ढिंग टांग : सरकार पडणार?

Dhing-Tang
Dhing-Tang

माजी मित्रवर्य मा. नानासाहेब यांसी, कृतानेक (कोपरापासून) नमस्कार विनंती विशेष. निर्वाणीचा खलिता पाठविणेचे निमित्त्य घडिले आहे. अन्यथा आम्ही आपणांस काही लिहावे, आणि आपण त्याचे उत्तर द्यावे, ऐसे नाही! प्रंतु काळच मोठा कठीण आला. आपल्या काही शिलेदारांनी उठता बसता ‘सरकार पडणार, सरकार पडणार’ अशा आवया देण्यास सुरवात केलियाने आमचे मस्तक फिरले आहे. जो उठतो तो आमचे सरकार पडण्याची नवी तारीख देतो. सरकार स्थापनेस आता संवत्सर होईल, परंतु, हा सिलसिला कायम आहे. आमच्या जासुदांनी आणलेल्या नव्या खबरींनुसार दौलतीचा कारभार समर्थपणे हांकणारे आमचे अष्टप्रधान मंडळ रद्दबातल करोन सरकार उलथण्यासाठी मोठाच कट रचणेत येत असल्याचे आपलेच कुणीएक दानवे नामक सरदार म्हणाल्याचे कळाले. जगदंब जगदंब! या पातकांस कोठली शिक्षा द्यावी, हा आमच्यासमोरील प्रश्नच आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

श्रींच्या कृपेने आमचा कारभार उत्तम सुरु असोन महाराष्ट्र ‘सुजलाम सुफलाम’ होत आहे. जनताजनार्दन सुखी समाधानी आहेत. कवणाच्या शेतीच्या काडीस ढका लावणेची कोणाची प्राज्ञा नाही. दिव्याची वांत पळविणाऱ्या उंदरांचाही दरोबस्त बंदोबस्त करणेत आला असोन सर्व काही आलबेल आहे. असे असताना आपल्या गोटातील काही नष्ट नेते ‘सरकार आज पडणार, उदईक  पडणार’ ऐश्‍या आवया उठविण्यात धन्यता मानीत आहेत. यांस काय म्हणावे?  त्यांस आम्ही येवढेच सांगू की  ‘सरकार पाडावयास उदईक  यावयाचे, ते आजच या! आज यावयाचे, ते आत्ताच या!’ तुमच्या या आवयांचा आम्हांस बहुत कंटाळा आला असोन एकदाचे काय तो कट उरकोन टाका!! 
 कळावे. आपला. उधोजी. 
ता. क. : सरकार पाच वर्षे चालेल! पाच वर्षे आवया उठवत  बसा!!

मा. मित्रवर्य उधोजीसाहेब यांसी बालके नानासाहेबाचा मानाचा मुजरा! आपले पत्र मिळाले. ‘सरकार पडणार’ ही आवई नसून महाराष्ट्राच्या जनतेला दिलेला तो दिलासा आहे. अधूनमधून जनतेला बरे वाटावे, म्हणून आमचे काही शिलेदार हा उद्योग करीत असतात. ‘सरकार पडणार’ असे म्हटले की आमच्या लोकांनाही जरा बरे वाटते. माणसाने नेहमी सकारात्मक राहावे, असे माझे साऱ्यांना सांगणे असते. मी स्वत: खूपच सकारात्मक आणि हसतमुख असतो, हे आपल्याला माहीत आहेच!

‘सरकार पडणार’ ही आमच्या काही शिलेदारांची अतृप्त इच्छादेखील आहेच. आपण ते फारसे मनावर घेऊ नये. मीदेखील घेत नाही. अर्थात सरकार ‘चुकून’ पडलेच, तर मी तयार आहेच! तेव्हा दौलतीची काळजी नसावी. 
सरकार पडणार, असे आमच्यापैकी कोणीही म्हणाले रे म्हणाले, की तुमच्या गोटात पळापळ होते. धावाधाव करुन तुमचे नेते एकमेकांना घाबरेघुबरे भेटतात. ते बघून अनेकांची चांगली करमणूक होते, म्हणूनच हा उपक्रम आम्ही राबवला आहे. काही टीव्ही च्यानलचे पत्रकारही उगीचच येऊन ‘ब्रेकिंग न्यूज ‘द्या ना’ असा लकडा लावतात. मग त्यांना कुठली तरी तारीख फेकून सरकार पडणार असे सांगावे लागते!! असो.

दौलतीचा कारभार आपण हाती घेतलात, त्याला आता वर्ष होईल. वर्षपूर्तीची पार्टी देणार आहात का? देणार असाल तर कुठे? कृपया कळवावे! मी नक्की येईन. पार्टी कोणाचीही असली तरी मी त्यात पार्टी पॉलिटिक्‍स आणत नाही, हेही तुम्हाला माहीत आहेच. 
कळावे. आपला. नानासाहेब फ.
ता. क. : पाच वर्षे सरकार चालेल, म्हंटा? दोन महिने थांबा, दोन महिने!! 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com