ढिंग टांग - लोकतंत्र की जीत! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रिटिश नंदी

ढिंग टांग - लोकतंत्र की जीत!

बेटा : (उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण…मम्मा, आयम बॅक!

मम्मामॅडम : (चटकन खुर्चीतून उठत) आलास? ये! दमला असशील! कित्ती चालतोस रे बाबा! पाय

दुखतील ना तुझे!!

बेटा : (विजयी मुद्रेने) वीस-पंचवीस किलोमीटर तर मी आरामात चालतो रोज! हाहा!!

मम्मामॅडम : (काळजीपोटी) गरम पाण्याच्या बालदीत थोडं मीठ घाल, आणि शेकून काढ हो!!

बेटा : (जबाबदारीनं) इस देश के गरीब, किसान और मजदूरों के लिए मुझे चलनाही पडेगा मां!!

मम्मामॅडम : (आश्चर्यानं) कमाल आहे बुवा तुझी! मी एक दिवस तुझ्यासोबत चालले तर पाय किती दुखले माझे!!

बेटा : (विचारवंताच्या पवित्र्यात) हम चलेंगे तो पार्टी चलेगी! पार्टी चलेगी तो देश चलेगा! देश चलेगा तो विश्व चलेगा, और विश्व चलेगा तो…(पुढचे न सुचल्याने) थोडक्यात, चराति चरतो भग: म्हणजे जो चालतो, त्याचं भाग्य चालतं!

मम्मामॅडम : (एकदम आठवण येऊन) मतदान केलंस ना?

बेटा : (आश्वस्त करत) अर्थात! माझ्या पक्षाला आज नवा अध्यक्ष मिळणार आहे! का नाही करणार मतदान? करणारच! केल्याशिवाय राहणार नाही! किंबहुना करुनच दाखवलं! केलंच पाहिजे मतदान!!

मम्मामॅडम : (अभिमानानं) यह लोकतंत्र की जीत है! आपल्या पक्षात लोकशाही आहे, म्हटलं!!

बेटा : (दुर्लक्ष करत) तू केलंस मतदान? आपण दोघांनी मतदान केलं की नाही, यावर खूप काही अवलंबून आहे! अध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांनी मला फोन करुन शुभेच्छा मागितल्या! मी दिल्या! ते शशी थरुर बरंच काही इंग्रजीत बोलत होते! काँग्रेस, इलेक्शन हे दोन शब्द वगळले तर, एक अक्षर कळलं नाही! बट स्टिल आय विश्ड हिम द बेस्ट!!

मम्मामॅडम : (कपाळाला हात लावत) मला त्या खर्गे अंकलनी फोन करुन शुभेच्छा मागितल्या! ते बराच वेळ हिंदीत बोलले!! मी थँक्यू म्हटलं!

बेटा : (सुस्कारा सोडत) चला, आपल्या पक्षाला नवा अध्यक्ष मिळणार! माझं टेन्शन गेलं!!

मम्मामॅडम : (आणखी मोठा सुस्कारा सोडत) …माझंही!!

बेटा : (गंभीर होत) गेले कित्येक दिवस मी त्यांना सांगत होतो की, माझ्या मागे लागू नका! माझ्या मागे लागू नका! कुणी ऐकेल तर शपथ!

मम्मामॅडम : (हात झटकत) मी तर कधीच निवृत्तीची घोषणा केली होती!

बेटा : (शंकेखोरपणाने) बाय द वे, मल्लिकार्जुन खर्गेअंकल कुठे राहतात?

मम्मामॅडम : (आठवून) आय थिंक, ‘नऊ, सफदरजंग रोड’ असा काहीतरी पत्ता आहे!

बेटा : (खोल विचार करत) आणि ते मि. थरुर?

मम्मामॅडम : (खांदे उडवत) नो आयडिया! लोधी इस्टेटला कुठंतरी राहतात, असं अर्जात म्हटलं होतं! का रे?

बेटा : (गालावर बोट आपटत ) कमॉन! वी मस्ट नो देअर रेसिडन्सेस!! यांच्यापैकी कुणी अध्यक्ष झाला तर, त्यांना भेटायला आपल्याला त्यांच्या घरी जावं लागेल ना? निवेदनं द्यायला, मीटिंगा अटेंड करायला, चर्चा करायला त्यांनी बोलावलं तर…आफ्टरऑल पार्टी प्रेसिडेंट होणार आहेत ते!! (मोकळा श्वास घेत) आता आपण फक्त पक्षाचे कार्यकर्ते आहोत! निदर्शनं, आंदोलनाला बोलावलं की निघायचं गपगुमान!

मम्मामॅडम : (जावळ प्रेमानं कुरवाळत) ते आपल्याला लागू नाही! पक्षाचा अध्यक्ष बदललाय, पण हायकमांड तीच आहे!! कळलं?