esakal | ढिंग टांग : गर्दीचा गजल!
sakal

बोलून बातमी शोधा

dhing tang

ढिंग टांग : गर्दीचा गजल!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

गर्दीस ते म्हणाले गर्दी करु नका हो

धोका अजून आहे, गर्दी करु नका हो

मोर्चा कशास नेता? आंदोलने कशाला?

समजून घ्या की थोडे, गर्दी करु नका हो

शहरात हिंस्त्र दंगे, फुटली बरीच डोकी

दंगलीस ते म्हणाले, गर्दी करु नका हो

माझे कुटुंब आहे, माझी जबाबदारी

तुमचे तुम्ही बघा ना, गर्दी करु नका हो

हे मान्य की तुम्हाला उपवास रोज घडतो

पाणी पिऊन झोपा, गर्दी करु नका हो

हे तज्ञ झुंडतेचे, नेते दिगंतकीर्ती

गर्दीस सांगती हे-गर्दी करु नका हो

अन मागुती जयांच्या गर्दीच सर्वकाळ

म्हणतात ते पुढारी- गर्दी करु नका हो

जनता आशिष घ्याया, यात्रेकरु निघाले

पण दर्शनास त्यांच्या गर्दी करु नका हो

मोर्चे, सभा असो वा व्हीआयपी विवाह

बाकी कशा कशाला गर्दी करु नका हो

परजून दांडके अन पोलिस तो म्हणाला,

मरता कशास येथे, गर्दी करु नका हो

हे खुंट वाढलेले, डोई कशी करावी?

सलूनात बोर्ड आहे, गर्दी करु नका हो

हिंडू नका कुठेही, संचारबंदि आहे,

संदेश दंडुक्यांचा गर्दी करु नका हो

गर्दी हवी सभोती, गर्दी हवी सभेत

सरकारच्या विरोधी गर्दी करु नका हो

जागृत दैवताच्या आहे पुढ्यात पाटी

मंदिर बंद आहे, गर्दी करु नका हो!

मिरच्या, खिरे, मटार, भेंडी, गवार सस्ती

सुनसान मंडईत, गर्दी करु नका हो

हे भान अंतराचे पाळे न का कुणीही

गर्दीत माणसांच्या गर्दी करु नका हो

कसला विषाणू आला? कोठून हा निपजला?

सर्दी आम्हास झाली, गर्दी करु नका हो

माणूस माणसाला चुकवीत आज आहे,

लपवून तोंड ठेवा, गर्दी करु नका हो

घ्या, याच साबणाने चारित्र्य स्वच्छ ठेवा

हे हातही धुवा की, गर्दी करु नका हो

चौकातल्या सभेत, अन बोलती पुढारी

गर्दी करु नका हो, गर्दी करु नका हो

जन तिष्ठले जयांच्या दुर्मीळ दर्शनांना

त्यांना पुढारी सांगे, गर्दी करु नका हो

काळोख भोवताली, इस्पितळात जाग

या रुग्णभूमिवरती, गर्दी करु नका हो

ये दिल है आशिकाना, जागा बरीच येथे

गर्दीत माशुकांच्या, गर्दी करु नका हो!

ऐसे मुमुक्षु तांडे, स्वर्गापर्यंत रांग

पण चित्रगुप्त वदला-गर्दी करु नका हो

loading image
go to top