esakal | ढिंग टांग : कळ, बळ आणि खळबळ !
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

आजची तिथी : प्रमादी संवत्सर श्रीशके  आश्विन शु. द्वादशी.
आजचा वार : मंडेवार!
आजचा सुविचार : भेटीलागीं जीवा। लागलीसे आस। पाहे रात्रंदिवस। वाट तुझी।। 

ढिंग टांग : कळ, बळ आणि खळबळ !

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

आजची तिथी : प्रमादी संवत्सर श्रीशके  आश्विन शु. द्वादशी.
आजचा वार : मंडेवार!
आजचा सुविचार : भेटीलागीं जीवा। लागलीसे आस। पाहे रात्रंदिवस। वाट तुझी।। 

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) माझ्या व्यक्तिमत्त्वातच काहीतरी आगळेवेगळे आहे, असे मला वाटू लागले आहे. मी कोणालाही भेटलो की लागलीच खळबळ माजते. मध्यंतरी गवर्नरसाहेबांना भेटलो, तेव्हाही खळबळ  माजली होती. आमचे पहाटमित्र मा. दादासाहेब बारामतीकर यांच्यासोबत एका लग्नाला उपस्थित राहिलो, तर केवढा गहजब झाला. काल-परवा सामनावीर संजयाजींचा फोन आला. म्हणाले, ‘येताय का जेवायला?’ तर जेवण पचायच्या आत महाराष्ट्रभर खळबळ! जेवणानंतर खळबळ होणे, हे पचनदृष्ट्या चांगले लक्षण नसले तरी राजकीयदृष्ट्या आरोग्यपूर्ण आहे, म्हणा! पण खरे सांगायचे तर खळबळ माजावी, असे मी काहीही करत नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माझ्या एकंदर हालचालींची सत्ताधाऱ्यांनी चांगलीच दहशत खाल्लेली दिसते. चांगले आहे, विरोधी पक्षनेत्याचा असा धाक असावाच. मी कोणालाही भेटलो की सत्तेतले तिन्ही पक्षातले नेते चडफडत उठतात आणि मास्क लावून एकमेकांना भेटून घेतात. -मला जाम हसू येते! गेल्या आठवड्यात बिहारला गेलो, तिथेही खळबळ, आणि परत आलो तर इथेही खळबळ! सरकार पाडण्यासाठी मी या भेटीगाठी करतो, असा काहीसा गैरसमज सत्ताधाऱ्यांचा झालेला दिसतो आहे. वास्तविक हे सरकार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही, हे मी वारंवार सांगितले आहे. हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल, असेही मी वारंवार सांगतो आहे. पण कोणी ऐक्कतच नाही! 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अधूनमधून सर्वांना भेटत राहावे. मिळून मिसळून राहावे, या मताचा मी आहे. येत्या काळात या ना त्या कारणाने मी सगळ्याच नेत्यांना एकेकदा तरी भेटणार आहे. मास्क लावून जाईन! सामनावीर संजयाजींना भेटलो तर इतकी खळबळ माजली, थेट ‘मातोश्री’वर जाऊन थडकलो, तर काय होईल? नुसत्या कल्पनेने गुदगुल्या होत आहेत! ‘मातोश्री’ मोटार रात्रीच्या अंधारात जाते आहे, आणि मीडियाच्या क्‍यामेऱ्यांची (उगीचच) नजर चुकवत परत येते आहे, हे दृश्‍य माझ्या डोळ्यांपुढे वारंवार येत्ये आहे...

‘वर  नुसते जायचे आणि निव्वळ शिळोप्याच्या गप्पा मारुन परत यायचे!  एवढे केले तरी पुष्कळ झाले!! महाराष्ट्रभर नुसती पळापळ होईल. सत्ताधाऱ्यांमधला अंतर्विरोध का काय म्हंटात, तो अगदी उफाळून येईल! एकदा तो उफाळून आला की पुढचे सारे सोपे होईल. 

पण यातली सर्वात कठीण बाब म्हंजे ‘’वरचा प्रवेश! तिथे भल्याभल्यांना शिरकाव नाही. पीपीइ किट घालून जाण्याचा इरादा आहे, बघू या कसे जमते ते! ते नच जमल्यास, एक दिवस पेडर रोडवरच्या ‘सिल्वर ओक’वर जाऊन चहा पिऊन यावा, असे मनात आहे. पण तो भलताच धाडशी आणि लास्ट ऑप्शन झाला! गेला बाजार आमचे पहाटमित्र मा. दादासाहेब बारामतीकरांना उभ्या उभ्या भेटलो तरी बराच अंतर्विरोध तयार होऊ शकतो. यापैकी कुठलीही एक गुप्तभेट पार पडली तरी काम फत्ते होईल, यात शंका नाही.

अंतर्विरोधामुळे सरकार पडेल हे खरे, तितकेच तो अंतर्विरोध निर्माण करायला हवा, हेही तितकेच खरे. या अंतर्विरोधाची कळ माझ्याच हातात आहे, हा नवा शोध मला लागला आहे. बिहारच्या निवडणुकीनंतर भेटीगाठींना लागावे,असे ठरवले आहे. तोवर कळ काढावी, हे बरे!

Edited By - Prashant Patil