esakal | ढिंग टांग : व्हान गॉगची चांदरात!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

थंडगार खोलीच्या पूर्वेकडल्या 
खिडकीतील आभाळभर तुकड्याकडे
त्यानं पाहिलं क्षणभर, 
तो पाहातच राहिला...
निश्‍चेष्ट वस्तुजातावर
पिठूर चांदणे सांडले होते.

ढिंग टांग : व्हान गॉगची चांदरात!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

थंडगार खोलीच्या पूर्वेकडल्या 
खिडकीतील आभाळभर तुकड्याकडे
त्यानं पाहिलं क्षणभर, 
तो पाहातच राहिला...
निश्‍चेष्ट वस्तुजातावर
पिठूर चांदणे सांडले होते.
दूरवर संन्यस्त दिवसाच्या
तात्पुरत्या मुक्कामाप्रमाणे
मंदपणे उजळू पाहणाऱ्या
शांतपणे निजलेली घरे,
उतरत्या छपरांचे पंख सिमटून
पिले सांभाळणाऱ्या कोंबडीसारखी
स्थितीशील बसलेली.
चराचराने घातलेल्या हजारो
प्रश्‍नकोड्यांना उत्तरे देत देत
मंद्रपणे फिरणारी उत्तररात्र.
तिच्या उत्तरीयाचे वळणदार लफ्फे.
तिच्या पावलागणिक अतिक्रमित 
होत जाणारी असहाय नभोभूमी.
स्वमग्नपणे स्वत:तच विकल विकल
होत उसळलेला भावुक चांदवा,
आणि तेजोमेघांच्या, तारका मंडळांच्या,
आकाशगंगांच्या तेजस्वी गर्दीत
सारा परावलंबी उजेड पणाला लावत
नेहमीच्या लकबीने उजळणारी 
क्षितिजसखी शुक्राची चांदणी. 
...आणि या साऱ्याशी मौनाची
भाषांतरे करणारा एकच एक,
एकलकोंडा तो सायप्रस वृक्ष.

‘‘स्टारी नाइट्‌! स्टारी नाइट!’’
खिडकीतूनच तो ओरडला,
‘‘तुम्ही का आलात? का?
इतके दिवस कुठे होतात? कुठे?
कशाला छळता मला? कशाला?’’
भाषांतऱ्या सायप्रस वृक्षाने
त्याच्या क्षोभाचे अनुवाद कसे केले,
कुणास ठाऊक. पण-
क्षणार्धात विलग होत गेले
तेजोमेघ, चांदण्यांचे कळप पांगले,
स्वमग्न चंद्र गरगरा फिरायचा थांबला,
चर्चच्या घुमटावरल्या दिव्यासारखी
क्षणभर लुकलुकली शुक्राची चांदणी
पिठूर चांदरातीची झाली राख
जागच्या जागी!

तो घाईघाईने धडपडला, आणि
लावून घेतली त्याने खिडकी
आतून घट्ट कडी घालत,
दोन दोन कुलुपे लावत
कडेकोट बंदोबस्त केला
मुजोर चांदरातीचा.
एवढे करून तो शिरला 
अंतिमत: आडोशासाठी 
-एका रिकाम्या कॅनव्हासमध्ये.
पुढे काय झालं कोण जाणे!
काही महिन्यांनंतर त्यानं
पिस्तूल झाडून घेत सुसाइड 
केल्याची बातमी आली होती म्हणे!
ते तितकंसं खरं नाही-नसावं!
...तो अजूनही असेल त्या
कॅनव्हासमधल्या गूढ चांदरातीत!