esakal | ढिंग टांग - पुणेरी कोरोना!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-tang

आमचे अमेरिकन काका रा. डोनाल्डतात्या ट्रम्प यांनी ट्रंक कॉल करून विनंती केल्यामुळे आमचा नाइलाज झाला आणि कोरोना विषाणूवरचे संशोधन आम्हाला तांतडीने हाती घ्यावेच लागले. कोरोना महामारीचे प्रकरण चीनमध्ये उपटण्यापूर्वी आम्ही भयंकर बिझी होतो. आताही बिझीच आहो!!  ‘मांजरांना काखमांजऱ्या होतात का?’ हा अत्यंत महत्त्वाचा वैज्ञानिक प्रश्न आम्ही (संशोधनासाठी) बगलेत मारला होता.

ढिंग टांग - पुणेरी कोरोना!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

आमचे अमेरिकन काका रा. डोनाल्डतात्या ट्रम्प यांनी ट्रंक कॉल करून विनंती केल्यामुळे आमचा नाइलाज झाला आणि कोरोना विषाणूवरचे संशोधन आम्हाला तांतडीने हाती घ्यावेच लागले. कोरोना महामारीचे प्रकरण चीनमध्ये उपटण्यापूर्वी आम्ही भयंकर बिझी होतो. आताही बिझीच आहो!!  ‘मांजरांना काखमांजऱ्या होतात का?’ हा अत्यंत महत्त्वाचा वैज्ञानिक प्रश्न आम्ही (संशोधनासाठी) बगलेत मारला होता.  ‘काहीही करा, पण या कोरोनाचा नायनाट करणारी लस आठेक दिवसांत शोधून द्या’, अशी गळ ट्रम्पतात्यांसकट सर्वच राष्ट्रप्रमुखांनी घातल्याने आमचा अगदी नाईलाज झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘तिखट (तर्रीयुक्त) मिसळ : चयापचय, पचय आणि चय’ या शीर्षकाचा आमचा शोधनिबंध गुदस्ता ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिध्द झाल्यानंतर सारे वैद्यकविश्व स्तिमित झाले होते, त्याचाच हा परिणाम! असो.

कोरोनाविषयी थोडेसे : हा एक संसर्गजन्य आजार आहे. तो चिनी बनावटीचा आहे. शिवाशीव पाळल्यास व एकमेकांस हाडुतहुडूत केल्यास या रोगाचा प्रसार कमी होतो, असे जगभरातील वैज्ञानिकांचे निरीक्षण आहे. आम्हाला हे निरीक्षण अंशत: मान्य आहे. कारण एवढेच की, (पुण्यात राहून) कुठलीच गोष्ट पूर्णत: मान्य करणे आम्हाला शक्‍य नाही. तथापि, पुण्यातला कोरोना हा जगातील कोरोनापेक्षा बराचसा वेगळा असल्याचे एक पुणेरी संशोधन पुढे आले आहे, ते अतिशय मनोज्ञ आहे, असे काही (पुण्यातल्याच) लोकांना वाटते. पुणेरी कोरोनाची जनुकीय रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण म्हणजेच ‘स्पेशल’ आहे. 

पुणेरी कोरोनाविषयी थोडेसे : हा खऱ्या अर्थाने नॉवेल कोरोना विषाणू आहे. कारण उघड आहे.-तो पुण्याचा आहे!  इतर विषाणूंपेक्षा आपण काही वेगळे आहो, असे त्यालाही वाटत असणार आणि तेच अभ्यासकांच्या निदर्शनास आले आहे. मुदलात आपण वैशिष्ट्यपूर्ण कोरोना आहोत, याचा पत्ता या विषाणूने आठ महिने लागू दिला नाही, यात सारे आले! हीच पुणेरी कोरोनाची स्पेशालिटी आहे. 

वाचकहो, मिसळ हा पदार्थ महाराष्ट्रात सगळेच खातात. पण पुण्यातली मिसळ ही केवळ पुण्यात मिळत असल्याने ती स्पेशल पुणेरी मिसळ असते. याच नियमानुसार पुणेरी कोरोना हा आपोआप स्पेशल ठरतो. नाही का? 

पुण्यात सध्या मास्क सक्ती करण्यात आली आहे. भले! यामुळे हेल्मेटसक्तीचे जे काही केले, तसेच काही मास्कसक्तीचे करावे किंवा कसे? हा सवाल पुणेरी मनात डोकावला नसता तरच नवल. किंबहुना, आमच्या मते हा सवाल ज्याच्या मनात आला नाही, तो अस्सल पुणेरीच नव्हे!! पण मास्क अनिवार्य असल्याच्या पाट्या जागोजाग लागल्याने ही बाब नियमशीर मानण्यात आली. ओळख न दाखवणे, सहजच जाता जाता (एकमेकांचा) अपमान करणे, दुरून बोला (पण बोलताच कशाला?) असे सांगणे, हे अंगवळणी पडलेल्या पुण्यात ही संसर्गजन्य साथ येणे जवळपास अशक्‍य आहे, असे चिंत्य निरीक्षण आम्ही (पुण्यातच) नोंदवले होते. कारण खरा पुणेरी माणूस शब्दांनी कमी आणि पाट्यांच्या माध्यमातून जास्त बोलतो. नावेल पुणेरी कोरोना विषाणूला सूक्ष्मदर्शकाखाली धरले असता ‘ दु. १  ते ४ : लागण बंद राहील’ अशी पाटी दिसल्याचेही सांगण्यात येते. खरे खोटे कोरोना जाणे! 

आमचा निष्कर्ष : पुणेरी कोरोना शतप्रतिशत वैशिष्ट्यपूर्ण असून त्याबाबत अधिक संशोधनाची गरज असून लौकरच आम्ही ‘लॅन्सेट’मध्ये ‘पूना कोरोना : ए जेनेटिक स्टडी विथ रेफरन्स टु द स्पेशल मिसळ फिनोमेनन’ हा शोधनिबंध प्रसिद्ध करीत आहो! जय हो!!

Edited By - Prashant Patil