ढिंग टांग : जागते रहोऽऽऽ...!

Dhing-Tang
Dhing-Tang

माननीय वंदनीय प्रार्थनीय महामॅडम यांच्या चरणारविंदी बालके बाळासाहेब (जोरात) यांचा शिर्साष्टांग नमस्कार विनंती विशेष. पत्र लिहावे की न लिहावे, हे कळत नव्हते. डेरिंगच होत नव्हती. पण शेवटी मनाचा हिय्या केला आणि ‘लिहून तर ठेवू, अगदीच गरज पडली तर तुम्हाला पाठवू’, असे ठरवून लिहितो आहे. मन चिंतेने ग्रासलेले आहे.

कारण, राजस्थानातून येणाऱ्या बातम्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत. आधीच कोरोनाच्या बीमारीने आमचे राज्य (महाराष्ट्र) आणि अवघा देश (इंडिया) मेटाकुटीला आलेला आहे, हे आपण जाणताच. (तसे आपण काय जाणत नाही, महामॅडम? थॅंक्‍यू!) त्यात राजस्थानात गेहेलोट आणि पायलोटसाहेबांच्या लोटालोटीचे लोट उसळले. या लोटालोटीचे लोण महाराष्ट्राच्या दारात आले तर काय लोटायचे...सॉरी...काय करायचे? या विचाराने रात्रभर डोळ्याला डोळा लागत नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तथापि, आपण महाराष्ट्राची काळजी करू नये, येथील (आपले) तीन पक्षांचे आघाडी सरकार अतिशय समर्थपणे काम करीत आहे व आम्ही सारे एकदिलाने महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लावत आहोत, हे सांगण्यासाठीच हे पत्र लिहीत आहे. वरील वाक्‍य लिहिताना हात थरथरल्यामुळे अक्षर वेडेवाकडे आले आहे. त्याबद्दल क्षमस्व! गरिबाच्या अक्षराला कृपा करून हंसू नये. ( ‘एकदिलाने’, ‘समर्थपणे’, विकासाला हातभार’ या शब्दांना हसलात तरी चालेल! असो!) 

महाराष्ट्रातील सरकार हे आपल्या पक्षाच्या पाठबळावरच आज उभे आहे. सहा-सात महिन्यांपूर्वी तुम्ही ‘नो मीन्स नो’ असे म्हणाला असतात तर काय झाले असते? (छे! कल्पनाच करवत  नाही. थॅंक्‍यू!) आमच्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सध्या कमालीचा जिव्हाळा, आपुलकी आणि मित्रत्त्वाची भावना बळावली आहे. (पुन्हा हात थरथरला.

अक्षराला ह. न.! थॅंक्‍यू!!) सतत  कारस्थाने करणाऱ्या नतद्रष्ट कमळवाल्यांची डाळ आम्ही येथे अजिबात शिजू देत नाही! आमच्यामध्ये सुसंवादही प्रचंड आहे. किंबहुना आमच्यामध्ये सुसंवादच इतका आहे की विसंवादाला जागाच उरलेली नाही. (हे वाक्‍य गिचमीड गेले, कारण यावेळी हात थरथरला नाही, तर चक्क झटकाच बसला! अ. ह. न.! थॅंक्‍यू!) कालचीच गोष्ट : राजस्थानातील लोटालोटीच्या बातम्या येऊ लागल्यावर अचानक सोमवारी आमचे लाडके सीएमसाहेब मा. उधोजीसाहेब यांचा मला फोन आला. त्यांनी इतक्‍या अघळपघळ गप्पा मारल्या की माझ्या डोळ्यांत पाणीच आले!! मला म्हणाले : ‘‘बाळासाहेब, बरे आहात ना? हात वारंवार धुताय ना?’’  

आता कुणी ‘हात धुताय ना?’ असे एखाद्या अस्सल आणि अट्टल कांग्रेसवाल्याला विचारले, तर एरवी त्याला संशय आला असता! समोरचा माणूस कुत्सितपणे ‘हात’ धुवायला सांगतोय, असे त्याच्या मनात आले असते. पण मला तसे अजिबात वाटले नाही. कारण आमचे मुख्यमंत्री खरोखर खूपच मधाळ आणि प्रेमळ आणि चांगले आहेत. (हाताचे थरथरणे काही कमी होत नाही. अ. ह. न.! थॅंक्‍यू!!) ते म्हणाले की, ‘बाळासाहेब, तुम्ही तुमचा गड सांभाळा! नाहीतर पुढल्या दरवाजाला पाहारे देत बसाल आणि मागले दार उघडे अशी अवस्था व्हायची!’ मी त्यांना निश्‍चिंत रहा असे (आपल्या वतीने) सांगून टाकले आहे. आम्ही जागता पहारा ठेवला आहे. काळजी नसावी!

परंतु, एवढे असूनही, राजस्थानातील लोटालोटीचे लोण महाराष्ट्रात आले तर काय करावे? हे मात्र कळत नाही!! कृपया मार्गदर्शन करावे. थॅंक्‍यू. 
आपला निष्ठावान कार्यकर्ता. बा. जो.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com