ढिंग टांग : वाढदिवस एका शपथेचा!

ब्रिटिश नंदी
Tuesday, 24 November 2020

आजची तिथी : प्रमादी संवत्सर श्रीशके  कार्तिक कुष्मांड नवमी. (शुभ दिवस) आजचा वार : मंडेवार.
आजचा सुविचार : केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली...मिटले चुकून डोळे, हरवून रात्रगेली!

आजची तिथी : प्रमादी संवत्सर श्रीशके  कार्तिक कुष्मांड नवमी. (शुभ दिवस) आजचा वार : मंडेवार.
आजचा सुविचार : केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली...मिटले चुकून डोळे, हरवून रात्रगेली!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) ‘लौकर निजे, उशीरा उठे, त्यासी आत्मिक सुख आणि आरोग्य भेटे’ अशी एक नवी म्हण लॉक डाऊनमध्ये तयार झाली आहे. पण मी मात्र माझे रुटिन बदलले आहे. त्यानुसार आजही (नेहमीप्रमाणे) भल्या पहाटे उठून बसलो. पहाटेच्या वेळी भलभलती स्वप्ने पडतात. अंगाला दरदरुन घाम फुटून जाग येत्ये. जीव घाबरा होतो. गेले वर्षभर हे असेच चालू होते. पहाटेच उठून बसले की भलती स्वप्ने पडण्याची भानगडच उरत नाही! खुर्चीत बसावे, आणि राम राम म्हणावे!!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या वर्षी याच दिवशी, अशाच पहाटे मी शपथ घेतली होती. नुसत्या आठवणीने अंगावर काटा येतो. दिवसा राजरोस शपथ घेतली असती, तर त्या आठवणीने अंगावर रोमांच आले असते, या आठवणीने काटा येतो, काटा!! अजूनही ती आठवण ताजी आहे...

पहाटेच आंघोळ करुन तयार झालो होतो. छातीत धडधडत होते. माझे आवडते नमोजाकिट चढवून घाईघाईत (चहादेखील न घेता) राजभवनावर गेलो होतो. जाण्यापूर्वी आधी मा. दादासाहेब बारामतीकरांना फोन करुन खुंटा हलवून बळकट करुन घेतला होता. ‘तुमचं खरंच नक्की आहे ना? बघा हं!’ असे तीन-तीनदा विचारले होते. त्यांनीही तीन-तीनदा ‘हो‘ म्हणून सांगितल्यावर मगच निघालो होतो. पहाटेच्या मंगलसमयी रस्त्यावर दोनच गाड्या होत्या. एक माझी, दुसरी दुधाची!! पाठोपाठ तिसऱ्या गाडीचे दिवे अंधारात दिसू लागले तेव्हा जीव भांड्यात पडला होता. ती मा. दादासाहेबांची गाडी होती.

खोलीतले दिवे घालवून अंधारातच ब्याटरीच्या उजेडात शपथविधी करावा, असे कुणीतरी सुचवले. पण ब्याटरीत सेल नव्हते. शेवटी चाळीस पावरच्या बल्बच्या उजेडात आम्ही तीनेक मिनिटात शपथ उरकली. एकमेकांचे अभिनंदन केले, आणि सटकलो...

त्या शपथेला आज एक वर्ष कंप्लीट झाले. शपथविधीचा दणक्‍यात वाढदिवस करायचा का? असे आमचे प्रदेशाध्यक्ष मा. चंदुदादा काल विचारुन गेले. त्यांच्याकडे खाऊ की गिळू? अशा नजरेने पाहताच चष्मा पुसत निघून गेले... सकाळी मा. दादासाहेबांना आवर्जून फोन केला. त्यांनी चक्क ‘कोण बोलतंय?’ असे विचारले.

‘आमचा फोननंबरसुद्धा तुम्ही फोनबुकमधूनन डिलीट केलेला दिसतोय!’ मी तक्रारीच्या सुरात म्हटले. त्यावर मिनिटभर शांतता झाली! कुणीच काही बोलले नाही. शेवटी मीच म्हटले, ‘आठवते ना? गेल्या वर्षी याच तारखेला पहाटेच्या सुमारास तुम्ही आणि मी...’
‘कसली आठवण?’ ते म्हणाले.
‘गेल्या वर्षी याच तारखेला, अशाच पहाटेच्या सुमारास तुम्ही आणि मी एक शपथ घेतली होती..,’ म ी आठवण दिली.
‘कसली शपथ?’ ते म्हणाले.
‘अहो असं काय करताय?’ च्याटंच्याट!
‘हे पहा, असलं काही मला आठवत नसतं, आणि मी आठवणीत ठेवत नसतो. झालं गेलं गंगेला मिळालं, असं समजून पुढे जाणारी आम्ही माणसं आहोत!’ त्यांनी घाईघाईत मला वाक्‍यदेखील पूर्ण करु दिले नाही.
...फोन ठेवला. ‘केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली...’ ही गजल गुणगुणत मी किंचित हसलो. कारण मा. दादासाहेबसुद्धा रोज भल्या पहाटे उठून बसतात, असे मला नुकतेच कळले आहे!

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article on dhing tang