ढिंग टांग : गुर्जींचा तास! (अर्थात ऑनलाइन!)

ढिंग टांग : गुर्जींचा तास! (अर्थात ऑनलाइन!)

मुलांनो, इकडे लक्ष द्या. आले का सगळे ऑनलाइन? मला चौकटी कमी दिसताहेत ! चला हजेरी घेऊ...हं...बंड्या भुसनळे? (हजर) गुंड्या गुरमाळे? (हजर), बनी बेणारे? (उपस्थित सर!), सदा सुकाळे?...सदू सु...कुठे गेला रे तो? आं? दिसत नाहीए आज! नाही का आला ऑनलाइन? का नाही आला? अरे, घरबसल्या कसल्या रे दांड्या मारता? दांड्या मारून जाता तरी कुठे? आँ?.. बाहेर हिंडू नका रे पोराहो! मराल!! 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एऽ ऽ कोण आहे रे तो? टेबलाखाली कां जातोस? नीट बस बरं! हं!! तू या क्‍लासचा नाहीस का? नवाच दिसतोस? नाव काय तुझं? शिंच्या मोठ्यांदा बोल, थोबाड दिलंय ना देवानं? कोण? दिनू दिवाळेचे वडील का? बरं बरं! दिनू नाही का येणारे क्‍लासला? म्हणून तुम्ही येऊन बसलात? कमालच झाली. अहो, तुम्ही कशाला त्याच्या जागी येऊन बसलात? दिनूला काय झालं? काय ह..ह...ह...सांगताय? आवाज तुटतोय! हां हां, अच्छा, अच्छा, पोट बिघडलंय होय दिनूचं! बरं, ठीक आहे, काळजी घे म्हणावं त्याला! तुम्ही ऑफलाइन व्हा बरं आता! नमस्कार!

मुलांनो, गप्प बसा! एकदम निम्यूट बसा! म्हंजे तुमच्या कांपुटरचा आवाज म्यूट करा! त्याला निम्यूट म्हंटात, कळलं? माझा क्‍लास चालू असताना कोणीही बडबड  करायची नाही. कोणी बोलताना दिसला तर पट्टी फेकून मारीन! हसता काय फिदीफिदी! मूर्ख कुठले...गुंड्या, तुझ्या खोलीत आणखी कोण आलंय? तो घरगडी आहे का? त्याला बाहेर घालव बरं! माझ्या क्‍लासमध्ये डिस्टर्ब करायचं नाही कुणी! गुंड्या, गुंड्या, अरे घरगड्याला असं हाकलू नये! नम्रपणे बोलावं!! घरगडी असला म्हणून असं वागावं का? काय? घरगडी नाही? वडील आहेत? ओह...बरं बरं! अरे, केर काढताना दिसले म्हणून विचारलं हो! असू दे असू दे. 

आता प्रत्येकाने आपापली पुस्तकं काढा. जीवशास्त्र! आता या विषयावर तासभर जीव काढूया!! गेल्या क्‍लासमध्ये आपण प्रोटोझोआ शिकलो. काय शिकलो, मन्या मुंगळे तू सांग बरं!!... (दात ओठ खाऊन) प्रोटोझोआ असं स्वच्छ म्हणायला शीक आधी! शिवी वाटते तुझ्या तोंडून!! गाढव लेकाचा!! एकदा रीतसर शाळा सुरू होऊ दे. मग बघतोच तुला! नाही चड्डीत...(गडबडून) पाठीमागे कोण उभे आहेत तुझ्या? तुझे वडील का? (कसनुसं हसत) नमस्कार, नमस्कार! विद्यार्थी कु. मनीष तुमचा पाल्य आहे ना? त्याला थोडा रागावत होतो...होहो! नाही नाही!...असा गैरसमज नका करून घेऊ...रागावलो म्हंजे खराखुरा नव्हे काही? काय म्हणालात? तुम्ही माझ्या घरी मोटारसायकलवरून येणार आहात! नको नको! अहो, कुमार मनीष चांगला विद्यार्थी आहे! त्याला पैलू पाडतो आहे मी पैलू! हो, हो...पैलू पाडण्याचं काम ऑनलाइन होऊ शकतं! आपण या आता!!

मुलांनो, जीवशास्त्राचा यंदाचा अभ्यासक्रम सोपा आहे! बरेचसे धडे वगळले आहेत, तुमच्या सोयीसाठी! आमच्या नाही, तुमच्या सोयीसाठी! हे बघा, हे सगळं नव्या शिक्षण धोरणानुसार चाललं आहे बरं! मुलांच्या कलाकलानं शिकवावं, असं या धोरणात म्हटलं आहे. तेव्हा तुम्ही कलाकलानं शिका, कलकलाट करू नका!! आम्हीही कलाकलानं शिकवू! या गुगल क्‍लासरूममुळे आपल्या सर्वांची सोय केली आहे सरकारनं! तेव्हा करा सुरवात!! हांऽऽऽ...!!

मुलांनो, तुम्ही गेल्या क्‍लासमध्ये शिकवलेला प्रोटोझोआचा धडा वाचून ठेवा! मी आलोच...कुकर लावून! 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com