ढिंग टांग : गटारीचे बोल!

Dhing-Tang
Dhing-Tang

मित्रहो, आर्य मदिरा मंडळाच्या या ऑनलाइन बैठकीला तुमचे हार्दिक स्वागत! सध्या काळ मोठा कठीण आला आहे. इष्टमित्रांसोबत अधून मधून ‘बसावे’ आणि चर्चाविमर्श करावा, त्यातून राष्ट्रउभारणीस हात लावावा, हे तर आमच्या आर्य मदिरा मंडळाचे ब्रीदच, पण ही बैठक ‘झूम‘ ॲप द्वारे घेतली जात आहे, हा निव्वळ योगायोग नव्हे! ऑनलाइन बैठक घेतली तर ती ‘झूम’वरच  घ्यावी, असा काही कल्पक मेंबरांनी आग्रह धरला, त्यातूनच हा बैठकीचा बेत साकारला. हल्ली अनेक कचेऱ्यांमध्ये ‘झूम’ मीटिंगांचा सिलसिला चालू आहे. ‘झूम’ मीटिंगा घेतल्या की आपण चिक्कार काम केले, असा आभास निर्माण होतो. मनाला शांती मिळते. तसाच काहीसा परिणाम आजच्या आपल्या ‘झूम’ मीटिंगमुळे मिळेल. चीअर्स!

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझ्या प्राणप्रिय सवंगड्यांनो,  येत्या सोमवारी आपला साऱ्यांचा लाडका सण येत आहे.- सोमवती अमावस्या!! सारे रसिकश्रेष्ठ या सुदिनास ‘गटारी’ या प्रेमसंबोधनाने ओळखतात. मटणमुर्गी, कबाब, बॉइल्ड बैदा, बॉइल्ड चना, तळलेली मूगडाळ, टुकडा चकली, शेजवान चटणी,  अशा कठोर व्रताहारासमवेत इष्टपेयपानासहित या गटारीव्रताचे पांग फेडिले जातात. (दुसऱ्या दिवशी उताऱ्यानेच या व्रताची सांगता होते. काही नवभाविक लिंबूपाणी, आलेलिंबू, ताक, आदींचे सेवन करुन व्रताची सांगता करतात. तेदेखील शास्त्रास मंजूर आहे. असो.)  सामान्य अन्यजनांसाठी दसरा-दिवाळी आदी अनेक सणवार असतात. श्रावण महिन्यात तर विविध व्रतवैकल्यांची रेलचेल असते. सोमवती अमावस्या हा श्रावणाच्या पूर्वदिनी येणारा मुहूर्त! आपल्यासारख्या भाविकांसाठी हाच एकमेव सुदिन. 
सोमवती आमावस्येस देहभान विसरुन मन:पूत व्रतपालन करावे, आणि पुनश्च देहभान विसरावे, हाच या व्रताचा नियम आहे. आपल्यासारखे देशभक्तच ते करु जाणोत! होय, देशभक्तच म्हणायला हवे!! देशासाठी हृदय  काय, कोणीही देईल! पण देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आरोग्यासाठी आपले यकृत पणाला लावणाऱ्या आर्य मदिरा मंडळांच्या शूर शिपायांचे कवतिक करावे तितके थोडेच, नाही का? 

तथापि, दोस्तहो, यावेळी आपल्यावर अतिशय खडतर  परिस्थिती ओढवली आहे. शनिवार आणि रविवार अशा वीकेंडला जोडून सोमवती अमावस्या आली असली तरी हा त्रिधारा योग अनेकांसाठी वियोगाचा कालखंड ठरणार आहे. हा त्रिधारा योग एरवी केवढा विलक्षण ठरला असता! सोमवतीचे व्रतकार्य शुक्रवारी रात्रीच सुरु झाले असते. बुधवार-गुरुवारपासूनच बोकडांचे जथे मटण शापाच्या मागल्या दारी येऊन डेरेदाखल झाले असते. मुर्ग्यांचे पिंजराट्रक रस्तोरस्ती बेहाय दौडताना दिसले असते! कबाबाचा मधुर गंध गल्लोगल्ली दर्वळला असता, आणि घरोघरी रस्से रटरटले असते! वीकेंडच्या शुभमुहूर्तावरच सोमवती अमावस्येचे व्रतपान आकंठ सुरु झाले असते. परंतु, हे औंदा होणे नाही! अधिकृतरित्या तर अजिबातच होणे नाही!!

काळी पिशवी हातात घेऊन मटण आणण्यासाठी बाहेर पडणाऱ्याचाच खिमा होण्याची पाळी ओढवली आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या वर्तुळात (एका पायावर) उभे राहून इष्टपेयाच्या दुकानासमोर रांग लावणे, दुष्कर होऊन बसले आहे. अहह!! अशाने राष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट  कशी होणार?

महामारीच्या वैश्विक संकटात राष्ट्रेच्या राष्ट्रे मेटाकुटीला आली आहेत. अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्याच्या तिजोरीत भर घालण्यासाठी वाइनशॉपासमोरच्या रांगेत निधड्या छातीने उभा राहिलेला तो पहा कोरोनावीर!! त्याला आमचे शतशत  नमन असो! येती गटारी आपणा सर्वांना मानसपूजेतच, याने की मनातल्या मनातच साजरी करावी लागणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना पुरेशी निवांतता मिळो हीच सदिच्छा. जयतु बाटलीदेवी, जयतु! आकंठ व्रतस्थ तळीराम. अध्यक्ष, आर्य मदिरा मंडळ.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com