ढिंग टांग : दर्शन!

Dhing-Tang
Dhing-Tang

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रेगड.
वेळ : ऐतिहासिकच. काळ : तोही ऐतिहासिक.

अखेर ‘हो-ना’ करता करता मा. उधोजीसाहेबांनी भेटीची वेळ दिली. एरव्ही ते कोणालाही प्रत्यक्ष भेटत नाहीत. मा. बाळासाहेब आणि मा. आशुक्राव यांची पुण्याई आणि वशिला मोठा! त्यांना मा. उधोजीसाहेबांचे प्रत्यक्ष दर्शन झाले! अगदी व्यवस्थित झाले!!  हा चिमित्कार कसा झाला? त्याचीच कहाणी आम्ही सांगणार आहो!

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मा. बाळासाहेब आणि मा. आशुक्राव यांनी पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटीची इच्छा व्यक्त केली, तेव्हा प्रकरण येवढे सीरिअस होईल, असे वाटले नव्हते. आपणदेखील सरकारातील तालेवार मंत्री आहो! अनुभवाने समृद्ध आहो! शिवाय मा. उधोजीसाहेबांशी आपले नाही म्हटले तरी स्नेहाचे संबंध आहेत, या (गैर)समजात दोघेही होते. मा. बाळासाहेबांनी तर ‘गेल्या वेळी मा. उधोजीसाहेबांनी सलग अडीच मिनिटे आपल्याशी हस्तांदोलन केले होते,’ असे सांगून ‘भेट मिळणारच’, असे छातीठोकपणे आपल्या पक्ष सहकाऱ्यांना सांगितले होते. अर्थात अडीच मिनिटे हस्तांदोलनाच्या किश्‍शावर कोणाचाच विश्‍वास बसला नव्हता, पण सहकाऱ्यांनी एकमेकांकडे कुत्सितपणे बघत ऐकून घेतले, झाले!!
प्रोटोकॉलप्रमाणे आधी मा. बाळासाहेबांनी ‘भेटूया’ असा रीतसर निरोप पाठवला. ‘नको’ असा निरोप  (प्रोटोकॉलप्रमाणेच) उलट टपाली आला!! मग 
‘असं कसं? भेटायलाच पाहिजे’, असा इशारा मा. बाळासाहेबांनी आपल्या पक्षाच्या वतीने दिला. त्यावर ‘छट, भलतंच!’ असा एकशब्दी जबाब ‘मातोश्री’वरून आला! 

मा. बाळासाहेब आणि मा. आशुक्राव चक्रावले. आता काय करायचे? या कोड्यात सारे पडले. बैठकांवर बैठका झाल्या. सूचनांवर सूचना आल्या. कुणी म्हणाले, ‘सरळ जाऊन मातोश्रीवर धडकले तर?’ त्यावर ‘त्यांच्या घरी कुत्रा आहे’, अशी माहिती मिळाली. तो बेत बारगळला. 

‘मातोश्री बंगल्याच्या मागल्या बाजूने खिडकीचे गज वाकवून जावे’, अशी एक जबर्दस्त सूचना पुढे आली. पण ‘खिडकी बरीच उंच असून ती हल्ली बंद बंदच असते’, अशी माहिती मिळाली. तोही धाडसी बेत बारगळला.  ‘आपण वेषांतर करून गेलो तर?’, अशी उपयुक्त सूचना करण्यात आली. ‘वेषांतराने काहीही साध्य होणार नाही, सध्या मास्कचे दिवस आहेत, वेषांतर करून काय उपयोग?’, असे मत पडल्याने तोही बेत बारगळला. अखेर बरीच निरोपानिरोपी झाल्यानंतर मा. उधोजीसाहेबांचा एक विश्‍वासू दूत भेटायला आला. ‘माझ्याशी काय ते बोला, मी म्हंजेच साहेब असं समजा!’, असे दूताने सांगितले. त्याच्याशी बोलणे झाले. त्याने ऐकून घेतले आणि काहीही न बोलता तो निघून गेला. 

अखेर बऱ्याच दिवसांनी ‘मातोश्री’वरून ‘भेटायला हरकत नाही’, असा संदेश आला. मा. बाळासाहेब आणि मा. आशुक्राव दोघांचाही विश्‍वास बसेना! दोघांनीही आश्‍चर्याने तोंडात बोटे घालण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. कारण तोंडाला मास्क होता ना!

अखेर ज्येष्ठ कृ. द्वादशीच्या दिवशी दोन प्रहरी सशर्त भेटण्याची परवानगी मिळाली. त्यानुसार मा. बाळासाहेब आणि मा. आशुक्राव दोघेही ‘मातोश्री’वर पोचले. दालनात कोणीही नव्हते. अखेर तो क्षण आला...

...दाणकन म्युझिक वाजले आणि भिंतीवरल्या आरशात साक्षात मा. उधोजीसाहेबांचे दर्शन झाले. मा. बाळासाहेब आणि मा. आशुक्रावांनी हात जोडून त्या आरशातील अद्भुत प्रतिमेला अभिवादन केले. तोंड उघडायच्या आतच पुन्हा म्युझिक वाजून आरशातील ती दिव्य प्रतिमा अदृश्‍य झाली! 
भेट सकारात्मक झाली, असे मा. बाळासाहेबांनी नंतर हसतमुखाने सांगितले. इति.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com