esakal | ढिंग टांग : सुदर्शनचक्र वि. सूडचक्र!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

दरवेळी आम्हाला म्यारेथॉन मुलाखतीनंतर लागलीच दुसरी म्यारेथॉन मुलाखत घ्यावी लागते. इलाजच उरला नाही. ही परंपरा आहे. कारभाराच्या वर्षपूर्तीचे पेढे मिळावेत, या आशेने आम्ही(ही) ‘मातोश्री महाला’वर जाऊन पोचलो. ‘आम्हालाही मिनी म्यारेथॉन मुलाखत द्या की’ अशी गळ घातली.  आता ‘कोण साहेब?’ म्हणून दात विचकून विचारू नका!- पडतील ते दात!!.

ढिंग टांग : सुदर्शनचक्र वि. सूडचक्र!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

दरवेळी आम्हाला म्यारेथॉन मुलाखतीनंतर लागलीच दुसरी म्यारेथॉन मुलाखत घ्यावी लागते. इलाजच उरला नाही. ही परंपरा आहे. कारभाराच्या वर्षपूर्तीचे पेढे मिळावेत, या आशेने आम्ही(ही) ‘मातोश्री महाला’वर जाऊन पोचलो. ‘आम्हालाही मिनी म्यारेथॉन मुलाखत द्या की’ अशी गळ घातली.  आता ‘कोण साहेब?’ म्हणून दात विचकून विचारू नका!- पडतील ते दात!!..या महाराष्ट्रात एकच साहेब आहेत!!  महाराष्ट्राच्या परमभाग्यामुळे मा. साहेबांनी आमची विनंती चक्क मान्य केली. मिनी-मुलाखत नेहमीप्रमाणे खेळीमेळीने पार पडली. मुलाखतीच्या वेळी मा. साहेब विशिष्ट पोजमध्ये बसले होते. ती पोज पाहून कुणालाही महाभारतातील युगंधराचे स्मरण व्हावे. मा. साहेबांच्या मस्तकामागे तेजोवलय होते. मुखकमल (सॉरी...मुखचंद्र!) तेज:पुंज होते...अब आगे!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आम्ही : (अतीव आदरेकरोन) मुजरा साहेब, मुजरा!  तुमच्या कारभाराला एक वर्ष पूर्ण झालं! अभिनंदन!!
साहेब : (एका बोटाने ) थॅंक्‍यू! त्याचं श्रेय कोरोनाला...आय मीन कोविडयोद्‌ध्यांना जातं!

आम्ही : (लघळपणाने) हे वर्ष कसं गेलं?
साहेब : (अंपायरने औट दिल्यागत बोट वर ठेवून) हात धूत गेलं! हाहा!!
आम्ही : (संशयानं) विनोद होता?
साहेब : (गंभीर चेहऱ्यानं) खामोश! आम्ही विनोद करत  नसतो! तुम्ही गॉगल लावून का आलात ते सांगा आधी! 

आम्ही : (मनोभावे) तुमच्या तेज:पुंज चेहऱ्याकडे उघड्या नजरेने बघितले तर डोळे जातील, अशी सूचना आम्हाला आधीच्या मुलाखतकारांनी केली होती! 
साहेब : (संतापून) ग्रहण लागलंय का आम्हाला? नॉन्सेन्स! बरं असू दे! प्रश्न विचारा! (अचानक आठवून) ‘क्‍या चल रहा है’ हा प्रश्न विचारायचा नाही!  दरवेळी तुम्ही हा प्रश्न विचारता आणि आम्ही ‘फॉग चल रहा है’ असं उत्तर देतो! काहीतरी नवा प्रश्न येऊ द्या!!

आम्ही : बरं बरं...तुम्ही हे एक बोट वर का केलंय?
साहेब : (तुच्छतेने) तुम्हाला बोट दिसतंय! सुदर्शनचक्र आहे ते!  तुमच्यासारख्या पापिष्टांना कसं दिसेल?
आम्ही : (दचकून) बाप रे!! सुदर्शनचक्र कशासाठी?
साहेब : (डरकाळीयुक्त स्वरात) सूडचक्राचा इफेक्‍ट नलिफाय करण्यासाठी सुदर्शनचक्रच हवं!

आम्ही : (संशयानं) कोणाचं सूडचक्र? कोण घेतंय सूड?
साहेब : (संतापाने) ते तुम्हीच बघा! पण गाठ आमच्याशी आहे म्हणावं! आम्ही काही मेल्या म्हशीचं दूध पिणारे नाही! मर्दाची जात आहे! तुम्ही एक सूड घेतला तर आम्ही दहा घेऊ!!
आम्ही : हे सुदर्शनचक्र तुम्ही कोणावर चालवणार?
साहेब : ( ‘भिंऽऽग’ असा तोंडानेच आवाज काढून) अर्थात महाराष्ट्रद्रोह्यांवर! मुंबईला नावं ठेवणाऱ्यांवर! आम्हाला बदनाम करणाऱ्यांवर!

आम्ही : (ट्यूब पेटत) हांहां! म्हणजे त्या कमळ पार्टीवाल्यांवर...असं सरळ सांगा ना!
साहेब : (सुदर्शन एका बोटावरून दुसऱ्या बोटावर घेत) आम्ही कशाला ते नाव घेऊन आमची जीभ विटाळू?
आम्ही : (उत्सुकतेनं) हाती घेतलेलं सुदर्शनचक्र तुम्ही कधी चालवणार याकडे महाराष्ट्र डोळे लावून बसला आहे!!
साहेब : (थोडा अंदाज घेतल्यागत) त्यांची शंभर पापं भरण्याची वाट बघतोय! सेंच्युरी झाली, की इथून सुदर्शन निघालंच म्हणून समजा!!

आम्ही : (आवराआवर करत) शेवटला प्रश्न...हे खरंखुरं सुदर्शनचक्र आहे की आपलं असंच ‘चंमतगं’ टाइप?
साहेब : (धुमसत उठून उभे राहात) सोडून दाखवू? चालते व्हा! जय महाराष्ट्र!!

Edited By - Prashant Patil

loading image