ढिंग टांग : पायलोट प्रोजेक्‍ट!

Dhing-Tang
Dhing-Tang

वातावरण तंग होते. समोरच्या सतरंजीवर बद्धपद्मासमान बसलेले (साक्षात) सर्वशक्तिमान श्रीश्री नमोजी आणि त्यांच्या पुढ्यात गुडघे चोळत व्यग्रतेने वाट पाहणारे श्रीमान मोटाभाई. बराचवेळ झाला तरी, नमोजींची समाधी मोडेना! वाट बघून बघून मोटाभाईंच्या गुडघ्याला रग लागली. 
‘‘जे श्री क्रष्ण...केम छो, मोटाभाई?,’’ प्रसन्न वदनाने नमोजींनी विचारले. म्हंजे ते वदन  प्रसन्न असावे, असा अंदाज तेवढा मोटाभाईंना बांधता आला. नमोजींच्या वदनाभोवती  डिझायनर गमछाचे वेटोळे होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘‘चोक्कस!’’ मास्क आडून मोटाभाईंनी विनम्रतेने उत्तर दिले.
‘‘शुं काम?’’ नमोजी. मधल्या काळात त्यांनी पद्मासनाची  बैठक मोडून अन्य कुठलेसेसे योगासन करण्याचा प्लॅन मनातल्या मनात करून टाकला असणार! कारण त्यांनी एक पाय सरळ करुन अंगठा धरण्याची कोशीस ऑलरेडी सुरू केली होती.
‘‘कछु नथी! हल्ली काही कामच उरलेलं नाही! बसून बसून कंटाळा आला!,’’ मोटाभाई कुरकुरले. 

‘‘कामसू माणसने हजार काम!’’ एवढे म्हणून नमोजींनी पटकन स्वत:चे नाक धरले. मोटाभाई गोरेमोरे झाले. पण ही पुढल्या योगासनाची तयारी आहे, हे लक्षात येऊन त्यांनी पुन्हा गुडघा चोळायला घेतला.

‘‘राजस्थानात काही विधायक काम काढावं असं म्हणतो!,’’ मोटाभाईंनी सूतोवाच केले. त्यावर नमोजींनी एक डोळा उघडून भिवईनेच ‘काय?’ अशी विचारणा केली. राजस्थानात बरेच काम करता येण्याजोगे आहे, असे गेले अनेक महिने मोटाभाईंच्या मनात होते. माणसाने कसे सतत  विधायक कामात गुंतलेले बरे असते!!  मोटाभाईंच्या मनात तर कायम विधायक कामाचे बेत शिजत असतात. त्यांनी हाती घेतलेले विधायक काम तडीस गेले नाही, असे अजून तरी घडलेले नाही. 

‘‘आपडा केटला विधायक छे त्यां?’’ नमोजींनी नाक सोडले.
‘‘बहत्तर-चोरहत्तर छे!’’ मोटाभाईंनी किंचित ओशाळ्या आवाजात माहिती दिली.
‘‘एटलाज? बहत्तर-चोहत्तर विधायक घेऊनशी काय काम करणार?,’’ नमोजींनी पुन्हा नाक धरले. त्यांना हा आकडा मुळीच आवडला नव्हता. पण नाक मुरडायचे नाही, म्हणून त्यांनी ते धरून ठेवले इतकेच. त्याचा योगासनांशी काहीही संबंध नव्हता.
‘‘कोंग्रेसना त्रीस जने रेडी छे!’’ मोटाभाईंनी पुटपुटत माहिती दिली. खरे तर त्यांना हे मोठ्यांदा सांगायची इच्छा नव्हती. भिंतींना कान असतात!

‘‘हिसाब जमते काय? जरा जुओ तो?’’ नमोजींनी सावध केले. मोटाभाईंनी बोटे मोडत थोडी आकडेमोड करून पाहिली. ‘‘ज्यमून ज्याणार!’’ त्यांनी रुकार दिला. अशी गणिते जमवत जमवतच त्यांनी आजवर उदंड यश मिळवले आहे. गृहस्थाचा गणितात कुणी हात धरणार नाही!! नमोजींनाही मनातून कौतुक वाटले.

‘‘तो शुरु करजो! शुभस्य शीघ्रम!,’’ नमोजींनी ग्रीन सिग्नल दिला. मोटाभाईंच्या मनावरचे मोठे ओझे उतरले. आता पुढला भाग तुलनेने सोपा होता.
‘‘राजस्थान मां आ आपडा पायलोट प्रोजेक्‍ट छे!,’’ मोटाभाईंनी उत्साहाने आपल्या नव्या प्रयोगाबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली. राजस्थानातील गेहलोट सरकारच्या विरोधातला हा पायलोट प्रोजेक्‍ट यशस्वी झाला की पुढे मैदान खुले आहे, असा मोटाभाईंचा अंदाज होता. ‘गेहलोट वर्सेस पायलोट’ या भविष्यातील सामन्याच्या काल्पनिक दृश्‍यामुळे त्यांचे मन उचंबळून आले होते. ‘‘पायलोट प्रोजेक्‍ट सक्‍सेसफुल झाला तर होल इंडियामधी आपली पार्टी आत्मनिर्भर होऊन ज्याणार का?’’ नमोजींनी विचारले.

‘‘एमने एमज थईश!’’ मोटाभाईंनी आश्वासन दिले. ते पुढे म्हणाले, ‘‘पायलोट प्रोजेक्‍ट झ्याला के ऑक्‍टोबरमधी महाराष्ट्रामधी विधायक काम करणार. प्रोमिस!’’ 
... ते ऐकून नमोजींनी समाधानाने डोळे मिटले. एक दीर्घ श्वास ओढून घेतला.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com