esakal | ढिंग टांग  :  ब्रॅंड मार्केटिंग!
sakal

बोलून बातमी शोधा

Brand Marketing

दादूराया, एक शब्ददेखील पुढे बोलू नकोस! एकेकाळी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण म्हणत होतो ना आपण? मग आता एकदम ब्रॅंड आणि मार्केट पोझिशनची भाषा?

ढिंग टांग  :  ब्रॅंड मार्केटिंग!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

सदू : (गंभीर चेहऱ्याने फोन लावत) जय महाराष्ट्र...! कोण बोलतंय?

दादू : (हळूवारपणे) बोल सदूराया! कसा आहेस?

सदू : (कपाळाला आठ्या) बराच वेळ तुझी रिंग वाजत होती! फोन चटकन का उचलत नाहीस?

दादू : (खुलासा करत) फोन सॅनिटाइज करुन मगच उचलावा! तूसुध्दा फोन करण्यापूर्वी तसंच करावंस!! मास्क तरी लावत जा रे!!

सदू : (कपाळाला हात लावत) किती काळजी घेशील दादूराया!! मी अशी काळजी करत बसलो तर लोकांची कामं कशी होणार? तुझा कारभार हा असा, म्हणून लोक माझ्याकडे तक्रारी घेऊन येतात!!

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दादू : लोकांचीच तर काळजी आहे मला! मराठी माणसाचं भलं करावं, म्हणून तर एवढी काळजी घेतो आहे! तू सुध्दा घे हो!! शेवटी आपण दोघेही एकाच ब्रॅंडचे नाही का?

सदू : (बुचकळ्यात पडत) कसला ब्रॅंड?

दादू : (गुपित सांगितल्यागत) आपले पक्ष वेगवेगळे असले तरी ब्रॅंड सेम आहे, आणि मार्केटदेखील तेच आहे!

सदू : (आणखी गोंधळून) मी समजलो नाही! आपण काय साबण आहोत का? ब्रॅंड काय, मार्केट काय!

दादू : (दाद देत) छॉन उपमा दिलीस! आबण सापणच आहोत...(जीभ चावून) सॉरी, आपण साबणच आहोत! खिलखिलाती खुशबू, और मुलायम त्वचा के लिए... हमेशा वापरो!! हमारा ब्रॅंड...सदू-दादू ब्रॅंड!!

सदू : (सर्द होत) उद्या आपण अगरबत्त्या किंवा पापड आहोत, असं म्हणशील!

दादू : अंऽऽ...पापड नको! त्यापेक्षा धुलाई पावडर ठीक राहील! बेदाग धुलाई के लिए... हमारा ब्रॅंड, सदू-दादू ब्रॅंड!

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सदू : (नापसंतीने) मला हे मान्य नाही, दादूराया! मी का दुकानात विक्रीला ठेवलेला आयटम आहे? छे!! मला मराठी माणसाचं भविष्य उज्वल करायचं आहे! बागा उभ्या करायच्या आहेत! कारंजी उभी करायची आहेत! मराठी शेतकरी जीन्स आणि टीशर्ट घालून शेतात ट्रॅक्‍टरवर बसून नांगरणी करताना पहायचा आहे!

दादू : (समजूत घालत) सदूराया, कशाला इतका उतावीळ होतोस? सगळं करु आपण सावकाश! आधी मार्केटची काय पोझिशन आहे, ते बघायला नको का?

सदू : (संतापून) दादूराया, एक शब्ददेखील पुढे बोलू नकोस! एकेकाळी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण म्हणत होतो ना आपण? मग आता एकदम ब्रॅंड आणि मार्केट पोझिशनची भाषा?

दादू : (मायेने) चिडू नकोस रे! तो जमाना गेला, आता सगळं काही मार्केट ओरिएण्टेड असतं! काही झालं तरी आपण एकाच ब्रॅंडचे आहोत! आपला ब्रॅंड टिकला तरच महाराष्ट्र टिकेल! (कवितेच्या सुरात) आपुला ब्रॅंड टिकला, तरी महाराष्ट्र टिकला, आपुल्या ब्रॅंडविना महाराष्ट्रगाडा न चाले!! हे लक्षात ठेव!

सदू : (विचारचक्रात अडकत) तरीच... आमच्या पक्षाची ही अवस्था झाली! मी आपला समाजसेवा करत बसलो!!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दादू : (उत्साहात) तू वाईट वाटून घेऊ नकोस! ही सगळी त्या कुटिल कमळाबाईची चाल आहे, आपला ब्रॅंड खच्ची करुन तिला आपला कमळ ब्रॅंड मार्केटमध्ये पुढे आणायचा आहे! तिचा हा डाव मी कदापि तडीला जाऊ देणार नाही! फक्त तुझी साथ हवी!

सदू : (थंडपणाने) म्हंजे काय करु?

दादू : (गालातल्या गालात हसत) सूर म्हणतो साथ दे, वाटी म्हणते थाळी दे! तुझ्या लाडक्‍या दादूरायाला, फक्त तुझी टाळी दे!!

loading image