ढिंग टांग : हॉटेल कोरोनिया!

Dhing-tang
Dhing-tang

महाराष्ट्रातील तमाम खवय्यांनो, आमच्या नव्या कोऱ्या ‘हॉटेल कोरोनिया’मध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे. आजपासूनच आम्ही हे हाटेल उघडत आहो. आत्मनिर्भर होण्याच्या वाटेवरचे हे आमचे पहिले (छोटेसे) पाऊल आहे, असे म्हणा हवे तर! हे एक नवीन ‘स्टार्ट अप’ आहे, असेही म्हणा हवे तर! एकवेळ आमच्या ‘हॉटेल कोरोनिया’ला भेट द्या आणि भरपेट खा, जेवा, प्या! मज्जा करा! (बिल द्यायला विसरू नका हां! आम्ही क्‍याश, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, कुपने आदी सर्व मार्गांनी पैसे स्वीकारतो! ) कोरोनाच्या या भयंकर काळात जन्मलेल्या काही अपत्यांची नावे त्यांच्या मायबापांनी ‘कोरोनालाल’, ‘सोशलडिस्टन सिंग’ किंवा ‘कोविडप्रसाद’ अशी ठेवलेली आम्ही कोठेतरी वाचले होते. म्हटले आपणही आपल्या हाटेलचे नाव असेच काहीतरी ठेवावे. कसे नव्या धाटणीचे वाटते की नाही? एकदम  योऽऽऽ..!! (इथे आम्ही मूठ वळून कोपरापासून हात दुमडून पोटाकडे खेचला आहे, बरे का!) 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमचे मेन्यू कार्ड अगदी वेगळे आहे. नुसते वाचले तरी तोंडाला पाणी सुटून तुम्हाला डब्बल मास्क लावून बसावे लागेल. उदाहरणार्थ, तुम्ही मसाला डोसा, म्हैसूर डोसा खाल्ला असेल. पण आमचा कोरोना मसाला दोसा खाऊन बघा! ‘कांजीवरम इडली’ऐवजी ‘कोविडली’ खाऊन बघा! आमच्या सांबाराला सॅनिटायझरचा सुगंध येतो आहे, असे तुम्हाला वाटेल. साहजिकच आहे, ते अपेटायझर नसून सॅनिटायझरच आहे!! एकदम  कूल यु नो!

आमची मास्का पावभाजी ट्राय केलीत, तर पुन्हा पावभाजीचे नाव काढणार नाही. आय मीन साध्या पावभाजीचे नाव काढणार नाही. मास्का पावभाजी ही मास्कसहित खायची असते. कशी खायची, त्याचे ट्रेनिंग तुम्हाला आधी ऑनलाइन दिले जाईल! मगच ती खायची. प्रकरण थोडेसे गुंतागुंतीचे आहे, पण प्रयत्नांती जमेल!

आमच्या हाटेलात तुम्ही आलात की टेबल खुर्च्या दिसणारच नाहीत. कां विचारा? अहो, त्या असणारच नाहीत, तर दिसणार कशा? हाहा!! एक मोठा हॉल, त्यात येऊन लांब लांब उभे राहायचे. तुम्ही वडा सांबार अशी ऑर्डर दिलीत की थोड्यावेळाने छतातून दोन वडे दोरीने बांधून सोडले जातील. सांबाराची धार थेट तोंडात पडेल अशी व्यवस्था आहे. प्लेटी, काटे-चमचे वगैरे भानगडीच नाहीत. एकदम सुटसुटीत कारभार! 

‘सोशल डिस्टन्स डोसा’ मागवलात, तर तो एकाच वेळी दोघांनी खायचा आहे. त्याची साइज दोन गज व्यासाइतकी आहे. दोघांनी दोन टोकांना उभे राहून डोसा खायचा. त्याने सोशल डिस्टन्सिंगचा नियम आपोआप पाळला जाईल. अर्थात जसजसा डोसा (दुतर्फा) संपेल, तसतसा प्रॉब्लेम येईल. पण काळजी करू नका. आम्ही मधोमध डोसा तुटेल, अशी व्यवस्था आधीच केलेली आहे.

प्रत्येकाने पाण्याची बाटली घरून आणायची आहे. खाऊन पिऊन झाले की बिल तुमच्या मोबाइल फोनवर येईल आणि लगेच पैसेदेखील वळते केले जातील. पैसे वळते झाले की बडिशेपेच्या यंत्रासमोर उभे राहायचे. लग्नसमारंभात वर-वधू सोडून सर्वांच्या डोक्‍यात अक्षता पडतात, ते आठवा! तद्वत त्या यंत्रातून बडिशेपेचा फवारा येईल. तो गोळा करायचा. 

आहे की नाही गंमत?
एवढे सगळे विचित्र आणि भंकस असूनही तुम्ही आमच्या हाटेलात गर्दी करणार, याची आम्हाला खात्री आहे. मग करणार ना गर्दी? येताय ना आमच्या युनिक, नव्या, आत्मनिर्भर हाटेलात? या ना, या!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com