ढिंग टांग : आपण सारे जबाबदार...!

ब्रिटिश नंदी
Tuesday, 23 February 2021

दादू : (फोन फिरवत आवाज बदलून) ....नमस्कार ...कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही! दुसरी लाट दारावर धडका देत आहे! शिस्त पाळा, आणि लॉकडाऊन टाळा! मास्क लावा, आणि लॉकडाऊन टाळा! वारंवार हात धुवा आणि लॉकडाऊन टाळा!-

दादू : (फोन फिरवत आवाज बदलून) ....नमस्कार ...कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही! दुसरी लाट दारावर धडका देत आहे! शिस्त पाळा, आणि लॉकडाऊन टाळा! मास्क लावा, आणि लॉकडाऊन टाळा! वारंवार हात धुवा आणि लॉकडाऊन टाळा!-
सदू : (संतापून) गुर्रर्र...गुर्रर्र...घर्रर्रर्रर्र...!
दादू : (अनवधानाने) वाघ पाळा, लॉकडाऊन टाळा!
सदू : (चवताळून) दादूऽऽ... खामोश! महाराष्ट्राचा खराखुरा वाघ आहे मी!
दादू : (आवाज ओळखून निर्धास्तपणे) हात्तिच्या, सद्या, तू होय! मला वाटलं जिजामाता उद्यानातूनच खरोखर एखादा वाघच बोलतोय! हाहा!! (खेळीमेळीनं) गंमत केली रे! माझा गमत्या स्वभाव तुला माहीत आहेच की! हल्ली माझे विनोद लोकांना खूप आवडायला लागले आहेत! शाब्दिक कोट्या, विनोदी शेरेबाजी... पब्लिक खूप टाळ्या वाजवतं! परवा माझं शिवनेरीवरचं भाषण ऐकलंस ना? शिवनेरीचा परिसर हशा आणि टाळ्यांनी दुमदुमून गेला होता!
सदू : (विषय बदलत) ते जाऊ दे! दादूराया, मी तुझं काय घोडं मारलंय, ते आधी सांग!
दादू : (कर्तव्यकठोरपणे) मी कुठे असं म्हटलं? छे, तुला काय, मला काय, वेळ मारुन नेणं एवढंच जमतं! हाहा!!
सदू : (कपाळाला हात...) पुन्हा विनोद?
दादू : (जबाबदारी ओळखून) ...म्हणणं एवढंच की सदूराया, जबाबदार नागरिक हो की रे! तू मास्क वापरत नाहीस अजिबात! ते गैर आहे!!
सदू : (दुराग्रहानं) नाय वापरणार जा!
दादू : (खांदे उडवत ) ...अशानं मला पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल!!
सदू : (रागाने धुमसत) टीव्हीवरचं कालचं तुझं भाषण ऐकलं! मलाच उद्देशून बोलत होतास ना?
दादू : (खुदखुदत) लेकी बोले, सुने लागे! बरोब्बर ओळखलंस! हुशार आहेस!
सदू : (छद्मी सुरात) न ओळखायला काय झालं? पक्ष वाढवा पण कोरोना वाढवू नका, मास्क लावा हे सगळं माझ्यासाठीच होतं, हे कोणीही ओळखेल!
दादू: (समजूत घालत) मास्क लाव रे बाबा, मास्क लाव! जबाबदार नागरिक हो! तुमच्यासाठीच ‘मी जबाबदार’ ही मोहीम सुरु केली आहे आम्ही! मी जबाबदाऽऽर... जबाऽऽबदाऽऽर... नवीन गाणंसुद्धा करतोय!
सदू : (टोमणा मारल्यागत) ‘मी चौकीदार’ची कॉपी वाटतेय!
दादू : (वैतागून) मी कुणाच्या कॉप्या मारत नाही! तूच कॉपीबहाद्दर आहेस!
सदू : (पेचात टाकत) मी जबाबदार म्हंजे नेमकं कोण जबाबदार?
दादू : (मास्तरागत समजावून सांगत) सोप्पंय! मी जबाबदार म्हंजे मी स्वत: जबाबदार असं नाही! तुम्ही सगळेच जबाबदार आहात, असं म्हणायचंय मला!
सदू : (खिदळत) एक काय ते ठरव! मी जबाबदार की तू जबाबदार?
दादू : (गोंधळून) मी जबाबदार म्हंजेच तू जबाबदार, आणि तू जबाबदार म्हंजे मी जबाबदार! म्हंजे मी हा प्रथमपुरुषी एकवचनी न घेता, तृतीयपुरुषी बहुवचनी... (आणखी गोंधळून) जाऊ दे! घरी पोळ्या लाटून, कपडे धुऊन, भांडी घासून वर्क फ्रॉम होम करणारे सगळेच स्वत:ला उद्देशून ‘मी जबाबदार’ असं म्हणू शकतात!
सदू : (खिन्नपणे) बरंच गुंतागुंतीचं दिसतंय!
दादू : (चलाखीने) आहेच मुळी!
सदू : (खोल आवाजात) तुझ्या या मोहिमा, विनोद वगैरे थांबवण्यासाठी काय उपाय आहे?
दादू : (टेप लावल्याप्रमाणे) एकच उपाय आहे! मास्क लावा, सॅनिटायझर वापरा, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा! हाहा!! जय महाराष्ट्र!

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Editorial Article Dhing Tang