esakal | ढिंग टांग : प्रामाणिकपणाचे बक्षीस!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

कुठेही प्रामाणिकपणा दिसला की आमच्या डोळ्यांत टचकन पाणी येत्ये. ऊर अभिमानाने फुलून येतो. जीवनावरला विश्वास वृद्धिंगत होतो. आपल्यापेक्षा ‘हा’ कोणीतरी अस्तित्वात आहे, हे पाहून हायसे वाटते! आम्ही बालपणापासून भलतेच ‘हे’ आहोत, आय मीन... प्रामाणिक आहो! किंबहुना, प्रामाणिकपणा हा आमचा स्थायीभाव आहे, असे म्हटले तरी वावगे होणार नाही. परंतु, हाय! या गुणापायी आम्हाला भलभलते आरोप सहन करावे लागले. अगणित थपडा खाव्या लागल्या आणि फाकें पडले!! 

ढिंग टांग : प्रामाणिकपणाचे बक्षीस!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

कुठेही प्रामाणिकपणा दिसला की आमच्या डोळ्यांत टचकन पाणी येत्ये. ऊर अभिमानाने फुलून येतो. जीवनावरला विश्वास वृद्धिंगत होतो. आपल्यापेक्षा ‘हा’ कोणीतरी अस्तित्वात आहे, हे पाहून हायसे वाटते! आम्ही बालपणापासून भलतेच ‘हे’ आहोत, आय मीन... प्रामाणिक आहो! किंबहुना, प्रामाणिकपणा हा आमचा स्थायीभाव आहे, असे म्हटले तरी वावगे होणार नाही. परंतु, हाय! या गुणापायी आम्हाला भलभलते आरोप सहन करावे लागले. अगणित थपडा खाव्या लागल्या आणि फाकें पडले!! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अर्थात, इतके होऊनही आम्ही आमचा प्रामाणिकतेचा वसा काही सोडला नाही. शाळकरी वयात आमच्या नाकांतून किंचित उमटलेला धूर पाहून सुर्वेगुर्जींनी डोळे बारीक करून आमच्याकडे पाहिले. सर्व बाजूंनी धुराचे लोट बाहेर पडतील, इतके फोड फोड फोडले आणि आमच्या खिशातील विड्या जप्त केल्या. आम्ही हूं की चूं केले नाही. गुर्जी प्रामाणिक नव्हते! जप्त केलेल्या विड्या त्यांनी ओढल्या. ही बाब प्रामाणिकपणाने आम्ही घरी जाऊन सांगू शकलो असतो. पण नाही बोललो. गुरुजनांचा अनादर कसा बरे करावा? परंतु, त्यानंतर ते गुर्जी सरळ  डोळे वटारून (विडीसाठी) हात पसरू लागले.

त्यांच्यासाठी आम्हाला तीर्थरुपांच्या पाटलोणीच्या खिशातून दोन विड्या दररोज उचलाव्या लागत! ही प्रामाणिकपणाची किंमत आम्हाला वर्षानुवर्षे मोजावी लागली. सुर्वेगुर्जींचे कधीही भले होणार नाही! असो. प्रामाणिकपणाचेदेखील बक्षीस मिळते, हे ऐकून मात्र आम्हाला प्रचंड धक्का बसला. या देशात प्रामाणिकपणे प्राप्तिकर भरणाऱ्यास प्रामाणिकपणाचे बक्षीस मिळायलाच हवे, असे ते म्हणाले आणि आम्ही सर्द झालो. हे काय भलतेच? ‘नियमित प्राप्तिकर भरणाऱ्यांमुळेच हा देश चालत असतो, त्याचा यथोचित सन्मान होणे गरजेचे आहे’, हे साक्षात मा. श्रीश्री नमोजी यांचे उद्गार ऐकून तर आमचा आमच्याच कानांवर विश्वासच बसेना!! याला म्हंटात प्रामाणिकांचा प्रतिनिधी!! सद्गदित होत्साते आम्ही थेट त्यांच्याच दर्शनाला (मास्क लावून) गेलो. 

‘प्रणाम गुरुवर, आपले उपकार कसे फेडू समजत नाही! आजवर प्रामाणिकतेचा एवढा सन्मान या देशात कधीच झाला नव्हता!’’ आम्ही रुद्ध कंठाने कृतज्ञतेने म्हणालो. 

‘चोक्कस, ‘चोरलुटेरोंना अपमान अने, ईमानदारना सन्मान’ आ तो आपडी पोलिसी छे!’’ मा. नमोजी विजयी मुद्रेने म्हणाले. आम्ही आणखीनच सद्गदित झालो. डोळ्यांत पाणी आले, ऊर भरून आला. जीवनावरला विश्वास वृद्धिंगत झाला. आम्ही काही इतके ‘हे’ नाही, याची खात्री पटली. सगळे काही यथासांग झाले.

‘माणसाने कसे प्रामाणिकपणाने जीवन व्यतीत करावे. प्रामाणिकपणाने आपली चाकरी-व्यवसाय करावा, प्रामाणिकपणाने टॅक्‍स भरावा आणि प्रामाणिकपणाने रोज शांतपणे झोपी जावे’’, नमोजी आम्हाला प्रामाणिकपणाचे महत्त्व पटवून देत होते. प्रामाणिक शब्दाने आम्हाला पार ग्रासून टाकले. ज्याच्या खिशात फद्यादेखील नाही, त्याला प्रामाणिक असण्याचे बक्षीस कसे मिळणार, हे आम्हाला कळेना! ‘‘..काहीही झाले तरी मी यापुढेदेखील प्रामाणिकपणाचे व्रत सुरूच ठेवीन!’’ गुडघ्यावर बसत आम्ही घनघोर प्रतिज्ञा केली. 

‘दरसाल इमानदारीथी इनकम टेक्‍स भरणार ने?’’ नमोजींनी ममतेने विचारले. आम्ही छाती (जमेल तितकी फुगवून) प्रामाणिकपणाने म्हणालो : ‘‘अर्थात! इनकम सुरू झाला रे झाला की लगेच!’’
..तूर्त इनकम सुरू होण्याची वाट पाहात आहो!

Edited By - Prashant Patil