हौस ऑफ बांबू : अरे, हे तर बालगंधर्व...!

नअस्कार! परवाच जंगली महाराज रोडवरुन (स्थळ : पुणे) चालले होते, तेव्हा सहजच उजवीकडे लक्ष गेलं. (स्थळ : पुणेच!) नवीच इमारत उभी राहिल्यासारखं वाटलं. जवळ जाऊन बघितलं तर सुंदर पुष्करणी दिसली.
Bal Gandharva Ranga Mandir
Bal Gandharva Ranga MandirSakal

नअस्कार! परवाच जंगली महाराज रोडवरुन (स्थळ : पुणे) चालले होते, तेव्हा सहजच उजवीकडे लक्ष गेलं. (स्थळ : पुणेच!) नवीच इमारत उभी राहिल्यासारखं वाटलं. जवळ जाऊन बघितलं तर सुंदर पुष्करणी दिसली.

फुलांचे ताटवे, झाडांच्या कुंड्या, मखमाली हिरवळ... त्या सुंदर मखमालीवरती दोन चार गिरक्या घेण्याची इच्छा झाली. पण आधीच माझ्याकडे (मेले पुणेकर) माना वळवून वळवून बघतात. उगाच कशाला आपण लक्ष वेधावं? परिणामी, गिरक्या घेतल्या नाहीत. (काळजी नसावी.) रंगरंगोटी केलेल्या इमारतीच्या आत प्रवेशले आणि साक्षात्कार झाला- ‘‘अरे हे तर आपलं बालगंधर्व!’’

रसिकहो, बालगंधर्व रंगमंदिरानं नवा मेकप केला असून ही रंगभूमी पुन्हा एकदा नव्या वेषभूषेसह रसिकांच्या आगमनासाठी सजली आहे. (काही) खुर्च्या बदलल्या आहेत. (काही) रांगाही बदलल्या आहेत. जमिनीवर लालेलाल गालिचा हांतरला आहे.

(काही) पडदे बदलले आहेत. डावी-उजवीकडच्या (काही काही) खुर्च्यांवर वातानुकूलनयंत्रांचे झोत विशेषत्वानं येऊ लागले आहेत. मंद्र आणि सांद्र असा उजेड आणि संगीत यांचा सुंदरसा मेळ जमला आहे. मुख्य म्हणजे स्वच्छतागृहांमधून सॅनिटायझरचा दर्वळ येऊ लागला आहे.

व्हीआयपींचं दालन तर काही विचारु नका. एखादा व्हीआयपी आला तर नाटक बघण्याऐवजी याच खोलीत बसून राहील!! (व्हीआयपी लोकांची नाटकं काय कमी असतात? असो.) नव्याकोऱ्या नाट्यगृहात नाट्यप्रयोगही होऊ लागले आहेत. तेव्हा रसिकहो, वाट कसली पाहता? चला तर...करा रिक्षाला हात, आणि निघा जंगली महाराज रोडच्या दिशेने!!

हे झालं वर्तमानातलं सुखचित्र. खरी गंमत पुढेच आहे : त्याचं झालं असं की...मेला सगळा माझाच गैरसमज झाला होता, पण गंमत व्हायची ती झालीच. ऐका आता! गेल्या फेब्रुवारीपासून बालगंधर्व देखभालीसाठी बंद होतं.

त्याआधी आमचे बुद्धिमान तरुण परममित्र आणि राज्याचे नवे मुख्य सचिव नितीनराव करीरसाहेबांनी जानेवारीत एक कार्यक्रम घेतला होता. तो ‘बालगंधर्वा’तच झाला होता. तेव्हा मी सहजच त्यांना म्हटलं होतं की, ‘‘साहेब, पुन्हा कधी भेटणार?’’

‘‘मी आता या बालगंधर्वात कधीही येणार नाही!,’’ करीरसाहेब करारी मुद्रेने म्हणाले. ‘‘ओसो कॉ बोरो बोल्ता?’’ माझे डोळे भरुन आले होते, आणि माझ्या पापण्यांची फडफड इथे (काही) रसिकांनी इमॅजिन करावी.

‘‘हे नाट्यगृह येत्या काही दिवसात पाडणार! मग मी कसा येणार?,’’ करीरसाहेबांनी बिनतोड युक्तिवाद केला. त्यांच्याकडूनच कळलं की ‘बालगंधर्व’ लौकरच पाडून तिथं भव्य नाट्यसंकुल बांधण्यात येणार आहे. एक नव्हे, तीन नाट्यगृहं, मॉल वगैरे.

‘बालगंधर्व’ नेमकं कसं असावं, याचा अभ्यासपूर्ण अहवाल तयार करण्यासाठी पालिकेचे (काही) अधिकारी मुंबईतल्या बीकेसीमधल्या जिओ मॉलमध्येही हिंडून निरीक्षण करुन आले म्हणे. त्यानंतर नाट्यगृह फेब्रुवारीत बंद करण्यात आलं.

...पण आश्चर्य! दीड महिन्यात उघडलं ते जुनंच बालगंधर्व!! अरेच्चा, हे कसं झालं म्हणून मी चौकशी केली. तेव्हा असं समजलं की भव्य नाट्यसंकुलाचा आराखडा अजून फायनलच झाला नसून तूर्त देखभाल तेवढी झाली आहे.

‘बालगंधर्व’च्या जोडीला गणेश कला क्रीडा केंद्राचाही मेकओव्हर चालला असून तेही सध्या बंदच आहे. लौकरच ते सुरु होणार असलं तरी तिथं मतदान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी निवडणूक आयोगानं ते (व्हीआयपी कक्षासहित) ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, मुंबईतल्या जिओ मॉलच्या धर्तीवर ‘बालगंधर्व’ संकुलाची उभारणी करण्याचा विचार एवढा पक्का आहे की, विचारता सोय नाही. भविष्यकाळात (यदाकदाचित) तिथं खरोखर नाट्यसंकुल उभं राहिलं तर रसिक अचंब्यानं म्हणतील, ‘‘अरे हा तर जिओ मॉल’’!! अधिक काय लिहिणे?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com