esakal | ढिंग टांग : मराठी पाऊल पडते पुढे!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : मराठी पाऊल पडते पुढे!

प्रिय मित्रवर्य मा. उधोजीसाहेब. शतप्रतिशत प्रणाम. पत्र लिहिण्यास कारण की, तुमचा फोन लागला नाही. लागला तेव्हा, तुम्ही उचलला नाही आणि उचललात, तेव्हा ‘राँग नंबर’ असे उत्तर देऊन ठेवलात! भेटीची तर सध्या शक्‍यताच नाही. शेवटी पत्र पाठवण्याचे ठरवले. पत्र घेऊन कुणाला पाठवावे, असा प्रश्न पडला होता.

ढिंग टांग : मराठी पाऊल पडते पुढे!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

प्रिय मित्रवर्य मा. उधोजीसाहेब. शतप्रतिशत प्रणाम. पत्र लिहिण्यास कारण की, तुमचा फोन लागला नाही. लागला तेव्हा, तुम्ही उचलला नाही आणि उचललात, तेव्हा ‘राँग नंबर’ असे उत्तर देऊन ठेवलात! भेटीची तर सध्या शक्‍यताच नाही. शेवटी पत्र पाठवण्याचे ठरवले. पत्र घेऊन कुणाला पाठवावे, असा प्रश्न पडला होता. तोही आम्हीच सोडवला! तुमच्या घरी पत्र टाकून येणारा इसम तुम्ही पाहिलात का? मीच होतो!! तोंडाला मास्क लावल्यामुळे तुम्ही ओळखले नाही!! पत्र डिलिवर करून लागलीच परतलो. असो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्वप्रथम तुमचे अभिनंदन केले पाहिजे. अवघा महाराष्ट्र लॉकडाउनमुळे हवालदिल झालेला असताना तुम्ही घरबसल्या तब्बल सोळा हजार कोटींचे सामंजस्य करार करून तेवढी गुंतवणूक आणलीत! याला म्हणतात वर्क फ्रॉम होम!! निव्वळ व्हिडिओ कॉन्फरन्स आणि फोनाफोनीवर एवढा व्यवसाय करता येतो, हे पाहून अनेक व्यापाऱ्यांनी आणि उद्योजकांनी तोंडात बोटे घालायचे बाकी ठेवले असेल. मास्क लावलेला असताना तोंडात बोट घालणे काहीसे अडचणीचे असते, म्हणून केवळ ते राहून गेले असणार! सारांश, तुस्सी ग्रेट हो!!

माझ्या काळात मीसुद्धा लाखो कोटींचे सामंजस्य करार केले होते. पण त्यासाठी मला अमेरिका, जपान अशा देशांच्या वाऱ्या कराव्या लागल्या. डझनावारी बैठका घ्याव्या लागल्या होत्या. त्या करारांमधली किती गुंतवणूक प्रत्यक्षात आली, हा संशोधनाचा विषय असला, तरी मी केलेले प्रयत्न शतप्रतिशत होते, हे तुम्हीदेखील मान्य कराल. हो की नाही?

सोळा हज्जार कोटी!! नुसता आकडा ऐकून मी सुमारे तासभर निपचित पडलो होतो. मला ढाराढूर झोप लागली आहे, असे कुटुंबाला वाटले, पण खरेच मी निपचित पडलो होतो. (शेवटी कांदेपोह्याच्या फोडणीच्या वासाने जाग आली, हा झाला तपशीलाचा भाग! असो.) हे सोळा हजार कोटी तुम्ही घरबसल्या कमावलेत, तेही सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळून! कसं काय बुवा जमले तुम्हाला हे? कमाल केलीत, कमाल!!
तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र खऱ्या अर्थाने ‘मॅग्नेटिक’ होईल, यात आता शंका नाही. पुन्हा एकवार अभिनंदन. (काळजी घ्या हं!) तुमचाच जुना मित्र. नानासाहेब फ.
ता. क. : माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात मी केलेल्या सामंजस्य करारांची भेंडोळी संदर्भासाठी पाठवू का? ट्रकभर आहेत!! 

नानासाहेब फ-
तुमचे पत्र मिळाले. थॅंक्‍यू! पत्र घेऊन येणाऱ्या माणसाकडे बघितल्यावर ‘ते तुम्हीच असणार’ हे मी ओळखले होते. पण मी मुद्दाम ओळख दाखवली नाही. मी सोशल डिस्टन्सिंगचे नियम फार पूर्वीपासून पाळत आलो आहे. आमच्या पक्षाच्या नेत्यांना आणि सध्याच्या मंत्र्यांना विचारा! काँग्रेसवाल्यांना तर विचाराच!! कुणीही सांगेल!

गेले दोन-अडीच महिने मी बांदऱ्यातून फारसा बाहेर पडलेलो नाही. पण ‘वर्क फ्रॉम होम’ मी प्रामाणिकपणाने करतो. घरबसल्या मी व्यवस्थित बिझनेस केला. मराठी माणसाला धंदापाणी जमत नाही, असे म्हणणाऱ्यांची थोबाडे फुटली! करून दाखवले! करून दाखवले! करून दाखवले!!

नील आर्मस्ट्राँग नावाच्या चांद्रवीराने ‘हे मानवाचे पाऊल नव्हे, तर मानवतेची गरुडझेप आहे’ असा डायलॉग चंद्रावरून मारला होता. त्याच चालीवर मी म्हणेन की, माझे हे मराठी पाऊल भले बाटाच्या आठ नंबरएवढे असेल, पण ती महाराष्ट्रासाठी गरुडझेप ठरेल! 

असो. पुन्हा थॅंक्‍यू. भेटू नकाच. उधोजी (सीएम)
ता. क. : तुम्ही केलेल्या ट्रकभर सामंजस्य करारांच्या भेंडोळ्यांचे काय करायचे, तेही मीच सांगायचे का? उ. ठा.