ढिंग टांग : मास्क, महापूर आणि मुंबईकर!

Dhing-Tang
Dhing-Tang

तसे पाहू गेल्यास आम्ही पक्के मुंबईकर आहो! शंका घ्यायला जागाच नाही. एकाहत्तर लिमिटेड बस रुट कसा आणि कुठे जातो? लोकलच्या डब्यात प्रथम वर्गाला लागून असलेल्या दुसऱ्या वर्गाच्या डब्यातील डाव्या बाजूची विंडो सीट कशी पकडावी? लोकल प्रवासात मस्तकावरील हॅंडले इतरेजनांनी ऑलरेडी पकडलेली असताना आपणही त्यात कसे घुसून हॅंडल मिळवावे? हे करत असताना श्वासोच्छ्वास कसा करावा? हातातील टिफिनडब्याचा अन्न आणि अस्त्र असा दुहेरी वापर कसा करावा? मुंबईच्या रस्त्यांवरील प्राचीन-अर्वाचीन खड्डे कसे लीलया हुकवावेत? पावसापाण्यात अडकल्यावर हास्यविनोद करीत घर कसे गाठावे? गर्दी कशी करावी? आदी प्रश्न आम्ही सहजी सोडवू शकतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मुद्दा येवढाच की (आम्ही कुठेही असलो तरी), आमच्या ठायी असलेली चिवटवृत्ती, चिकाटी आणि चिडचीड पाहता आम्ही अस्सल मुंबईकर म्हणून सहज पास होऊ. आम्हीच आमची स्वभाववैशिष्ट्ये काय सांगावीत? असो. 

मुंबईकरांच्या या जीजिविषु वृत्तीचे कोणी कवतिक केले की मात्र आमच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. मुंबईकर कुठल्याही परिस्थितीत जगू शकतो, असा एक जागतिक गैरसमज निर्माण झाला आहे, त्याचा आम्ही त्रिवार निषेध करतो! कां की, या गैरसमजामुळे आमचे जिणे दुष्कर होऊन बसले आहे. 

गेले पाचेक महिने आम्ही लॉकडाउनावस्थेत काढले. (दाढी हातभर वाढली!) अर्थात, लॉकडाऊनचे नियम हे इतरांसाठी असून आपण पाय मोकळे करावयास बाहेर हिंडण्यास काहीही हरकत नसावी, असा ठाम विश्वास आमच्या मनी कायम वसतो, हा भाग वेगळा!  विनाकारण घराबाहेर पडू नका, असे वारंवार ( ‘फेसबुक लाइव’वरून एका अस्सल मुंबईकराने) सांगूनदेखील आमची नाक्‍यावरील फेरी कधी चुकली नाही. कुठलीही बस अथवा लोकल कुठेही धावत नसतानाच्या काळातही आम्ही धावतच होतो. त्यात गेले दोन दिवस आम्हास पावसापाण्याने झोडपून काढले. बुडत्याच्या गळ्यात धोंडा अशी अवस्था झाली!!  

सध्या (आमच्या) मुंबापुरीत ‘मिशन बिगिन अगेन’ नावाचा सरकारी उपक्रम सुरू झाला असून त्या अंतर्गत ‘जे उघडे आहे, ते उघडे राहील व जे बंद आहे ते बंद राहील’ असे जाहीर करण्यात आले आहे. (ते खरेच तसे आहे का, हे पाहण्यासाठी आम्हाला हिंडणे भाग पडले.) परंतु, कोरोना, खड्डे आणि ट्राफिक हुकवता हुकवता आम्ही हिंडत असतानाच अचानक नवी घोषणा झाली. ती अशी : ज्याअर्थी, कोरोनाचे संकट टळलेले नसतानादेखील मुंबईकर नागरिक अजिबात ऐकत नसल्याचे निदर्शनास आले असून व लॉकडाउनच्या नियमांचे पालन होत नसून व कोरोनाची लागण आटोक्‍यात येत नसल्याचे दिसून आले आहे. त्याअर्थी, साथरोग कायदा अधिनियम अमूक अमूकनुसार मला दिलेल्या अधिकारांतर्गत असे आदेशित करण्यात येत आहे की येत्या चोवीस तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यवृष्टी होणार असून सखल भागातील नागरिकांनी तयारीत राहावे, तसेच उंचवट्यावर राहणाऱ्या नागरिकांनीही सावध राहावे!! विनाकारण घराबाहेर पडू नये, तसेच मास्क व सॅनिटायझर वापरणे बंधनकारक राहील. 

...तरीही आम्ही संपूर्ण तयारीनिशी घराबाहेर पडून रस्त्यावर नेमकी गर्दी किती आहे, हे बघून घेतले. दक्षिण मुंबईत कंबरभर पाण्यातून वाट काढत असताना एका सह जलप्रवाशाने मास्कआडून विचारले, की ‘‘आपण कोविडयोद्धा आहात का? पीपीइ किट घालून हिंडता आहात ते?’’

आम्ही मुस्करलो (ते त्यास दिसले नाही!) आणि म्हणालो, ‘‘छे, हा तर रेनकोट आहे!’’

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com