ढिंग टांग : नॉटी बॉय!

ब्रिटिश नंदी
Wednesday, 9 September 2020

‘‘यू ऽऽ आर अ नॉटी ऑय!’’, तलवारीचे पाते आमच्या नाकाजवळून सपकन फिरवत सुप्रसिध्द सिनेतारका ऊर्फ बॉलिवुड क्कीन ऊर्फ म्याडमजी म्हणाल्या, ‘‘तुझं चपटं नाक उडवू का उडवू?’

‘‘यू ऽऽ आर अ नॉटी ऑय!’’, तलवारीचे पाते आमच्या नाकाजवळून सपकन फिरवत सुप्रसिध्द सिनेतारका ऊर्फ बॉलिवुड क्कीन ऊर्फ म्याडमजी म्हणाल्या, ‘‘तुझं चपटं नाक उडवू का उडवू?’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आम्ही जागच्या जागी गारद झालो! तलवारीचे एवढे काही नाही, कारण ती पुठ्ठ्याचीच होती. पण आम्ही नॉटी ऑय? छे काहीतरीच! लाजून आम्ही जांभळे पडलो. (गुलाबी अधिक काळा इज इक्वल टु जांभळा!) इतकी वर्षे आम्ही सिनेपत्रकारितेच्या क्षेत्रात वावरतो आहोत, पण कुणी आम्हाला नॉटी म्हणेल असे स्वप्नातदेखील वाटले नव्हते. नॉटी क्वाय? कॅहित्तरीच...! वाचकहो, एखाद्या जबर्दस्त, तडफदार आणि लोकप्रिय सिनेतारकेने स्प्रिंगच्या घोड्यावर बसून तुम्हाला तोंडावर ‘नॉटी’ म्हटले तर काय वाटेल? जरा विचार करा! सातव्या अस्मानात जावे की सातव्या पाताळात जावे? अशा यक्षप्रश्नात पाडणारी ही अवस्था. वरील घटना घडली ती आम्ही म्याडमजींची मुलाखत घ्यायला त्यांच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये गेलो तेव्हा. म्याडमजी तेव्हा एका ऐतिहासिक चित्रपटात भूमिका करत होत्या. (स्प्रिंगच्या लाकडी घोड्याचा रेफरन्स इथे येतो. असो.) सिनेपत्रकार म्हणून आम्हाला असे स्टार्लोकांच्या मुलाखती घेत हिंडावे लागते. विशेषत: एखादं पिक्‍चर थेटरात लागणार असेल, त्याच्या आधी स्टार्लोक मुलाखती द्यायला तयार होतात. किंवा अजिबातच पिक्‍चर मिळत नसले तरीही तयार होतात! स्टार्लोकांच्या मुलाखती मागाव्या लागत नाहीत. भाविकाला जसा देवस्थानांचा बुलावा येतो, तसा बुलावा आल्याशिवाय अशा दुर्मिळ मुलाखती मिळत नाहीत.

‘‘स्वत:ला उंबईकर सअंजतोस नं?’’ म्याडमजींनी स्वत:चे नाक उडवत तुच्छतेने विचारले. उंबईकर? हां हां, मुंबईकर! लिहस्टिक लावलं की मुंबईची उंबई होते, हे आमच्या किंचित उशीरा ध्यानी आले. आम्ही होकारार्थी मान डोलावली. ‘‘मला तर उमच्या उंबई ओलिसांची हीतीच वाटते!,’’ म्याडमजी म्हणाल्या. ओष्ठ्य उच्चारांचे उच्चाटन झाल्यामुळे आम्ही शब्दाशब्दाला अडत होतो, पण अर्थ लागला! ‘‘म ुंबई पोलिसांची भीती वाटते? ती कां हो?,’’ आम्ही विचारले. पोलिसांची भीती चोराचिलटांना वाटते, अशी आमची आजवर समजूत होती. ‘‘हुं: ही उंबई की इओके?,’’ इथे म्याडमजींनी पीओकेचे इओके केले, हे मात्र आम्ही तात्काळ ओळखले.

'हंऽऽ..! एका अर्थी आमची मुंबई ही’’पीओकेच आहे, असंच म्हणावं लागेल...‘आय मीन पर्फेक्‍टली ओके!,’’ आम्ही चलाखीने उत्तर दिले. नाही म्हटले तरी आमच्यातला मराठी माणूस (झोपेतून) जागा झाला होता. त्यासरशी तलवारीचा आणखी एक वार झाला. तो आम्ही चपळाईने चुकवला.
‘‘म्हणूनच हंटलं की यू आर अ नॉटी ऑय!,’’ म्याडमजी किरमिजी हंसत म्हणाल्या. किरमिजी हसणे म्हंजे...जाऊ दे. नॉटी बॉय ही कांप्लिमेंट आहे की शिवी? हे आम्हाला कित्येक तास कळले नाही. अजूनही धडसे कळले आहे, असेही म्हणता येणार नाही. आम्ही शब्दकोशात अर्थ बघून घेतला. नॉटी म्हंजे खोडकर, खोडसाळ, आगाऊ, थट्टेखोर, टिंगलखोर, चेष्टेखोर, अजिबात गांभीर्य नसलेला (वा नसलेली) आदी अर्थ निघाले. यापैकी कुठल्या वर्णनानुसार आम्ही नॉटी आहोत, हे आम्हाला अजिबात क़ळेना. कारण आम्ही एरवी फार जंटलमन माणूस आहो!

‘नॉटीचा अर्थ माहितीये का? ह***खोरा!,’’ स्प्रिंगच्या घोड्यावरुन सणसणत एक शिवी आली, आणि पुन्हा जांभळे पडलो. (रागाने लाग अधिक काळा इज इक्वल टु जांभळाच!)
‘‘खोटं वाट्टं? तुमच्या सामनावीर राऊतसाहेबांना जाऊन विचारा!’’ म्याडमजींनी लाकडी घोडा फेकत फर्मावले....आम्ही राऊतसाहेबांकडे डिक्‍शनरी उसनी मागायला निघालो आहो!

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article on Dhing Tang