ढिंग टांग : उचलबांगडी ( एक काल्पनिक लघुकथा)

ब्रिटिश नंदी
Thursday, 5 November 2020

‘इंडिया वाँट्‌स टु नो, पूछता है देस !’ कॅमेऱ्यात बघून तो नेहमीप्रमाणे तारस्वरात ओरडला. स्टुडिओत शांतता पसरली. टीव्हीच्या प्यानल डिस्कशनसाठी डझनभर चर्चक येऊन स्टुडिओत बसलेले होते. कुठेतरी काच खळ्ळकन फुटल्याचा आवाज आला. ही ध्वनिलहरींची किमया बरे! हजारो डेसिबल्समध्ये ध्वनिलहरी आदळल्या की काच फुटते. या सुप्रसिध्द च्यानलच्या स्टुडिओत रोज एक काच आणि पाचेक कान फुटतात!!

‘इंडिया वाँट्‌स टु नो, पूछता है देस !’ कॅमेऱ्यात बघून तो नेहमीप्रमाणे तारस्वरात ओरडला. स्टुडिओत शांतता पसरली. टीव्हीच्या प्यानल डिस्कशनसाठी डझनभर चर्चक येऊन स्टुडिओत बसलेले होते. कुठेतरी काच खळ्ळकन फुटल्याचा आवाज आला. ही ध्वनिलहरींची किमया बरे! हजारो डेसिबल्समध्ये ध्वनिलहरी आदळल्या की काच फुटते. या सुप्रसिध्द च्यानलच्या स्टुडिओत रोज एक काच आणि पाचेक कान फुटतात!! पण आज बहुधा कुणाचे कान फुटले नसावेत. किंवा त्यांनी कानात बोळे तरी घातले असावेत!! ‘इंडिया वाँट्‌स टु नो’ या पहिल्याच आरोळीला डझनभरांपैकी दोघेतिघे दचकून खुर्चीतून कोसळतात, असा आजवरचा अनुभव. आवाज रोजच्यासारखा लागला नाही, असे त्याच्या मनात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्याला कोण ओळखत नाही? त्याच्यासारखा टीव्ही पत्रकार अखिल त्रिखंडात आढळणार नाही. त्याचा च्यानलही त्याच्याइतकाच भयंकर सुप्रसिद्ध आहे. किंबहुना, तोच एक मूर्तिमंत सुप्रसिद्ध च्यानल आहे.
लहानपणी त्याला दाराआड लपून मोठमोठ्या लोकांना ‘भॉ’ करायची सवय होती. ती पुढे हाताबाहेर गेली आणि तो सुप्रसिद्ध पत्रकार झाला. लहान मुलांचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात, हा पाळण्यातूनही भॉ करीत असे, असे म्हंटात! एका बालरोगतज्ज्ञाला त्याच्यामुळे मानसोपचारतज्ज्ञाकडे जाऊन उपचार घ्यावे लागले, अशीही एक दंतकथा आहे. दंतकथेवरुन आठवले! त्याच्या प्रत्येक दातावर एक सूक्ष्म ध्वनिक्षेपक बसवण्याची कामगिरी जमली नाही म्हणून या थोर्थोर टीव्ही पत्रकाराने सदरील दंतवैद्याचे दात पाडले होते.
पत्रकारिता म्हणजे आपणच  यावर त्याचा ठाम विश्वास आहे. 

‘एऽऽ...’ क्‍यामेऱ्याकडे बोट रोखत तो ओरडला. देशभरातील प्रेक्षकांपैकी आठ-दहा तरी दचकले असणार! आठ कोटी लोक एकाचवेळी दचकले पाहिजेत, तर त्याला खरा टीआर्पी म्हणता येईल, असे त्याच्या मनात येऊन गेले. किंबहुना, टीआर्पी मोजण्याचा हाच दंडक असावा, असा त्याचा आग्रह आहे. 

‘एऽऽ...यू!’ तो पुन्हा ओरडला. त्याच्या केसांची झुल्पे उसळलेल्या दर्याच्या लाटांसारखी हिंदकळली. गळ्याच्या शिरा ताणल्या जाऊन टायची गाठ ढिली झाली. 
‘आयम द बेस्ट! माझ्याइतका लोकप्रिय, बुद्धिमान, न्यायप्रिय अँकर कुणीही नाही! हे कोणाला मान्य आहे?’ त्याने प्रश्न चर्चेला खुला केला. डझनभर  चर्चकांनी माना डोलावल्या. काही चर्चकांनी ‘होय होय’ अशी मान डोलावली. काहींनी ‘नाही नाही’ असे खुणावले. त्यांच्याकडे भेदक नजरेने पाहात तो ओरडला, ‘प्रूव इट! सिद्ध करा!’

एवढ्यात गडबड  झाली. भलतीच मोठी गडबड  झाली. स्टुडिओत लाइव्ह चर्चा सुरु असताना दोन-तीन पोलिस दांडकी आपटत आत शिरले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून एक पो. दादा लाइव म्हणाले, ‘साएब, तुम्हाला याव लागतंय! चला!’ 
‘क...क...कुठे?‘ तो लाइव किंचाळला. त्याने खुर्ची घट्ट धरुन ठेवली. पोलिसांनी बखोटीला धरुन त्याला खुर्चीसकट उचलण्याचा प्रयत्न केला. ‘कुठे नेताय? इंडिया वाँट्‌स टु नो, अहोऽऽ!’ तो किंचाळला. लहानपणी शाळेत नेताना तो अगदी अस्सेच करीत असे.
‘आम्हाला लायनीपरमानं जाऊ द्या. येतो का उचलू तुला?’ दुसऱ्या पो. दादाने मिशीला पीळ भरत निर्वाणीचा इशारा दिला. ...त्याचा थयथयाट शमेना. शेवटी पो. कॉ. ने पो. कॉ. ला म्हटले, ‘ घेवया पोत्यात! चल, उचल!!’
‘अहो, ऐका नाऽऽ...इंडिया वाँट्‌स टु नोऽऽ...’ असे तो शेवटचा खच्चून ओरडला, पण एकही काच फुटली नाही नि कानही!! 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: editorial article on dhing tang 5th November Thursday