esakal | ढिंग टांग ; बदली!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

डिअरम डिअर सीएमसाहेब यांसी पो. ह. बबन फुलपगार (बक्कल लं.१२१२ ) कदकाठी अदमाशे ५ फू. ७  इं, कंबर ४२, उमर ४२ याचा सास्टांग दंडवत, कडक  साल्युट आणि जय महाराष्ट्र! पत्र लिहिणेस कारण का की, बऱ्याच दिवसात गाठभेट नाही. गेल्या टायमाला ‘मातोस्त्री’वर डूटीला असतावेळी तीनवेळा आपली गाडी पास झाली असतावेळी दर्शन झाले होते.

ढिंग टांग ; बदली!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

डिअरम डिअर सीएमसाहेब यांसी पो. ह. बबन फुलपगार (बक्कल लं.१२१२ ) कदकाठी अदमाशे ५ फू. ७  इं, कंबर ४२, उमर ४२ याचा सास्टांग दंडवत, कडक  साल्युट आणि जय महाराष्ट्र! पत्र लिहिणेस कारण का की, बऱ्याच दिवसात गाठभेट नाही. गेल्या टायमाला ‘मातोस्त्री’वर डूटीला असतावेळी तीनवेळा आपली गाडी पास झाली असतावेळी दर्शन झाले होते. प्रंतु अदमाशे सहा महिण्यापुर्वी आपली ‘वर्षा’ बंगल्यावर बदली झाली, तेव्हाच माझी पायधुनीला बदली झाल्या कारनाने भेट झाली नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अत्यंत तातडीने आर्जंट पत्र लिहिणेचे खरे कारण म्हंजे अत्यंत विचित्र सिच्युशन निर्मान झाहालेली आहे. काय करावे आनि काय करु नये, हेच उमजेना झाले आहे. त्याचे असे झाले की, गेल्या हप्त्यात आपल्या सरकारने आमच्या एशीपी डोंगळेसाहेबांची (एकदाची) बदली केली. तेव्हाच आपल्याला थॅंक्‍यू लेटर पाठवनार होतो. डोंगळेसाहेब हा एक अत्यंत कंडम मानूस असून आमच्या एरियातील सर्व पो. काँ. त्याला कट्टाळले होते. डोंगळेसाहेबाची बदली व्हावी म्हनून वडाळ्याच्या पांडुरंगाला साकडे घालन्यापरेंत पाळी आली होती. परंतु, लॉकडाऊनमुळे ते पॉशिबल झाले नाही. परिनामी डोंगळेसाहेब बदली होऊन जाईना, आनि आम्हाला धड सुखाने डूटी करु देईना, अशी अवस्था झाली. गेल्या हप्त्यात अचानक पांडुरंग पावला, आनि बदली आदेश डोंगळेसाहेबाच्या हाती पडला! 

सबब, आम्ही कॉनिस्टेबल लोकांनी वर्गनी काहाडून कोपऱ्यावरल्या हलवायाला (विषम तारीख असूनही) दुकान उघडायला लावले. त्याच्याकडून पावकिलो पेढे आनून खाल्ले!! डोंगळेसाहेब हा मानूस बरोबर नाही. त्याच्याबध्दल अनेक कंप्लेंटी आहेत. हा मानूस अंगावर सारखा वरडत  असतो. वाईट वंगाळ शिया देतो!! लॉकडाऊन केला तेव्हापासून गडी अंगात आल्यागत वागतो आहे. ‘दिसेल त्याला दांडका हाना’ असे तो आम्हाला सांगत आहे. पब्लिक पन ऐकेना झाल्या कारनाने नाविलाज होतो.

डोंगळेसाहेब जानार म्हनून आम्ही सर्वे आणंदात असतावेळीच अचानक काय घडले कळले नाही. पो. ठान्यात आरामशीर बसून नव्या साहेबाची वाट बघत असतावेळी अच्यानक स्वत: डोंगळेसाहेबच पुन्हा आले!! त्यांचा बदली आदेश आपन रद्द केल्याचे कळले!! कुऱ्हाड कोसळली, कुऱ्हाड!! 

शीएमसाहेबांनी जुन्याच डूटीवर रुजू होन्याचा नवा आदेश काढल्या कारनाने डोंगळेसाहेब परत आले, असे सांगन्यात येत आहे. ज्याच्या बदलीचे पेढे आत्ताच खाल्ले, तोच पुन्हा साहेब म्हनून समोरी हुबा राहिला, तर आमच्यासारख्या हवालदाराने काय करावे? डोके कामातून गेलेल्या अवस्थेत तस्साच कोपऱ्यावरच्या हलवायाच्या दुकानी गेलो. (नेमका सम तारखेला उघडा होता.) ‘असले खराब नशीबाचे पेढे इकतोस का?’ असे इच्यारुन त्याला दांडके हानले!! काय करु?

डोंगळेसाहेब परत आल्यामुळे मोजून चौऱ्यात्तर लोकांच्या मागल्या बाजूला दांडक्‍यांचा सपाटा देऊन मनातली भडास काढून टाकली. तुम्ही बदली क्‍यान्सल केली, त्याचा पब्लिकलाच असा तरास होत आहे. साहेब, आपन अचानक एशीपीसाहेबांचे बदली आदेश रद्दबातल केल्याने आमची सिच्युएशन टाइट झाली आहे. आम्ही काय करावे? असे काय घडले की डोंगळेसाहेबाची बदली रद्द करावी लागली? यामागे काय पालिटिक्‍स झाले? सरकारातील तीन पार्ट्यांमध्ये काही लोच्या झाला, म्हनून बदल्या रद्द झाल्याचे कळले. खरे आहे का? एक काय तो डिसिजन घेऊन डोंगळेसाहेबाला कुटे तरी लांब घालवावे, ही विनंती. जय महाराष्ट्र. 
आपला आज्ञाधारक. बबन फुलपगार.