
‘‘बस, बस, बस! पुरे झाला हा तमाशा!’’, उजवा तळवा उंचावोन राजेसाहेबांनी इशारा दिला. त्यांची मुद्रा (अर्थातच ) उग्रगंभीर होती. भिवया वक्र जाहल्या होत्या आणि मस्तक सात्त्विक संतापाने हालत होते. डोईवरील शिरोभूषण हिंदकळत होते. वास्तविक असे काही घडले की महाराष्ट्रात कुठे ना कुठे काही ना काही खळ्ळकन फुटत्ये! किमानपक्षी एकाद-दोन ‘खटॅक’कन आवाज निघतात. वातावरण काही काळासाठी तंग होते. पण यावेळी राजियांनी खूण करताच फक्त शिवाजी पार्काडातील पाखरे तेवढी चिडीचूप जाहली. (न होवोन सांगतात कोणाला?) कुणाला थांगपत्ता लागेना की, काय चालले आहे बरे राजियांच्या मनांत?
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
इतिहासास ते ठावकें नव्हते आणि नाही. राजियांच्या मनींचे गूज जाणोन घेण्यासाठी इतिहासपुरुष गेले कैक महिने जंग जंग पछाडतो आहे. डोळियांत तेल घालोन वर्तमान निरखितो आहे. प्रंतु, छे, थांगपत्ता काही लागत नाही. इतिहासपुरुष हा कितीही म्हटले तरी जुनाट मतांचा. इतिहासकाळातून वर्तमानात यायला त्याला वेळ लागतोच. पण महत्प्रयासाने तो वर्तमानात आला आणि कुतुहलाने पुढील नाट्य पाहो लागला...
इतिहासच नव्हे तर अवघा महाराष्ट्र राजियांच्या मनातील भाव वळखण्यासाठी आतुर जाहला होता. जणू सारा महाराष्ट्राचा मुलुख म्हणत होता : ‘ राजे, राजे, उचला ती तेग आणि करोन टाका नवनिर्माण! होवोन जावो दे सुलतानढवा! करा येकच एलगार आणि पाडाव होवो महाराष्ट्राच्या गनिमांचा...हा महाराष्ट्र पुनश्च सुजलाम सुफलाम होवो दे! गावोगाव बागा फुलू देत! कारंजी उडू देत!’ आणि नियतीने ते बरोब्बर ऐकलेन! अगदी अचूक ऐकलेन! आपल्या कानांनी ऐकलेन!
‘महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची सुरवात स्वत:पासूनच करायला हवी!,’’ राजे अचानक उद्गारले. त्यांच्या त्या उद्गारांमध्ये महाराष्ट्राच्या भविष्याची चाहूल होती. नव्या क्रांतीची फुले होती आणि नवनिर्माणाचा ‘नवा पुनश्च हरि ॐ’ होता.
...एवढे बोलोन राजियांनी आरशासमोर ठाण मांडिले. एकेक करोन आपला ऐतिहासिक पोशाख अंगावेगळा केला. चिलखत उतरवले. बिचवा उतरवला. कमरेची तलवार काढोन ठेविली. हातातील खंजीर दूर फेंकला आणि...आणि...हातात कंगवा घेतला!
...बघता बघता राजियांचे राजबिंडे रूप अधिकच राजस दिसो लागले. मांडचोळण्याच्या जागी झक्कास जीन्स आली. पायातील देशी बनावटीची जुती रजेवर गेली आणि तेथे शुभ्ररंगीन खेळजोडे सजून दिसू लागले. बाराबंदीला सुट्टी मिळाली आणि तेथे फाइनाबाज टीशर्ट झगमगू लागला. मुखावर सुंदरशी कोरीव दाढी शोभा वाढवू लागली.
...झाले बहु होतीलही बहु, परंतु, यासम हॅंडसम हेच!!
अशा तारुण्यपूर्ण मेकओव्हरनंतर राजियांनी दर्पणात पाहिले. ‘सांग दर्पणा, कसा मी दिसतो?’ असे जणू ते विचारत होते. हाताचा अंगठा आणि किरंगळी उभी करोन मधली तिन्ही बोटे मोडून दर्पणातील (रुबाबदार) तरुणास ‘योऽऽ..’ अशी स्नेहपूर्वक साद घातली. दर्पणातील तरुणानेही नेमके तसेच केले व तो सुंदरसा मुस्करला. आरशाच्या कपाटावरील उंची सुगंधी द्रवाचा फवारा राजियांनी स्वत:वर फवारून घेतला. त्याक्षणी त्यांनी कुणाला विचारले असते की ‘‘क्या चल रहा है?’’ तर निश्चितपणे कुणीही ‘फॉग चल रहा है’ हेच उत्तर दिले असते!
मोठ्या आस्थेने राजियांनी कंगवा उचलून जीन्सप्यांटीच्या मागील खिश्यात चतुराईने दडविला. एक कमळ ब्रॅंडचा काळा चष्मा डोळ्यांवर चढवत ते आरशातील नवतरुणास म्हणाले : ‘‘हे देअर, हाऊ डू आय लुक?’’
‘‘वॉव!’’ आरशातील नवतरुण म्हणाला. हर्षभराने इतिहासपुरुष चित्कारला, ‘‘योऽऽ!’’
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.