esakal | ढिंग टांग : औषधयोग!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

बाबाजी की जय हो! परमपूज्य हठयोगी महर्षी बाबा बामदेव ऊर्फ पू. बाबाजी यांच्या योगशिबिराच्या अतिविशाल मंडपात आल्हाददायक वातावरण होते. भल्या पहाटेची वेळ होती. पार्श्वभागी बांसुरीची भूप रागातील सुरावट वाजत होती.

ढिंग टांग : औषधयोग!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

बाबाजी की जय हो! परमपूज्य हठयोगी महर्षी बाबा बामदेव ऊर्फ पू. बाबाजी यांच्या योगशिबिराच्या अतिविशाल मंडपात आल्हाददायक वातावरण होते. भल्या पहाटेची वेळ होती. पार्श्वभागी बांसुरीची भूप रागातील सुरावट वाजत होती. (खुलासा : सकाळची वेळ आणि पार्श्वभागी बांसुरीची सुरावट याचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. काही चहाटळांना वेगळाच वास येईल! केवळ वातावरणाचे खुमासदार वर्णन म्हणून ही वाक्‍ये टाकली आहेत. असो.) आसपास अनेक शिबिरार्थी चटया पसरुन पू. बाबाजींची वाट पाहात होते. जागा पाहून आम्हीही आमचे जाजम पसरले.

‘क्‍या हाल है?’ शेजारच्या चटईवरुन डॉ. हर्षवर्धन यांनी आमची चौकशी केली. आपण सारे डॉक्‍टरांकडे जाऊन कान-नाक-जीभ दाखवून औषधे घेऊन येतो. डॉक्‍टर मंडळी आपली प्रकृती दाखवायला पू. बाबाजींकडे जातात, हे आम्हाला तेव्हाच कळले. एका अर्थी आमचे पू. बाबाजी हे डॉक्‍टरांचे डॉक्‍टर आहेत!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘चाललंय!’ आम्ही कसनुसा चेहरा करुन म्हणालो. सकाळच्या वेळी घाईघाईने उठून योगशिबिरात येऊन हातपाय पसरावे लागणाऱ्या इसमाला प्रकृतीविषयी विचारु नये!! यावेळी अनेक निकडीचे प्रश्न काट्यावर आलेले असतात. जाऊ दे.

कोरोनाची महामारी आटोक्‍यात यावी, म्हणून दोनशेचाळीस वर्षे हिमालयात संशोधन करुन पू. बाबाजींनी एक जडीबूटी शोधून काढली असून, त्यांनी केलेल्या आयुर्वेदिक औषधाच्या जोरावर आपण लढाई जिंकत आणली आहे. पू. बाबाजींच्या जबर्दस्त दवाईमुळे विषाणूचे सगळे काटे ढिले झाले, असे डॉक्‍टरसाहेब भक्तिभावाने सांगत होते. कोरोनाच्या विषाणूचे काटे ढिले होणे, ही कल्पना आम्हाला बेहद्द आवडली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘व्वा! पू. बाबाजींची कमालच आहे!’ आम्ही म्हणालो.
‘अरे, पू. बाबाजी की दवाई तो संजीवनी बुटी है, भाई!’ डॉक्‍टरसाहेबांनी चटईवर बसल्या बसल्या डोळे मिटून हात जोडले. पू. बाबाजी नसते तर या देशाचे काय झाले असते, या विचाराने आम्हीही थोडे कृतज्ञतेने ओथंबलो.
‘भौ, संजीवनी बुटीची एक बॉटल तं तुम्ही घेऊनच घ्या नं! सकाळ-संध्याकाळ घेऊन घेतलं तं काह्याले तो कोरोनाफिरोना येतो? मारो गोली...,’ डाव्या बाजूच्या चटईवरुन दुसरा आवाज आला. पाहातो तो काय! तेथे साक्षात आपले नागपूरवाले मा. गडकरीसाहेब बसले होते.

‘प्रणाम साहेब! तुम्ही? तुम्हीसुद्धा?’ आम्ही ओरडलो. आमच्या ओरडण्याने शेक्‍सपीअरच्या ‘ओह, ब्रूटस, यू टू?...देन सीझर मस्ट डाय!’ या सुप्रसिद्ध डायलॉकची आठवण झाल्याचे नंतर आम्हाला काही लोकांनी सांगितले.
‘मी तं जुना फॅन आहो, बाबाजींचा!’ गडकरीसाहेबांनी खुलासा केला.
‘तुम्ही योगसाधना करता की काय?’ आम्ही अविश्वासाने विचारते झालो. त्यावर त्यांनी ‘ऊंऊंहू:’ असा अगम्य आवाज काढत चेहरा वाकडा केला. बराच वेळ कुणी काही बोलले नाही. पू. बाबाजी मंचावर कधी उपस्थित होतात, याची आम्ही वाट पाहात होतो.

‘एकावर एक फ्री आहे, घेऊन घ्या!’ गडकरीसाहेबांनी आपली मेडिकल रिप्रेझेंटेटिव टाइप चामडी ब्याग काढून दोन बाटल्या पुढे धरल्या.
‘उनसे मत लेना, भाई, मेरे यहां एक पे दो फ्री है!’ डॉक्‍टर हर्षवर्धनसाहेब दुसऱ्या बाजूने ओरडले. दोघांनी माझ्या बाह्या खेचल्या. पुढे काय घडले ते नेमके आठवत नाही.
...आता आमचा आयुर्वेदावर प्रगाढ विश्वास आहे. त्याहूनही दुप्पट प्रगाढ विश्वास योगसाधनेवर आहे. या दोहोंचा अंगिकार केलेली व्यक्ती सुमारे दोनशे चाळीस वर्षे प्रगाढ जगते, असेही आम्ही कळले आहे! पू. बाबाजी की जय हो!!

Edited By - Prashant Patil