही नाहीत. भेटले तर ओळखही दाखवत नाहीत! ‘निर्णयप्रक्रियेत आम्हाला सहभागी करून घ्या’ असे आम्ही दहादा त्यांना सांगून पाहिले, पण ‘मी तरी कुठे आहे निर्णयप्रक्रियेत? मी हल्ली बांदऱ्यात असतो’ असे सांगून त्यांनी आम्हाला दहादा फुटवले. तोंडावर मास्क असल्यामुळे ओळख पटत नसेल, असे वाटून आम्ही त्यांना मास्क खाली करून चेहराही दाखवून पाहिला, पण ओळख दाखवली नाही ती नाहीच! 

अशा परिस्थितीत आम्ही नेमके काय करावे, याचे कृपया मार्गदर्शन करावे. थॅंक्‍यू! आपले महाराष्ट्रातील अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते. (सह्या-)
ता. क. : तुटेपर्यंत ताणू नये, ही विनंती! तशी आपली काही तक्रार नाही! थॅंक्‍यू!