esakal | ढिंग टांग : ऑन ड्यूटी चोवीस तास!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

चि. विक्रमादित्य : (खोलीच्या दारावर टकटक  करत) हाय देअर...मे आय कम इन बॅब्स?
उधोजीसाहेब : (अंथरुण पांघरुण अंथरत) नोप! रात्रीची वेळ आहे...गुड नाइट!
विक्रमादित्य : (आत येत) पण मी मास्क लावलाय ना!
उधोजीसाहेब : (करवादून) आधी दोन मीटर दूर हो!!
विक्रमादित्य : (हिरमुसून) कमॉन बॅब्स...मी ऑलरेडी दहा मीटर दूर उभा आहे!
उधोजीसाहेब : (समजूत घालत) रात्रीच्या वेळी सभ्य माणसं झोपतात! तूसुद्धा झोप!

ढिंग टांग : ऑन ड्यूटी चोवीस तास!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे बुद्रुक.
वेळ : रात्रीचा पहिला प्रहर.

चि. विक्रमादित्य : (खोलीच्या दारावर टकटक  करत) हाय देअर...मे आय कम इन बॅब्स?
उधोजीसाहेब : (अंथरुण पांघरुण अंथरत) नोप! रात्रीची वेळ आहे...गुड नाइट!
विक्रमादित्य : (आत येत) पण मी मास्क लावलाय ना!
उधोजीसाहेब : (करवादून) आधी दोन मीटर दूर हो!!
विक्रमादित्य : (हिरमुसून) कमॉन बॅब्स...मी ऑलरेडी दहा मीटर दूर उभा आहे!
उधोजीसाहेब : (समजूत घालत) रात्रीच्या वेळी सभ्य माणसं झोपतात! तूसुद्धा झोप!
विक्रमादित्य : (जिद्दीने) हीच खरी वेळ आहे कामाला लागण्याची! दिवसा काय, कोणीही काम करेल!! 
उधोजीसाहेब : (कासावीस होत्साते) मला कळत नाही, तुझा रात्रीच्या जागरणांबद्दल इतका आग्रह कां? हे पहा, संकट अजून टळलेलं नाही! दुसरी लाट येणारेय, असं डब्ल्यूएचोनं कळवलंय...माहिताय ना? आपण हळू हळू हळू हळू हळूवारपणे अनलॉक करत चाललोय! 

विक्रमादित्य : (ठासून मुद्दा मांडत) पण हे दिवसाचं अनलॉक आहे, रात्र अजूनही लॉकडाऊनमध्ये आहे! इस रात को अनलॉक किया जाय!!
उधोजीसाहेब : (नवल वाटून घेत) तुझ्या सुपीक डोक्‍यात येतात कुठून रे या कल्पना?
विक्रमादित्य : (स्तुतीने खुशालून जात) माझ्या डोक्‍यात कायम भन्नाट आयडिया असतात! मुंबईतली गर्दी कमी करण्याचा एकमेव मार्ग मलाच ठाऊक आहे!
उधोजीसाहेब : (कुतुहलानं) सांगून टाक बरं एकदा!
विक्रमादित्य : (दोन्ही हात पसरत ) रात्र अनलॉक करा! चोवीस तास कार्यालयं, हपिसं, हॉटेलं, मॉल उघडे ठेवा! बघा, गर्दी कमी होते की नाही ते!! 
उधोजीसाहेब : बाप रे! इथे दिवसा धड कामं होत नाहीत, आता रात्रीसुद्धा करायची म्हणतोस, म्हंजे फारच झालं!! 

विक्रमादित्य : (खुलासा करत) सोप्पं आहे बॅब्स! लोकांना सांगायचं, तुम्ही तुमच्या सोयीसवडीनं कधीही कामाला जा! जिथं जायचं तिथं गर्दी टाळा! आहे काय नि नाही काय! टायमिंगचा काच नसला की कशाला गर्दी होईल? ऑफिस आवर्स, कार्यालयीन वेळ अशी भानगडच ठेवायची नाही! कधीही या, कधीही जा! सो सिंपल!!
उधोजीसाहेब : लेका, बालिष्टर का नाही रे झालास?
विक्रमादित्य : (आणखी वहावत जात) एवढंच नाही तर सगळेच जागे राहिल्यामुळे चोरांना चोरी कधी करायची हेच मुळी कळणार नाही! मग गुन्ह्यांचं प्रमाणही कमी होईल! आपल्या राज्यातले चोर आणि दरोडेखोर बेरोजगार होतील, आणि बेरोजगार भत्ता मागायला तुमच्याकडेच दिवसाढवळ्या येतील! हाहा!! 
उधोजीसाहेब : (सर्द होत) तुझ्या या आयडिया कोणाला सांगितल्या नाहीएस ना?

विक्रमादित्य : (आश्वासन देत) कोणालाही नाही! फक्त एका मुलाखतीत सांगितल्या आहेत!
उधोजीसाहेब : (मटकन  बसत खोल आवाजात) तू आता झोपायला जा बघू! गुड नाइट!!
विक्रमादित्य : (उजळलेल्या चेहऱ्याने)  मी ड्यूटीवर निघालोय! तुम्हीही फॉर ए चेंज रात्री काम करुन बघा!
उधोजीसाहेब : (गंभीरपणाने) छे, छे! मी जे काही करतो, ते दिवसाढवळ्या भर उजेडात करतो! रात्री, पहाटे उद्योग करणाऱ्यांचं काय होतं, ते आख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलंय! गुड नाइट! आता हे फायनल हं!!
विक्रमादित्य : (थम्सअपची खूण करत)...तेच तर म्हणतोय! नाइट इज ऑलवेज गुड!! जय महाराष्ट्र!!

Edited By - Prashant Patil