ढिंग टांग : पाँडेजी कहां है?

ढिंग टांग : पाँडेजी कहां है?

‘पाँडेजी कहां है? कहां है पाँडेजी!,’ मिशीला पीळ देत डोळे रोखून श्रीमान पल्टूराम यांनी विचारले. ‘क...क...कौन पाँडेजी?’ आम्ही.

‘का बात कर रहे हो बा! पाँडेजी को नही पहचानते का? उनको तो बारा मुल्कों की पुलिस ढूंढ रहीबा!,’ अस्सल बिहारी ढंगात मिशीला आणखी एक पीळ देत ते म्हणाले.‘ माणसाने (स्वत:च्या असल्या तरी) येवढ्या मिश्‍या ओढू नयेत. एक दिवस हातात येतील, असे आम्ही नेमस्तपणाने त्यांना सांगणार होतो. पण गप्प बसलो झाले. कारण समोरील मान्यवरांच्या व्हटावर म्हणावी तितकी उपज दिसत नव्हतीच. आमचे बिहारी परममित्र श्रीमान पल्टूराम यांना कोण ओळखत नाही? उभा आडवा बिहार त्यांना ओळखून आहेच, सारा देशही त्यांना आदरेकरोन वळखतो. श्रीमान पल्टूराम यांनी सुरवातीपासूनच पांडेजींना आपला मानसपुत्र मानिले. त्यांचा प्रतिपाळ केला. त्यांना आपल्या पक्षात स्थान दिले. परंतु, तेच पांडेजी गायब असल्याचे लक्षात आले होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘...अरे अपने गुप्तेस्वर पाँडेजी के बारे में पूछ रहें है हम!’ श्रीमान पल्टूराम म्हणाले. आमच्या डोक्‍यात ट्यूब पेटली. हां हां! ‘ते’ गुप्तेश्वर पांडेजी!! मुंबई पोलिसांवर खार खाणारे! एक आदर्श पोलिस अधिकारी! गणवेषातही स्वत:तील काव्य हरपू न देणारे काव्यविहारी! टीव्ही क्‍यामेऱ्यासमोर अश्रू ढाळणारे संवेदनशील सद्‌गृहस्थ! ज्यांना मुंबईच्या लोकांनी काहीही कारण नसताना ‘जलील’ केले, असा कोमलहृदयी अधिकारी पुरुष!!
गुप्तेश्वर पांडे यांना आपण (तरी) पाहिलंत का? थोडेसे निमसावळे (हा एक वेगळाच रंग आम्ही इंट्रोड्यूस करत आहो!) मध्यम उंचीचे.
बारीक केस, मागे शेंडुकली, दाभणकाठी मिशा. अंगातील गणवेष उतरवून ते जे गायब झाले ते दिसले नाहीत. शेवटचे त्यांना (उमेदवारीच्या) तिकिटाच्या रांगेत उभे राहिलेले आम्ही बघितले होते. तिकिटाच्या रांगेत त्यांचा नंबर आला, आणि तिकिट खिडकी बंद झाली! श्रीमान पल्टूराम यांनीच त्यांना तिकिट घेण्यासाठी पाठवले होते. रांगेत नंबर धरुन रहा, त्याआधी गणवेष उतरवून ठेव, असे बजावले होते. पांडेजींनी आज्ञा शिरोधार्य मानिली, आणि ते इमानेइतबारे तिकिटाच्या रांगेत उभे राहिले. तिकिट खिडकीच्या कौंटरवर खुद्द पल्टूराम बसले होते. त्यामुळे तिकिट मिळणारच, म्हणून पाँडेजी निश्‍चिंत होते. पण घडले भलतेच! त्यांचा नंबर आला, आणि खिडकीच हापटण्यात आली.

तेव्हापासून पांडेजी कुणाला दिसले नाहीत. काही दिवसांपूर्वी ते मुंबई पोलिसांच्या मागावर होते. सर्वसाधारणपणे पोलिस अधिकारी चोर-दरोडेखोरांच्या मागे असतात, असा कुणाचा समज होईल. पण तसे नाही बरे! काहीवेळा पोलिसांच्या मागेही पोलिसांना लागावे लागते. आमचे हे पांडेजी मुंबई पोलिसांच्याच मागे हात धुऊन लागले होते!

पांडेजींसारखा कर्दनकाळ आणि दक्ष अधिकारी हात धुऊन मागे लागल्यावर मुंबईच्या पोलिसांनी हातोहात गुंगारा दिलान!! शेवटी पाठलाग सोडून पांडेजींनी गणवेष उतरवून खुंटीला टांगला आणि ते सरळ श्रीमान पल्टूराम यांच्या डेऱ्यात गेले. तेथेच त्यांना (उमेदवारीच्या) तिकिटाच्या रांगेत उभे राहण्याचा आदेश मिळाला. खिडकी बंद करुन पल्टूरामजी बाहेर आले आणि त्यांनी पांडेजींची चौकशी केली.

‘अब शो हौसफुल हुआ तो हम भी तो का करें!’ असे म्हणून पल्टूरामजी निघून गेले. आम्ही पांडेजींना शोधतो आहोत.
निष्कर्ष : थप्पडसे डर नहीं लगता साहब...प्यार से लगता है...
चुलबुल पांडे चित्रपटातील एक ड्वायलॉग!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com